
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाची आजही प्रेक्षकांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. या कार्यक्रमात प्रभाकर मोरे अनेकदा कोकणी माणसाची भूमिका साकारतात. कोकणी माणसाचा ठेका ते अचूक पडतात. तसेच त्याचं ‘अगं शालू झोका देगो मैना…’ हे गाणं देखील अतिशय लोकप्रिय झालं आहे. अनेकदा प्रभाकर मोरे यावर ठेका धरतात. पण यावेळी त्यांनी चक्क आमदार भास्कर जाधव यांना या गाण्यावर ठेका धरायला लावला आहे.
सुवर्ण भास्कर नमन स्पर्धा 2025 या स्पर्धेचं आयोजन आमदार भास्कर जाधव यांनी केलं होतं. यावेळी महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम प्रभाकर मोरे उपस्थित होते. यावेळी भास्कर जाधव यांनी प्रभाकर मोरे यांच्यासोबत स्टेजवर ‘अगं शालू झोका देगो मैना….’ या गाण्यावर ठेका धरला. या स्पर्धेतील स्पर्धक आणि प्रभाकर मोरे, भास्कर जाधव स्टेजवर आहेत.
कोकणाची परंपरा
परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कोकणभूमीत अनेक कलांचा विकास झाल्याचं म्हटलं जातं. त्यामध्ये नमन(खेळे),शक्तीतुरा(जाकडीनृत्य) भारुड,डफावरीळ पोवाडे यासारख्या कलांचा समावेश आहे. कोकणातील विशेषतः रत्नागिरी जिल्हातील नमन(खेळे)या लोककलेची प्रसिध्दी जगभर पसरली आहे. श्री गणरायाचे आगमन, मृदंग , ढोलकीच्या तालावर ठेका धरणारी नटखट गवळण ,काल्पनिक पौराणिक वगनाट्य सादर करणारी ही नमन लोककला कोणतेही आर्थिक पाठबळ नसताना,शासनाचे अनुदान नसतानाही कोकणवाशीय जोपासत आहेत.
या लोककलेला फार प्राचीन काळापासून रत्नागिरी ,चिपळूण,गुहागर,संगमेश्वर ,देवरुख,लांजा ,राजापूर ,मंडणगड या तालुक्यातील लोकांनी ही लोककला जोपासून शासनाच्या,भारत सरकारच्या अनेक योजना या लोककलेतून लोकांपर्यंत पोहचवून त्याविषयी जनजागृती करण्याचे काम पार पाडले आहे.झाडे लावा-झाडे जगवा,पाणी वाचवा,नशाबंदी ,वृक्षतोड थांबवा,स्त्रीभ्रुणहत्या,शिक्षणाचे महत्त्व यासारख्या विषयांवर या लोककलेतून लोकांपर्यंत संदेश देण्याची महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे.
शिवसेना नेते, गटनेते, आमदार भास्कर जाधव यांच्या संकल्पनेतून गुहागर विधानसभा क्षेत्रातील नमन कलावंतांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने ‘सुवर्ण भास्कर नमन स्पर्धा 2025’ चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमातील हा व्हिडओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.