
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याचा धक्कादायक आणि थरारक कारनामा समोर आला आहे. परळी येथील महादेव मुंडे यांचा खून करून त्यांच्या मांसाचे तुकडे टेबलवर ठेवण्यात आले होते, असा धक्कादायक आणि गंभीर आरोप कराडचा एकेकाळचा समर्थक विजयसिंह बांगर यांनी केला आहे. या आरोपांमुळे बीड जिल्हा पुन्हा एकदा हादरला आहे.
कधीकाळी वाल्मिक कराड याचा कट्टर समर्थक म्हणून विजयसिंह बांगर आणि कुटुंबाची बीड जिल्ह्यात आगळीवेगळी ओळख होती.मात्र वाल्मिक कराड किती विकृत माणूस आहे हे सांगताना बाळा बांगर यांनी वाल्मिकच्या काळ्या कारनाम्यांचा मोठा स्फोट केला आहे. आपल्यासमोर वाल्मिकनं 3 खून केल्याचा खळबळजनक दावा विजयसिंह बांगर यांनी केला आहे. इतकंच नाही तर महादेव मुंडे यांना खून केल्यानंतर त्यांच्या मृतदेहाचे तुकडे वाल्मिकसमोरच्या टेबलवर ठेवले होते, असा दावाही बांगर यांनी केला आहे.
बीडमधल्या काळ्याकुट्ट गुन्हेगारी विश्वाचा वाल्मिक कराड म्होरक्या बनला. वाल्मिकच्या काळ्या कारनाम्यांची यादी संपता संपत नाही. वाल्मिकनं आपल्या कुटुंबाला देखील संपवण्याचं काम केलं. इतकंच नाही तर बलात्काराचे गुन्हे दाखल करू अशी धमकीही दिल्याचा आरोप विजयसिंह बांगर यांनी केला आहे.
महादेव मुंडेंच्या खूनामागे वाल्मिक कराड असल्याचा दावा विजयसिंह बांगर यांनी केल्यानंतर महादेव मुंडेंच्या पत्नी आक्रमक झाल्या आहेत. पोलिसांनी बांगर यांचा जबाब नोंदवून घ्यावा आणि आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी यांनी केली आहे.
महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणाचा तपास अद्यापही अंधारातच आहे. आता विजयसिंह बांगर यांच्या आरोपांनंतर पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष लागलं आहे. मात्र यानिमित्तानं वाल्मिक कराड आणि त्याच्या गँगचा गुन्हेगारी चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.