
Malegaon verdict: 17 वर्षांपूर्वी नाशिकच्या मालेगाव इथं झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकार गुरुवारी एनआयएच्या विशेष न्यायालयानं जाहीर केला. जिथं साध्वी प्रज्ञा सिंह, कर्नल पुरोहित, सेवानिवृत्त मेजर रमेश उपाध्याय, अजय राहिरकर , सुधाकर द्विवेदी , सुधाकर चतुर्वेदी, समीर कुलकर्णी या सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता करण्याचा निकाल समोर आला. मालेगावच्या बॉम्बस्फोट निकालानं आरोपी निर्दोष सुटले असले तरी काँग्रेसला मात्र आरोपीच्या पिंज-यात उभं करण्यात आलंय. भगवा दहशतवाद ही व्याख्या करणा-या काँग्रेसनं देशातील हिंदूंची माफी मागावी अशी मागणी होऊ लागलीये. निर्दोष सुटलेल्यांनी काँग्रेसला मतदान न करण्याचं आवाहन केलंय. तर महायुती सरकारनंही काँग्रेसवर टीकेची झोड उठवलीये.
काय आहे नेमकं प्रकरण?
मुंबईपासून सुमारे 200 किमी अंतरावर असलेल्या मालेगाव येथील मशिदीजवळ 29 सप्टेंबर 2008 रोजी मोटारसायकलचा स्फोट होऊन सहा जण ठार आणि 92 जण अधिक जखमी झाले होते. 30 सप्टेंबर 2008 ला हे प्रकरण राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाला (एटीएस) तपासासाठी वर्ग करण्यात आले होते. 20 जानेवारी 2009 मध्ये एकूण 14 जणांवर एटीएसकडून आरोपपत्र दाखल करण्यात आले. त्यात साध्वी, कर्नल पुरोहित आणि मेजर उपाध्याय हे कटाचे सूत्रधार तर स्फोटात वापरलेली दुचाकी साध्वीची असल्याचा आरोप होता. तसेच बॉम्बस्फोटासाठी आरडीएक्सचा वापर करण्यात आल्याचा आरोप होता. 11 एप्रिल 2011 ला प्रकरणाचा तपास एनआयएकडे वर्ग केला गेला. प्रकरणाच्या तपासाची सूत्रे घेतल्यानंतर एनआयएने 2016 मध्ये पुरवणी आरोपपत्र दाखल केले होते. त्यात, साध्वी यांच्यासह श्याम साहू, प्रवीण टाकळकी आणि शिवनारायण कलसंग्रा यांच्याविरोधात पुरावे नसल्याचा दावा करून त्यांना दोषमुक्त करावे असे नमूद केले होते.
समीर कुलकर्णीनी काय केली मागणी?
मालेगाव बॉम्बस्फोट झाल्यानंतर या प्रकरणात एसआयटीनं साध्वी प्रज्ञासिंग आणि कर्नल प्रसाद पुरोहितसह 11 आरोपींना अटक केली होती. साध्वी प्रज्ञासिंहला अटक झाल्यानंतर तत्कालिन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी भगवा दहशतवाद अशी व्याख्या केली होती. या व्याख्येवरुन त्यावेळी बराच गहजब माजला होता. कोर्टाच्या निकालानंतर आता शरद पवार, सोनिया गांधी आणि राहुल गांधींनी देशाची माफी मागावी अशी मागणी निर्दोष सुटलेल्या समीर कुलकर्णीनी केलीय.
काय म्हणाले फडणवीस, शिंदे?
कोर्टाच्या निकालानंतर सत्ताधारी महायुती सरकारनंही काँग्रेसवर टीकेची झोड उठवली. हिंदू समाजाची काँग्रेसनं जाहीर माफी मागावी अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली.
भाजपकडून टीकेची परतफेड ?
काँग्रेसवर झालेल्या टीकेवर काँग्रेसच्या दिल्लीतल्या नेत्यांनी कोँणतीही प्रतिक्रिय़ा दिलेली नाही. कोर्टाच्या या निकालानं तत्कालिन काँग्रेस नेत्यांनी केलेल्या टीकेची परतफेड आता भाजपकडून केली जातेय.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.