
Intresting Fact About Marathi Language: मराठीवरुन सध्या राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. मराठी भाषा ही हजारो वर्ष जुनी असून या भाषेचं वैशिष्ट्य म्हणजे ती वळावी तशी वळते. मात्र मराठीमधील अनेक शब्द हे आपण नेमके का आणि कशासंदर्भातून वापरतो याची कल्पना आपल्यालाही नसते. आपल्या दैनंदिन वापरामध्येही असे अनेक शब्द आहेत. त्यापैकी एक म्हणजे एखाद्या कंजूष किंवा जपून खर्च करणाऱ्यासाठी वापरला जाणारा चिक्कू हा शब्द. आता जपून खर्च करणाऱ्याचा चिक्कू या फळाशी काय संबंध आहे असा प्रश्न थोडा विचार केल्यास पडू शकतो. मात्र हा शब्द जपून पैसे वापरणाऱ्यासाठी का वापरला जातो यामागील लॉजिक काय आहे हे फारच कमी लोकांना ठाऊक आहे. त्याबद्दलच जाणून घेऊयात…
भाषिक महत्त्वं समजून घेणं महत्त्वाचं
‘चिक्कू’ हा शब्द मराठीत कंजूष किंवा फारच जपून खर्च करणाऱ्या व्यक्तीसाठी वापरला जातो. हा शब्द ऐकायला गमतीशीर वाटतो, पण त्यामागे काही भाषिक आणि लोकसाहित्यिक घडामोडी आहेत. या शब्दाचा अशा पद्धतीने का वापर होतो याचं विश्लेषण करताना या शब्दामागील भाषिक आणि लोकसाहित्यिक घडामोडी समजून घेणं महत्त्वाचं आहे. हेच आपण टप्प्याटप्प्यात समजून घेऊयात..
‘चिक्कू’ शब्दाची व्युत्पत्ती काय?
‘चिक्कू’ हा शब्द तत्सम किंवा तद्भव नाही. तो लोकभाषेतील उपरोधिक किंवा विनोदी वापरातून निर्माण झालेला शब्द आहे, असं भाषाशास्त्रज्ञ मानतात. याचा नेमका व्याकरणशुद्ध स्रोत नसला तरी काही मांडलेले तर्क पुढीलप्रमाणे :
> ‘चिकट’ + ‘कंजूष’ या संकल्पनेतून हा शब्द आलेला असावा, असं एक मत आहे. म्हणजे ज्याला स्वतःच्या पैशाला इतका चिकटपणा आहे की तो काहीच खर्च करत नाही किंवा खर्चाच्या बाबतीत त्याचा हात सैल नाही.
> कधीकधी ‘चिक’ किंवा ‘चीक’ (झाडातून निघणारा चिकट द्रव्य पदार्थ) या संस्कृत अथवा प्राकृत मूळांपासून हा शब्द आलेला असावा. या शब्दा अर्थ चिकटपणा असा होतो. याचा वापर मानसिक चिकटपणासाठी म्हणजेच एखादी गोष्ट सहज “सोडून न देणारा”, “स्वत: जवळच्या पैशाला चिकटलेला” अशा अर्थाने होतो.
‘चिक्कू’ आणि ‘चिकू’ फळ याचा काही संबंध आहे का?
तर या प्रश्नाचं उत्तर, नाही असं आहे. ‘चिक्कू’ (कंजूष माणूस) आणि ‘चिकू’ (फळ) यांचा थेट संबंध नाही. दोघांचे मूळ निराळे आहेत, हे लक्षात घेणं फार महत्त्वाचं आहे.
> ‘चिकू’ फळाचा मूळ शब्द पोर्तुगीज भाषेतून ‘Chiku’ किंवा ‘Sapodilla’ (स्पॅनिश – Zapote) असा आलेला आहे. याचे मूळ मॅक्सिकन / मॅनिलियन प्रदेशातले आहे.
> मराठीत अपभ्रंश होऊन या फळाचे नाव चिकू झाले, पण त्याचा ‘कंजूष’ व्यक्तीशी कुठलाही संबंध नाही.
कंजूष व्यक्तीला ‘चिक्कू’ का म्हणू लागले?
लोकभाषेत व्यंगात्मक संबोधन तयार होत असतात. ‘पैशाला चिकटून बसणारा’, ‘काहीच खर्च न करणारा’ व्यक्ती, ‘चिकट’ या संकल्पनेतून ‘चिक्कू’ असा व्यक्तिनाम तयार झाला असावा. हे शब्दप्रयोग ग्रामीण भागात, विशेषतः महाराष्ट्रात विनोदी शैलीत वापरले गेले आणि प्रचलित झाले.
अंतिम निष्कर्ष काय?
> ‘चिक्कू’ या शब्दाचा ‘चिकू’ फळाशी याचा कोणताही भाषाशास्त्रीय किंवा ऐतिहासिक संबंध नाही.
> ‘चिक्कू’ हा शब्द भाषिक विनोदातून आणि समाजाच्या निरीक्षणातून निर्माण झालेला आहे.
> हा शब्द आजही बोलीभाषेत कंजूषपणाचं लाघवी (थोडकंसं चिडवण्याच्या हेतूने) वर्णन करण्यासाठी वापरला जातो.
उदाहरण: “अरे, तो एक नंबरचा चिक्कू आहे. तो कसली पार्टी देणार आपल्याला?”
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.