
Kasara News : महिलांवरील वाढते अत्याचार आणि तत्सम घटनांमुळे पुन्हा एकदा कायदा आणखी कठोर करण्याची आणि गुन्हेगारांना कठोरातील कठोर शिक्षा करण्याची मागणी सातत्यानं जोर धरताना दिसत आहे. राज्यात महिलांच्या सुरक्षिततेवर सातत्यानं प्रश्नचिन्हं उपस्थित करणारी आणखी एक घटना नुकतीच कसारा रेल्वे स्थानकात घडली आणि अनेकांनाच या वृत्तानं धक्का बसला.
कसारा स्थानकात उतरलेल्या मायलेकीला टीसीनं तिकीट विचारलं आणि यादरम्यान तिकीट तपासणीच्या बहाण्याने संबंधित टीसीने 7 वर्षीय चिमुरडीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याची तक्रार पिडीत चिमुरडीच्या आईने केली होती. या तक्रारीची दखल घेत कल्याण रेल्वे पोलिसांनी रमेशकुमार शर्मा या टीसी विरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे.
12 जून रोजी घडला मन विचलित करणारा प्रकार…
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडून 12 जून रोजी कसारा लोकलने एक महिला आपल्या सात वर्षाच्या मुलीसमवेत कसारा स्थानकात उतरली. स्थानकात उतरल्यानंतर रमेशकुमार नावाच्या ‘टी सी’नं या महिलेकडे तिकीटाची मागणी केली. महिला पर्समध्ये तिकीट शोधत असताना रमेशनं आईजवळ उभ्या असलेल्या 7 वर्षाच्या चिमुरडीला जवळ ओढत तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत तिचा विनयभंग केल्याचा आरोप मुलीच्या आईने केला.
याप्रकरणी आईने उपमुख्यमंत्री कार्यालयात पत्र धाडत आपल्या मुलीबरोबर घडलेल्या घटनेतील आरोपीला शिक्षा करण्याची मागणी केली. उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून या घटनेची तातडीने दखल घेत याप्रकरणी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक करण्याच्या सूचना रेल्वे पोलिसांना दिल्या होत्या. यानंतर कल्याण रेल्वे पोलिसांनी या महिलेशी संपर्क साधत याप्रकरणी रमेश शर्मा या आरोपी विरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे.
विनयभंगप्रकरणी आरोपीला अवघ्या 35 दिवसां शिक्षा
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच कल्याणमध्ये एका विनयभंगप्रकरणी आरोपीला अवघ्या 35 दिवसांत दोषी ठरवत 1 वर्ष सक्त कारावासाची आणि 5000 रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. राज्यात इतक्या जलद वेळेत शिक्षा सुनावण्यात आलेला हा पहिला खटला असल्याचा दावा पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी केला. खडकपाडा पोलीस ठाण्यात 3 जून रोजी एका महिलेने 29 वर्षीय ओंकार निकाळजे याच्याविरोधात विनयभंग आणि छेडछाडीची तक्रार दाखल केली होती.
पोलिसांनी तत्काळ कारवाई करत त्याला त्याच दिवशी अटक केली. जलद तपास पूर्ण करून काही तासांत दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आलं. या गुन्ह्यातील साक्ष, पुरावे तपासून न्यायालयाने आरोपी ओंकार निकाळजे याला बी.एन.एस कलम 74 अंतर्गत 1 वर्ष सक्त कारावासाची शिक्षा आणि बी.एन.एस कलम 329 (3) अंतर्गत 1 महिना साध्या करावासाची शिक्षा आणि 5000 रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.