
Nitesh Rane Reaction: उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी वरळीतील एनएससीआय डोम येथे ‘मराठी विजय मेळावा’ घेतला. तब्बल 19 वर्षांनंतर ठाकरे बंधू एकाच मंचावर दिसले. मराठी भाषा आणि अस्मितेच्या मुद्द्यावर एकत्र आलेल्या या बंधूंनी महाराष्ट्राच्या राजकारणात नवा अध्याय सुरू केला. या ऐतिहासिक क्षणाला साक्षीदार होण्यासाठी राज्यभरातून लाखो मराठीप्रेमी आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती. दरम्यान एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून यावर पहिली प्रतिक्रिया आली आहे. ही प्रतिक्रिया देताना शिवसेनेकडून राज ठाकरेंची पाठराखण तर उद्धव ठाकरेंवर टीका करण्यात आलीय. यावर भाजप नेते नितेश राणे यांनी टीका केली आहे.
नितेश राणे यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या वरळी डोम येथे आयोजित विजयी मेळाव्यावर टीका केली. ठाकरे बंधुंचा हा मेळावा म्हणजे जिहादी सभा असल्याचा आरोप नितेश राणेंनी केला. टोपी-दाढीवाल्यांकडून मराठी बोलायला लावण्याची हिंमत आहे का? असा प्रश्न त्यांनी विचारला. हा मेळावा हिंदूंमध्ये फूट पाडण्यासाठी आहे, असा टोला लगावला. नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख जिहादी हृदयसम्राट असा करत त्यांच्यावर टीका केली. राज-उद्धव यांच्या एकत्र येण्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणावर फरक पडणार नाही, असेही त्यांनी यावेळी म्हटले.
आपल्यातला अंतरपाट दूर झाला असं विधान उद्धव ठाकरेंनी केलं होतं. त्यांच्या या विधानाचा नितेश राणे यांनी समाचार घेतला. अंतरपाट दूर झाला असं उद्धव ठाकरे म्हणतात मात्र यापैकी नवरा कोण आणि नवरी कोण? हे विचारायला हवं असा टोला नितेश राणेंनी लगावला.
ठाकरे बंधुंनी एकत्र येणे मराठी किंवा हिंदुत्वासाठी नसून वैयक्तिक अस्तित्वासाठी असल्याची टीका नितेश राणेंनी केले. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याला कौटुंबिक भांडण आणि लग्नात एकत्र येणे असे संबोधत त्यांनी खोचकपणे टीका केली. दोघांपैकी एका पक्षाकडे शून्य आमदार तर दुसऱ्याकडे 20 आमदार असल्याचा उल्लेख करत त्यांच्या राजकीय प्रभावावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
नितेश राणेंनी केलेल्या या टीकेला ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते भास्कर जाधव आणि सुषमा अंधारे यांनी राणे यांच्यावर पलटवार केला. जाधव यांनी राणे यांना नेपाळी वॉचमनसारखा दिसणारा पोरगा म्हणत त्यांच्या टीकेचा समाचार घेतला. तर अंधारे यांनी राणे यांना छोट्या पोरांकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.