
Cyber Fraud News: मुलं परदेशात असताना किंवा आई-वडिलांपासून दूर असताना त्यांना एकटेपणा खात असतो. अशावेळी आपल्याशी बोलणार, आपलं ऐकून घेणारं कोणीतरी असावं असं वयोवृद्ध आई-वडिलांना वाटणं सहाजिक आहे. मात्र असा आधार शोधत असताना माहितीच्या आभावी असे वृद्ध लोक आर्थिक फसवणुकीलाही बळी पडण्याची शक्यता असते. असाच एक विचित्र प्रकार मुंबईमध्ये समोर आला असून एका वयोवृद्ध महिलेला लाखो रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. भाऊ शोधण्याच्या नादात या महिलेला मोठा आर्थिक फटका बसला असून हा प्रकार अनेकांना धडा घेण्यासारखा आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, नेमकं घडलंय काय ते पाहूयात…
लंडन कनेक्शन
मध्य मुंबईत वास्तव्यास असलेल्या एका 60 वर्षीय महिलेला बंधुशोध चांगलाच महागात पडला आहे. ‘नातेवाईक कुणी नसेल तर आम्ही आहोत, आम्ही तुम्हाला नातेवाईक मिळवून देतो’ अशी जाहिरात पाहून वृद्धेने एका व्यक्तीला संपर्क केला. लंडनला तिला एक भाऊ सापडला. मात्र, परकीय चलनासह विमानतळावर पकडण्यात आल्याचे सांगून या आभासी भावाने वेगवेगळी कारणे पुढे करून वृद्धेकडून 11 लाख रुपये उकळले.
नातेवाईक शोधून देण्याच्या जाहिरातीला पडली बळी
अँटॉप हिल परिसरात राहणारी महिला युट्युबवर व्हिडीओ पाहत होती. यादरम्यान एक जाहिरात तिच्या नजरेस पडली. ‘तुम्हाला भाऊ-बहीण किंवा अन्य कुणी नातेवाईक हवा असल्यास आम्ही मिळवून देऊ,’ असे जाहिरातीमध्ये नमूद केले होते. लंडनमध्ये राहणाऱ्या सूरज सिंग याच्यासोबत भावाचे नाते जोडायला मला आवडेल, असे महिलेने जाहिरातीमधील क्रमांकावर फोन करून सांगितले. त्यानंतर सूरज सिंग या नावाने महिलेला फोन आला आणि दोघेही एकमेकांसोबत चॅटिंग करू लागले, फोनवर बोलू लागले. काही दिवसांनी महिलेला सूरजचा फोन आला. ‘मी भारतात आलो असून परकीय चलन असल्याने दंड भरल्याशिवाय कस्टम अधिकार सोडत नाहीत’ असे त्याने सांगितले कधी कस्टम अधिकारी, जीएस अधिकाऱ्याच्या नावे महिलेकडून 5 लाख 80 हजार रुपये उकळले.
नक्की वाचा >> 2 कोटी 89 लाख खात्यावरुन क्षणात गायब; मुंबईतल्या 70 वर्षीय आजींबरोबर नेमकं घडलं काय?
वेगवेगळ्या यंत्रणांच्या नावाने पैशासाठी फोन
वेगवेगळ्या यंत्रणांच्या नावाने पैशासाठी फोन येत असल्याने वृद्ध महिलेने पैसे देण्यास नकार दिला. त्यावेळी ‘सूरज हा तुमच्या संपर्कात असल्याचे समोर आले असून यामुळे तुम्हाला आणि तुमच्या पतीला अटक होईल’ अशी भीती दाखविण्यात आली. त्यामुळे घाबरलेल्या महिलेने पैसे पाठविणे सुरूच ठेवले. जवळपास अकरा लाख रुपये पाठविल्यानंतर तिने हा सर्व प्रकार आपल्या मुलीला सांगितला. त्यावेळी ही सायबर फसवणूक असल्याचे सांगत तिने आईला सायबर पोलिसांकडे तक्रार करण्यास सांगितले. त्यानुसार या महिलेनं तक्रार केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.