
Devendra Fadanvis On Raj Thackeray: अर्बन नक्षलसारखे वागाल तर तुमची अटक होईल. तुम्ही अर्बन नक्षलसारखे वागत नाही तर तुमची अटक का होईल?, असा सवाल करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना टोला लगावला आहे. नागपुरातील एका कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
आज शेतकरी कामगार पक्षाचा वर्धापन दिन सोहळा होता. यादरम्यान राज ठाकरे हे मंचावर उपस्थित होते. तेव्हा त्यांनी सरकारवर पुन्हा एकदा तोफ डागली आहे. अर्बन नक्षल ठरवून एकदा अटक कराच, असं आव्हान राज ठाकरेंनी सरकारला केलं आहे. राज ठाकरेंच्या या वक्तव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
… तुमची अटक का होईल?
अर्बन नक्षलसारखे वागाल तर तुमची अटक होईल. तुम्ही अर्बन नक्षलसारखे वागत नाही तर तुमची अटक का होईल? मला असं वाटतं जे लोक कायद्याच्या विरोधात वागतील त्यांच्यासाठी तो कायदा आहे. आंदोलकांच्याविरोधात कायदा नाही. सरकारविरोधात बोलायची पूर्ण मुभा आहे. त्याच्याविरोधात हा कायदा नाही. मला असं वाटतं आशा प्रकारच्यी वक्तव्य ही कायदा न वाचता केलेली आहे, असं फडणवीसांनी म्हटलं आहे.
तिसऱ्या भाषेच्या मुद्द्यावरदेखील देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ‘माझं अतिशय पक्क मत आहे. महाराष्ट्रात मराठी शिकली पाहिजे. ती अनिवार्य असली पाहीजे. पण महाराष्ट्रातील मराठी मुलांना मराठीसोबत आणखी एक भारतीय भाषा शिकायला मिळाली तर काय वावगं आहे. आपण भारतीय भाषेला विरोध करायचा आणि इंग्रजीला पायघड्या घालायच्या ही जी मानसिकता आहे त्याला माझा विरोध आहे.’
राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
बाहेरुन कोणतरी उद्योपती येणार आणि वाटेल ते थैमान घालणार. राज्य सरकारने म्हणे जमिनीवर कायदा आणला. ज्यात अर्बन नक्षल असा उल्लेख आहे. कोणत्या प्रकल्पाला विरोध केला तर सरकार अटक करु शकतं. एकदा करुच देत. या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाच्या थडग्यावर उद्योग उभा राहणार नाही. उद्योग आणायचे असतील तर मराठी माणसाचा मानसन्मान राखून आणावे लागतील त्याशिवाय उद्योग आणता येणार नाही, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.