
प्रफुल्ल पवार, झी मीडिया, रायगड : (Raigad Exclusive News) राज्यात आतापर्यंत अशा अनेक ऐतिहासिक वास्तूंचं जतन करण्याची जबाबदारी काही महत्त्वाच्या संस्थांनी घेतली असली तरीही काही वास्तूंकडे मात्र प्रशासनाचंही दुर्लक्ष होताना दिसत आहे. त्यातीलच एक वास्तू म्हणजे खुद्द राजमाता जिजाऊ यांचा पाचाडमधील वाडा.
वाडा मोजतोय शेवटच्या घटका
किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाडमधील राजमाता जिजाऊंच्या राजवाड्याची पुरती दुरवस्था झाली आहे. ज्या मातेने महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांसारखा महान राजा दिला, त्याच जिजाऊ साहेबांच्या वास्तव्याचे ठिकाण असलेल्या वाड्याकडे पुरातत्व विभागाचं दुर्लक्ष झाल्याचं वास्तव समोर आलं आहे. सर्वत्र वाढलेलं गवत, जंगली वनस्पती, झाडझुडपे यांनी हा परिसर व्यापून टाकला असून वाड्यात शिवकाळातील घरांची दगडी जोती, दगडी भिंतीचे अवशेष, तटबंदी, एक विहीर आणि तलाव आजही इतिहासाची साक्ष देत शेवटच्या घटका मोजत उभ्या आहेत.
ऐतिहासिक वास्तूत कैक अवशेष असतानाही जिजाऊंचा हा वाडा मात्र दुर्लक्षित राहिला आहे. इथं भेट देणाऱ्या शिवप्रेमी आणि स्थानिकांकडून याबाबत खंत व्यक्त केली जात आहे. या ऐतिहासिक वास्तूच्या संवर्धनाकडे भारतीय पुरातत्व विभागाने पूर्णपणे पाठ फिरवली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या राजवाड्याच्या देखभालीसाठी किंवा दुरुस्तीसाठी कोणतेही ठोस पाऊल उचललं गेलं नाही. त्यामुळे या वास्तूचे अवशेष काळाच्या ओघात नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. गड किल्ल्यांप्रमाणे प्रेरणादायी असणाऱ्या या वास्तुचे जतन व्हावे अशी मागणी इथं भेट देणारे शिवप्रेमी आणि स्थानिक नागरीकांकडून सातत्यानं करताना दिसत आहेत.
वाड्याच्या दुरवस्थेवर संभाजीराजे छत्रपती म्हणतात…
दुर्गराज रायगड किल्ला केंद्राच्या पुरातत्त्वं खात्यातील असून, तिथं काहीही काम करायचं झालं तर त्यांच्याच सांगण्यानुसार होतं. राज्याच्या पुरातत्वं खात्याकडून आवश्यकतेनुसार इथं गोष्टींचं जतन होत असतं. मात्र मुख्य गोष्टींना आम्हालाही हात लावता येत नाही. त्यामुळं रायगडावरही काही महत्त्वाच्या जागा सोडून उर्वरित पायऱ्यांचं आणि तत्सम काम आम्ही केलं आहे. सध्या पुरातत्त्वं खात्याच्या गरजांकडे केंद्रानंही लक्ष घालण्याची गरज आहे. इथं वाड्याचा नुसता पाया आहे. पूर्ण वाडा नाही, मात्र आता तिथं केंद्रानं लक्ष घालून जी आर्थिक मदत लागेल याची कल्पना द्यावी. ज्यामध्ये रायगड प्राधिकरण आणि राज्य सरकारकडून आम्ही पूर्ण सहकार्य करू, असं संभाजीराजे छत्रपती यांनी झी 24तासशी संवाद साधताना स्पष्ट केलं.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.