digital products downloads

महाराष्ट्रातील इस्रायली गाव… 2 हजार वर्षांचा इतिहास अन् मराठी कनेक्शन चर्चेत

महाराष्ट्रातील इस्रायली गाव… 2 हजार वर्षांचा इतिहास अन् मराठी कनेक्शन चर्चेत

प्रफुल्ल पवार झी 24 तास रायगड : इस्त्रायल-इराण संघर्षाचा भडका उडाला. इस्त्रायलनं इराणच्या काही अण्वस्त्रतळांवर हल्ला करुन युद्धाला तोंड फोडलं होतं. इराण-इस्त्रायल युद्धामुळं जग तिस-या महायुद्धाच्या खाईत लोटलं जातं की काय याची भीती उर्वरित जगाला होती.  संपूर्ण अरब जगाशी पंगा घेणा-या इस्त्रायलमधील ज्यू समाजाचं मराठी कनेक्शन आहे याची तुम्हाला कल्पना आहे का?. महाराष्ट्रात चक्क ज्यू समाजाचं एक गाव आहे. ज्यू समाज या गावात तब्बल दोन हजार वर्ष राहिला. महाराष्ट्राच्या मातीत ज्यू समाज वाढला आणि स्वतःची वेगळी ओळख जपली आहे. या गावाचं नाव आहे, नवगाव. रायगड जिल्ह्यातील अलिबागजवळच्या नवगावशी इस्त्रायली समाजाचं घट्ट नातं आहे. 2 हजार वर्षांपूर्वी आक्रमकांमुळं जीवाच्या भीतीनं ज्यू लोक पॅलेस्टाईनमधून परागंदा झाले. ज्यू लोकांची सात गलबत समुद्रमार्गे भारतात येत होती. नागावच्या किना-यावर या गलबतांपैकी तीन गलबतं फुटली. या गलबतांमधून वाचलेल्या सात महिला आणि सात पुरुषांनी नागावच्या किना-यावर आश्रय घेतला.

गलबतं फुटल्यामुळं ज्या ज्यूंचा मृत्यू झाला होता त्यांच्या दफनविधीसाठी सात खड्डे खोदण्यात आले. ते ज्यू लोकांचं भारतातलं पहिलं स्मशान असल्याचं सांगण्यात येतंय. आजही आपल्या पूर्वजांच्या या स्मशानभूमीत त्यांचे वंशज विसावल्याचं पाहायला मिळंत. या दफनभूमी परिसराची जेरुसलेम गेट अशी ओळख आहे.

स्थानिक लोकांनी त्यावेळी आश्रय दिल्यावर मूळचे उद्यमशील आणि कष्टाळू असलेले हे ज्यू प्रथम सुतारकाम, तेलाचे घाणे चालवणे अशा प्रकारचे लहान-मोठे व्यवसाय करून उपजीविका करू लागले. त्यांच्यासाठी पूर्णतः नवीन असलेल्या कोकणच्या भूप्रदेशातही ज्यूईश समाजानं आपल्या रुढीपरंपरा सण यांचा विसर पडू दिला नाही.  नवगावमध्ये त्यांनी ज्यूईश प्रार्थनास्थळ उभारल आहे. ज्यू समाजानं रुढीपरंपरा जपल्या मात्र वेशभूषेवर स्थानिक मराठी समाजाचा प्रभाव पडला.

