
Maharashtra Weather News latest Updates : देशाच्या उत्तरेकडे पावसानं मुक्काम वाढवलेला असतानाच इथं महाराष्ट्रातसुद्धा पावसाची जोरदार हजेरी असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. राज्यात पर्जन्यमानासाठी पूरक वातावरणीय स्थिती असून, या धर्तीवर प्रामुख्यानं घाटमाथ्याचं क्षेत्र आणि कोकण परिसर प्रभावित होताना दिसेल. ज्यामुळं मुसळधार ते अतिमुसळधार पावसाच्या धर्तीवर या भागांसाठी हवामान विभागानं अतिदक्षतेचा अर्थात रेड अलर्ट जारी केला आहे.
कोकणातच उत्तरेकडील भागांमध्ये मुसळधार पावसाची हजेरी असेल तर, विदर्भातसुद्धा असंच पर्जन्यमान पाहायला मिळेल. ज्यामुळं या भागांना अनुक्रमे ऑरेंज आणि यलो अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पावसाच्या जोरदार सरी अधूनमधून हजेरी लावणार असून, पाऊस काही विश्रांती घेणार नसल्याचच चित्रल पाहायला मिळत आहे. त्यामुळं या भागांमध्ये इतक्यात उघडीप पाहायला मिळणार नाही.
मुंबईसाठी 4 दिवस धोक्याचे असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला असून, 24 जुलैपासून चार दिवस समुद्रात मोठी भरती येणार असल्याचा इशारा जारी करण्यात आला आहे. 26 जुलैला समुद्रात 4.67 मीटर उंच लाटा उसळणार असल्यानं नागरिकांना आणि मासेमारांना सावध करण्यात आलं आहे.
चक्रीवादळाचे संकेत…
बंगालच्या उपसागरामध्ये चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण होत असून, विफा चक्रीवादळाचे संकेत मिळत आहे. त्यातच भर म्हणजे अरबी समुद्राच्या ईशान्येपासून गुजरातच्या दक्षिणेपर्यंत आणि उत्तर महाराष्ट्रापासून थेट आंध्र प्रदेशापर्यंत वाऱ्यांची चक्राकार स्थिती आणि कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्या कारणानं पावसाची जोरदार हजेरी राज्यात पाहायला मिळेल असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.
कोकणात प्रामुख्यानं किनारपट्टी भाग, पपालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची हजेरी असेल. तर, सातारा, कोल्हापूर, नाशिकमध्येही मुसळधार पाऊस नागरिकांना प्रभावित करताना दिसेल. प्रामुख्यानं घाटमाथ्यावरील क्षेत्रांमध्ये पावसाचा जोर वाढणार असून, दृश्यमानता कमी राहील. शिवाय या भागांमध्ये दृश्यमानता कमी राहणार असल्या कारणानं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
Maharashtra Monsoon pic.twitter.com/bzT9PrsOkL
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 23, 2025
तिथं मराठवाडा आणि विदर्भामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि नागपूरसह चंद्रपुरात मेघगर्जनेसह पाऊस बरसेल. दरम्यानच्या काळात वाऱ्याचा वेग वाढणार असून, त्यामुळं नागरिकांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. किमान 27 जुलैपर्यंत राज्यात पावसाचा जोर फारसा ओसरणार नसल्यामुळं लख्ख सूर्यप्रकाश इतक्याच पाहायला मिळणार नाही हेच स्पष्ट होत आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.