
26 July Weather: मुंबईसह चंद्रपूर, गडचिरोली भंडारा आणि गोंदिया येथे पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) आणि राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, 26 जुलै 2025 रोजी पालघर, पुणे घाट परिसर, चंद्रपूर आणि गोंदिया या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. या भागांमध्ये अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 24 तासांत 204 मिमी पेक्षा जास्त पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय. यामुळे पूर, भूस्खलन आणि पाणी साचण्याचा धोका वाढू शकतो. नागरिकांना सतर्क राहण्याचा आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
कोणत्या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट?
ठाणे, मुंबई आणि संपूर्ण कोकण विभाग, जळगाव, नाशिक घाट, सातारा घाट, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती, भंडारा, गडचिरोली, नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 24 तासांत 115 ते 204 मिमी वादळी वारे 40-50 किमी प्रतितास वेगाने वाहण्याची शक्यता आहे. तसेच विजांचा कडकडाट येण्याचीही शक्यता आहे.
समुद्रकिनारी कसे असेल हवामान?
भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्राने (INCOIS) दिलेल्या माहितीनुसार, 26 जुलै 2025 रोजी दुपारी 1:20 वाजता कोकण किनारपट्टीवर (मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग) समुद्राला मोठी भरती येणार आहे. लाटांची उंची सुमारे 4.67 मीटर इतकी असेल. या काळात समुद्रकिनारी जाणे टाळावे आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेने केले आहे.इतर जिल्ह्यांचा अंदाज: यलो अलर्ट: नंदुरबार, धुळे, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूरचा घाट भाग, बीड, बुलढाणा, अकोला, वाशिम आणि यवतमाळ येथे हलका ते मध्यम पाऊस (65-115 मिमी) अपेक्षित आहे. सोलापूर, सांगली, लातूर आणि धाराशिव येथे पावसाचा जोर तुलनेने कमी असेल. असे असले तरी सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नागरिकांनी कशी घ्याल खबरदारी?
हवामान खात्याने महाराष्ट्रातील नागरिकांसाठी खबरदारीचा इशारा दिलाय. पूरग्रस्त भागात प्रवास टाळा, घराबाहेर पडताना छत्री किंवा रेनकोट घ्या, आणि पाणी साचण्याच्या ठिकाणी जाणे टाळ्याचे आवाहन करण्यात आले आहे. किनारपट्टीवरील रहिवाशांनी समुद्रकिनारी जाणे धोकादायक ठरू शकते, त्यामुळे भरतीच्या वेळी सावधगिरी बाळग्याचे आवाहन करण्यात आलंय. स्थानिक प्रशासन आणि हवामान खात्याच्या सूचनांचे पालन करा. शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर होण्याची शक्यता आहे, त्यामुळे याबाबत अद्ययावत माहिती घेत राहण्यास सांगण्यात आलंय.
राज्यात सध्याची परिस्थिती काय?
महाराष्ट्रात मान्सून सक्रिय असून, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा जोर वाढला आहे. गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचणे, रस्त्यांची दुर्दशा आणि वाहतूक कोंडी यासारख्या समस्या उद्भवत आहेत.
आपत्कालीन स्थितीत काय कराल?
हवामान अंदाज आणि आपत्कालीन परिस्थितीत अद्ययावत माहितीसाठी भारतीय हवामान खात्याच्या (IMD) संकेतस्थळाला (www.imdpune.gov.in) (www.imdpune.gov.in) भेट द्या किंवा स्थानिक आपत्कालीन कार्य केंद्राशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.