स्थानिकांप्रमाणं ज्युईश समाजही वेषभूषा करु लागला. विवाहप्रसंगी मंगळसूत्र घालणे, हिरवा चुडा भरणे या प्रथा ते पाळतात, प्रार्थनेच्या वेळी तेलाचा दिवा वापरतात, मेणबत्तीचा वापर ते करत नाहीत., शुभ प्रसंगात आणि सणासुदीला करंजी, पुरणपोळी करतात. काळाच्या ओघात ही यहुदी म्हणजेच ज्यू मंडळी स्थानिक समाजाबरोबर इतकी मिसळून गेली की काही चालीरीती वगळता त्यांचे परकेपण अजिबात शिल्लक राहिलेलं. नाही एवढंच नव्हे तर ज्युईश समाज नवगावमधून ज्या ज्या गावात स्थलांतरीत झाला त्या त्या गावांची नावं आडनाव म्हणून लावू लागला. आजही ज्युईश कुटुंबाची आडनावं तळकर, दांडेकर, दिवेकर, रोहेकर, पेणकर, पेझारकर, चेऊलकर अशी आडनावं पाहायला मिळतात.

नवगाव भागात आलेली ज्युईश कुटुंब हळूहळू वाढू लागली. ज्यू समाजाला जगभर विस्थापित होत असताना जसा स्थानिकांचा किंवा इतर समाजाचा त्रास झाला तसा महाराष्ट्रात झाल्याचे कोणतेही दाखले मिळत नाही. ज्युईश समाजाची घरं वाढली… हळूहळू ज्युईश समाज अलिबाग-पेण-पनवेलपासून थेट ठाण्यापर्यंत गावांमध्ये विखुरला गेला. ज्युईश समाजाची वस्ती समुद्रकिना-यावरील गावांमध्ये स्थलांतरित झाली, स्थायिक झाली.

 ज्युईश समाजानं अलिबाग चौल पट्ट्यात स्थायिक होत असतानाच तेल गाळण्याच्या व्यवसायाची निवड केली. अलिबागच्या किनारीपट्ट्यात मासेमारी हा प्रमुख व्यवसाय होता. त्यावेळी मासेमारी होड्यांना वंगणाची गरज लागत होती. हे वंगण करंजांच्या वृक्षापासून तयार केलं जात असे ते वंगण बेनेइस्त्रायली लोक काढू लागले. 

करंजाच्या बियांपासून तेल काढणा-या या समाजाला शनिवारच्या शब्बाथवरुन शनिवारतेली असं म्हटलं जाऊ लागलं… चौल, अलिबाग, पेण भागातील लोकं त्यांचा उल्लेख शनिवारतेली करत असले तरी स्वतः ज्यू मात्र आपला उल्लेख बेनेइस्त्रायली म्हणजे इश्वराची लेकरं असा करु लागले. 

वंगणाचं तेल काढणा-या या समाज हा शनिवारी शब्बाथ म्हणजे पवित्र दिवस पाळतो. शनिवारी ज्यू लोक कोणतंही काम करत नाही. त्यादिवशी फक्त इश्वरभक्ती केली जाते. यहुदी धर्मात प्रेषितानं जगाची निर्मिती करताना शनिवारी आराम केला होता त्यामुळं शनिवार हा शब्बाथ पाळला जातो असं ज्यू समाजबांधव सांगतात. 

बेनेइस्त्रायली समाजाचा आहारही सामान्य असला तरी ते मांसाहारासोबत दूध किंवा दुग्धजन्य पदार्थांचं सेवन करत नाही. मांसाहार केल्यानंतर चार ते आठ तास ते दुग्धजन्य पदार्थाचं सेवन टाळतात.  ज्यू लोकांनी आहारातील पदार्थ स्थानिक स्वीकारले तरी हलाल, झटकाप्रमाणं त्यांचं खाणं कोसर पद्धतीचं असतं. ज्यू समाजातील एका विशिष्ट व्यक्तीला कोसर पद्धतीचा अधिकार मिळतो. त्याच व्यक्तीनं दिलेलं मटण चिकन समाजबांधवांना खावं लागतं. मुख्य बाब म्हणजे जो कोंबडी किंवा बकरं अपंग किंवा आजारी असेल तर त्याला खाणे ज्यू समाजात त्याज्य मानलं जातं.

