
Raj Thackeray And Uddhav Thackeray Alliance Ramdas Athawale Reaction : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आज विजयी मेळाव्यात एकत्र आलेत. राज्य सरकारनं हिंदी भाषेचा जीआर मागे घेतल्यानंतर दोन्ही बंधूंनी विजयी मेळाव्याची घोषणा केली होती. मेळाव्याच्या निमित्ताने ठाकरे कुटुंब जवळपास 20 वर्षानंतर एकत्र आल्याचं दिसलं. त्यामुळे ठाकरे पर्वाला नव्यानं सुरूवात झाली आहे. तर, दुसरीकडे महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड उलथापालथ होणार आहे. दोन्ही ठाकरे एकत्र आल्यामुळे महाविकासआघाडीत खळबळ उडाली आहे. तसेच महायुतीचे काय होणार याबाबत महाराष्ट्रातील बड्या नेत्याने सर्वात मोठी राजकीय भविष्यवाणी केली आहे.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी व्यासपीठावर एकत्र आल्यावर महायुतीबाबत भविष्यवाणी करणाऱ्या नेत्याचे नाव आहे रामदास आठवले. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी ठाकरे एकत्र आल्यावर प्रतिक्रिया दिली आहे. दोन्ही भाऊ एकत्र येण्याचा फायदा महायुतीला (एनडीए) होईल. तर, दुसरीकडे महाविकास आघाडी (एमव्हीए) मध्ये फूट पडेल. काँग्रेस आणि राष्ट्रवादी (सपा) वेगळे राहतील. उद्धव ठाकरेंना त्यातून बाहेर पडावे लागेल असा दावा रामदास आठवले यांनी केला आहे. जर आम्हाला दोघांना एकत्र जायचे असेल तर दुसऱ्या कोणाचीही गरज नाही असे राज ठाकरे म्हणतात. यामुळे याचा फटका महाविकासआघाडीला बसू शकतो. यामुळे उद्धव ठाकरेंना महाविकासआघाडून बाहरे पडावे लागू शकतो असा दावाही रामदास आठवले यांनी केला आहे. दोघेही एकत्र आले आहेत. बघूया किती काळ एकत्र राहतात असा टोलाही रामदास आठवले यांनी लगावला.
हिंदी भाषा जीआर रद्दविरोधात वरळीत झालेल्या विजयी मेळाव्याला काँग्रेसची दांडी पाहायला मिळाली. काँग्रेसचा एकही कार्यकर्ता मेळावा स्थळाकडे फिरकला नाही. राष्ट्रवादी SP कडून सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड तर शेकापचे जयंत पाटील मेळाव्याला उपस्थित होते. कालपर्यंत मेळाव्याला जाणार असल्याचे सांगणारे विजय वडेट्टीवारही आजच्या मेळाव्यात कुठेही दिसले नाहीत.
ठाकरेंच्या विजयी मेळाव्यात आणखी एका दृश्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं ते म्हणजे सुप्रिया सुळे यांनी. अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे स्टेजवर आले खरे मात्र ते दूर उभे होते. हेच कुठेतरी सुप्रिया सुळेंना खटकलं आणि चक्क सुप्रिया सुळेंनी या दोघांचे हात धरून त्यांना राज आणि उद्धव ठाकरेंच्या बाजुला उभं केलं. विशेष म्हणजे राज ठाकरेंच्या बाजुला आदित्य ठाकरेंना आणि उद्धव ठाकरेंच्या बाजुला अमित ठाकरेंना उभं केलं.. त्यामुळे जणू या विजयी मेळाव्यात सुप्रिया सुळेंनी आत्याची भूमिका उत्तम बजावली अशी चर्चा सुरू आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.