
Sanjay Raut on Amit Salunkhe: झारखंडमधील मद्य घोटाळ्यात सुमित फॅसिलिटीचा संचालक अमित साळुंखे याला अटक करण्यात आल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरणही तापलं आहे. अमित साळुंखे छत्तीसगडमधील मद्य व्यावसायिक सिद्धार्थ सिंघानियाचा निकटवर्तीय असून त्याच्या चौकशीच्या आधारेच ही कारवाई करण्यात आली आहे. लाचलुतपत पथकाने रांचीमध्ये ही कारवाई केली आहे. दरम्यान अमित साळुंखेचा महाराष्ट्रातील 800 कोटींच्या रुग्णवाहिका घोटाळ्यातही समावेश आहे असा आरोप संजय राऊतांनी केला आहे. तसंच अमित साळुंखे श्रीकांत शिंदे फाऊंडेशनचा कणा असून, सगळे पैसे शिंदेकडे वळवले असाही गंभीर आरोप त्यांनी केला.
“फडणवीस यांना वाकण्याची गरज नाही तरी देखील ते वाकले आहेत. झारखंडमधून एक टोळी आली. अमित साळुंखे यांना अटक केली. सुमित फॅसिलिटी काय आहे? जरा चौकशी करा. 800 कोटींचा घोटाळा महाराष्ट्रमध्ये झाला. 108 नंबर ॲम्ब्युलन्ससंदर्भात आहे. 650 कोटींनी टेंडर वाढवले. अमित साळुंखे श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशनचे आहेत. हे सगळे पैसे श्रीकांत शिंदे फाउंडेशनकडे वळवले,” असा आरोप राऊत यांनी केला आहे.
अमित साळुंखेंच्या अटकेबद्दल बोलताना, “ही अटक सहज झाली नाही. हे धागेदोरे कोणापर्यंत पोहचले? एकनाथ शिंदे यांच्या मुलाच्या जवळच्या व्यक्तीला अटक करून निघून गेले,” असंही राऊत म्हणाले.
अमित साळुंखे कोण आहे?
संजय राऊतांनी सांगितलं आहे की, “100 कोटींच्या रुग्णवाहिका निविदा 800 कोटींपर्यंत गेली. त्या 108 नंबर रुग्णवाहिकेचे कंत्राट सुमित फॅसिलिटीला देण्यात आले होते. त्याचा सूत्रधार अमित साळुंखे आहे. हा वैद्यकीय क्षेत्रातील सर्वात मोठा घोटाळा आहे. अमित साळुंखे श्रीकांत शिंदे फाऊंडेशनचा आर्थिक कणा आहे. मोठ्या प्रमाणात पैसे शिंदेंकडे वळवण्यात आले”.
पुढे त्यांनी म्हटलं की, “अमित साळुंखे हा एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांचा अत्यंत जवळचा माणूस आहे. ही अटक सहज झालेली नाही. सरकारला या पैशाला कुठे पाय फुटले आहेत, कोणाच्या खात्यात गेले आहेत हे शोधायचं आहे. हे धागेदोरे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळापर्यंत जोडले जात आहेत”.
काय आहे मद्यविक्री घोटाळा?
झारखंडमध्ये सध्या मद्य विक्री घोटाळा गाजत आहे. उत्पादन शुल्क विभागात झालेल्या या घोटाळ्याने झारखंड सरकारला मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान सहन करावं लागलं आहे.
झारखंड सरकारने छत्तीसगडमधील सरकारी दारु दुकानांच्या व्यवस्थापनाचं मॉडेल झारखंडमध्ये लागू केलं होतं. यात खासगी प्लेसमेंट एजन्सीमार्फत कामगार पुरवले जात होते. हे कंत्राट सिंघानियाला मिळाले. यात त्याने 450 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. अमित साळुंखेचा सहभाग असल्याने त्यालाही अटक करण्यात आली.
झारखंड दारू घोटाळ्यात आतापर्यंत आयएएस अधिकारी विनय कुमार चौबे यांच्यासह 11 आरोपींना अटक केली आहे. मे 2022 मध्ये छत्तीसगड मॉडेल धर्तीवर दारू विक्री सुरू झाली होती. त्यातूनच हा दारू घोटाळा उघड झाला. त्यात सुमित फॅसिलिटीचे अमित साळुंखेला अटक करण्यात आली आहे.
मंत्रिमंडळातून कोणाला डच्चू मिळणार?
दरम्यान संजय राऊत यांनी मंत्रिमंडळातून चौघांना डच्चू मिळणार असल्याचा दावा केला आहे. “मंत्रिमंडळात कोणाला ठेवायचं आणि कोणाला काढायचं हा मुख्यमंत्री यांचा अधिकार आहे. तरी रिमोट कंट्रोल अमित शहा यांच्याकडे आहे. मंत्रिमंडळात गोंधळाचं वातावरण सुरू आहे. चार मंत्री जाणार आहेत. माणिकराव, संजय शिरसाट, योगेश कदम आणि संजय राठोड यांना जावं लागेल”, असा दावा संजय राऊतांनी केला आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.