दोन हजार वर्ष भारतात राहूनंही ज्यूईश लोकांच्या मनातलं मायभूमीविषयीचं प्रेम आणि ओढ कमी झाली नव्हती. जगभरात यहुदी म्हणजेच इस्त्रायली समाजाचं दमन सुरु झालं होतं. त्यामुळं यहुदी समाजात मूळ मातृभूमीकडं जाण्याची ओढ निर्माण झाली. त्यातूनच झियॉनिस्ट चळवळीचा उदय झाला. पॅलेस्टाईनजवळच्या वाळवंटात हळूहळू ज्युईश लोकांच्या कॉलनीज उभ्या राहू लागल्या आहेत. पहिल्या महायुद्धात पॅलेस्टाईनमध्ये चार टक्के लोकसंख्येत असलेले ज्युईश लोकांची लोकसंख्या दुसरं महायुद्ध सुरु होता होता 30 टक्क्यांपर्यंत पोहचली. जगभरातील इस्त्रायली लोकांमध्ये पवित्र भूमीकडं जाण्याचा ओढा होता. त्यातूनच 14 मे 1948 साली इस्त्रायल या देशाची निर्मिती झाली. इस्त्रायल हा ज्युईश लोकांचा आपला देश आहे ही भावना जगभरातल्या ज्युईश लोकांमध्ये होती. याला महाराष्ट्रातील बेनेइस्त्रायली समाजही कसा अपवाद राहणार आहे.1948 पासून महाराष्ट्रातील बेनेइस्त्रायली समाजही हळूहळू इस्त्रायलला स्थलांतरित होऊ लागला.. सुरुवातीला एक दोन कुटुंब स्थलांतरीत झाली. नंतर मात्र ही संख्या वाढली… 1990चं दशक येता येता नवगावमध्ये हाताच्या बोटावरच मोजण्याऐवढे बेनेइस्त्रायली लोक राहिले. नवगावातील इस्त्रायली आळी आता पूर्ण रिकामी ओकीबोकी वाटू लागली आहे.

इस्त्रायलमध्ये गेलेले तिथले मराठी लोकंही महाराष्ट्रातल्या मराठीला विसरलेले नाहीत. इस्त्रायलमध्ये मायमराठी नावाचं एक मासिक चालवलं जातं… तिथल्या मराठी इस्त्रायली लोकांना अजूनही भारताचा अभिमान वाटतो. ते त्यांच्या इस्त्रायलच्या मायभूमीत परतले असले तरी तब्बल दोन हजार ते चोविसशे वर्ष त्यांनी मराठीला आपलंसं केलं होतं. त्यामुळं इस्त्रायलमध्ये राहूनही बेनेइस्त्रायली समाजाला मराठी भाषेनं बांधून ठेवलं आहे. 

इस्त्रायलमधून परागंदा झालेल्या ज्यू लोकांवर अनन्वयीत अत्याचार झाले. युरोपात जर्मनी, पोलंडमध्ये ज्यू लोकांचा अक्षरक्षः नरसंहार झाला. ज्या देशात त्यांनी आश्रय घेतला तिथं त्यांच्याकडं परकीय नजरेनं पाहिलं गेलं… पण याच्या नेमकं उलटं महाराष्ट्रात झालं. महाराष्ट्रानं त्यांना मायेची ऊब दिली. हक्काची माती दिली. त्यामुळंच त्यांच्या शंभर पिढ्या महाराष्ट्रात वाढल्या आणि बहरल्या. बेनेइस्त्रायली लोकांची संख्या महाराष्ट्रात 100 ते 200च्या घरात राहिलीये. इथं हाताच्या बोटावर राहिलेले बेनेइस्त्रायली लोकंही मातृभूमीच्या ओढीनं कदाचित इस्त्रायल गाठतील… पण जवळपास दोन हजार वर्ष ज्या मराठी मातीत त्यांना मायेचा ओलावा मिळाला ते गाव ते कधीच विसरणार नाहीत.  

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp