
Rohit Pawar on Shivsena NCP: राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवारांनी मोठं विधान केलं आहे. धनुष्यबाण चिन्ह उद्धव ठाकरेंना मिळणार असून, काही महिन्यात घड्याळ चिन्ह आम्हाला मिळणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. इतकंच नाही तर एकनाथ शिंदे, अजितदादा त्यांचे पक्ष भाजपात विलीन करणार असल्याचं भाकीतही त्यांनी वर्तवलं आहे. ‘झी 24 तास’चे संपादक कमलेश सुतार यांनी घेतलेल्या ‘टू द पॉईंट’ मुलाखतीत त्यांनी हे विधान केलं आहे.
“उद्धव ठाकरेंचा पक्ष धनुष्यबाणासाठी कोर्टात आहे आणि आम्हीदेखील घड्याळासाठी कोर्टात आहोत. आता पुढच्या काही महिन्यात अशी गेम होऊ शकते की, घड्याळ आम्हाला मिळू शकतं आणि धनुष्यबाण उद्धव ठाकरेंना मिळू शकतं. यानंतर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याकडे पक्ष भाजपात विलीन करण्याचा पर्याय राहू शकतो. कदाचित अजित पवारांचे 40-42 आमदार आहेत आणि एकनाथ शिदेंचे 57 आमदार आहेत, तिथे नव्याने निवडणूक होऊ शकते,” असा खळबळजनक दावा रोहित पवारांनी केला आहे.
पुढे ते म्हणाले की, “अजित पवारांचा जिथे आमदार आहे जसं की भोर येथे मांडेकर हे अजित पवारांचे आमदार आहेत, तिथं काँग्रेसमधील थोपटे भाजपात गेले आहेत. शिवतरे पुरंदरमधून असून तिथे जगताप गेले आहेत. म्हणजे भाजपाने तयारी ठेवली आहे. याचा अर्थ नव्याने निवडणूक होऊ शकते. या 100 ठिकाणी निवडणूक होऊ शकते. भाजपाकडे 132 आमदार असून त्यांना 12 आमदार हवे आहेत. त्यांना फक्त 144 चं बहुमत पार करायचं आहे. तो झाला की सगळाच त्रास संपत आहे. आतून खेळी केली जात आहे”.
“देवेंद्र फडणवीस चाणक्य असल्याचं सर्वजण म्हणतात. पण दुर्दैवाने चाणक्यनिती महाराष्ट्राच्या हितासाठी नाही तर राजकारणाच्या हितासाठी वापरत आहेत. म्हणजे अजित पवारांच्या पक्षाला आताच खिंडार पाडण्यास सुरुवात केली आहे. एकनाथ शिंदेचं तर उघड आहे. त्यांच्या अनेक नेत्यांना इन्कम टॅक्सची नोटीस आली आहे. एकनाथ शिंदेंच्या घरातही इन्कम टॅक्सची नोटीस आली आहे. खिंडार पाडायची सुरुवात झाली आहे. दुसऱ्या बाजूने तयारी केली असून, सुप्रीम कोर्ट 100 टक्के दोघांच्या विरोधात निर्णय देणार आहे. यामुळे विलीन व्हा किंवा नव्याने निवडणूक करा असा पर्याय असेल”.
“यामुळेच नेत्यांना पैसे खायची घाई झाली आहे. आपण किती दिवस सत्तेत राहू हे त्यांनी माहिती नाही. म्हणूनच सगळे खायला पाहत आहेत. त्याच गडबडीत बॅगांचे व्हिडीओ पाहायला मिळत आहेत,” असा दावाही त्यांनी केला आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.