
Maharashtra Governor On Marathi Language Issue: मराठी भाषेवरुन मारहाण होत असेल तर गुंतवणुकदार राज्याकडे पाठ फिरवतील असं विधान राज्याचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी केलं आहे. या विधानावरुन राजकीय प्रतिक्रियांना पूर आल्याचं दिसत आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून माजी मंत्री आदित्य ठाकरेंनी यावर मत नोंदवलेलं असतानाच दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनंही यावरुन आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रकरणावर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडूनही पहिली प्रतिक्रिया नोंदवण्यात आली आहे.
राज्यपाल काय म्हणाले?
आजही भाषेवरुन वाद होतात अशीच स्थिती असल्याचं राज्यपाल राधाकृष्णन म्हणाले. “जर तुम्ही मला मारहाण केली तर मी लगेच मराठी बोलू लागेन का?” असा सवाल राज्यपालांना राजभवनातील एका कार्यक्रमामधील भाषणात उपस्थित केला. तामिळनाडूमध्ये त्यांच्यासमोरच तमिळ बोलण्यावरुन झालेल्या हाणामारीचा संदर्भ देत त्यांनी मराठी-हिंदी वादावर भाष्य केलं. “जर आपण द्वेष पसरवला तर कोणता गुंतवणुकदार आपल्या राज्यात येईल? या साऱ्यामधून आपण दीर्घकाळालीन विचार केल्यास फक्त महाराष्ट्राचे नुकसान करत आहोत. आपण हे असले प्रकार क्षुल्लक राजकीय फायद्यासाठी करू नयेत,” असंही राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन म्हणाले.
शिंदेंची सेना काय म्हणाली?
शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी राज्यपालांच्या विधानावर बोलताना, “महाराष्ट्राचे राज्यपाल हे प्रथम पद आहे. मराठीचा सन्मान त्यांनी करायला पाहिजे,” असं मत नोंदवलं. “ज्यांना मराठी येत नाही ते पण महाराष्ट्रात येऊन मराठी शिकतात. थोडा वेळ लागतो, मराठीचा त्यांना सराव नसेल पण महाराष्ट्रात आल्यानंतर उत्तम मराठी अनेकजण शिकून जातात,” असं भोंडेकर म्हणाले.
आमदार पंकज भोयर यांनी राज्यपालांच्या विधानावर बोलताना महाराष्ट्रात असणाऱ्यांना मराठी येणे अपेक्षित असल्याचं मत नोंदवलं. “महाराष्ट्रात असल्यावर असणाऱ्याला मराठी येणे अपेक्षित आहे. कोणाला मराठी येत नाही म्हणून त्यांना मारहाण करणे योग्य नाही. सामंजस्यातून भूमिका घेऊन आपलं म्हणणं समजावून सांगितले पाहिजे,” असं भोयर म्हणाले.
आदित्य ठाकरेंनीही मांडलं मत
“राज्यपालांनी राजकीय वक्तव्य करणे हे योग्य नाही कारण ते राज्यपाल आहेत. राज्यपाल काही केंद्र सरकारच्या विरोधात आहेत का?” असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला. तसेच, “राज्यपालांसमोर खूप मोठे मोठे विषय आहेत. मंत्री जे राज्यभर फिरत आहेत, एक मंत्री बुक्का मारत आहे तर एक मंत्री बनियन घालून बसले आहेत. हे सगळं लक्षात घेता आणि पाहता त्यांनी त्याकडे लक्ष दिले पाहिजे,” असं आदित्य ठाकरे म्हणाले.
मनसेची आक्रमक भूमिका
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी राज्यपालांच्या विधानावरुन मनसे स्टाइलमध्ये मत नोंदवलं. “मराठी बोलले नाहीत म्हणून कोणाला मारहाण करण्यात आलेली नाही ज्या लोकांनी मराठीचा अपमान केला त्यांना धडा शिकवलेला आहे,” असं देशपांडे म्हणाले. “जर अमराठी लोक येऊन इथे गुंतवणूक करणार असतील आणि मराठी लोकांना रोजगार मिळत नसेल तर या गुंतवणुकीला काही चाटायचं आहे का?” असा सवाल देशपांडेंनी विचारला आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.