
Pune Ganesh Visarjan 2025 Schedule Issue: पुण्यातील गणेशोत्सवाला सुरुवात होण्याआधीच वादाला तोंड फुटल्याचं चित्र दिसत आहे. यंदा विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी (7 सप्टेंबर) दुपारी 12 वाजून 37 मिनिटांनी खग्रास चंद्रग्रहण सुरू होत असल्याने वेळेत विसर्जन पूर्ण करण्याचं आवाहन गणेशमंडळांसमोर असणार आहे. ग्रहणाचा विचार करुनच मानाच्या पाच गणपतींनंतर कोणतं मंडळ विसर्जन मिरवणुकीमध्ये लवकर सहभागी होणार यावरुन मतभेद आहेत. याच विषयावर शहरातील दोन महत्त्वाची मंडळं आमने-सामने आली आहेत.
नेमका वाद काय आहे?
जगभरात आकर्षण असलेल्या पुण्यातील गणेशोत्सवात विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्यावरून गणेश मंडळांमध्येच मतभेद असल्याचं समोर येत आहे. यंदा मानाच्या गणपतींआधीच शंभरहून अधिक मंडळाने एकत्रित येत निर्धार केला आहे. सकाळी सात वाजताच विसर्जनासाठी निघण्याचा निर्धार केला आहे. लक्ष्मी रस्त्यावरून सात वाजताच मिरवणूक सुरू करण्याच्या शंभर गणेश मंडळाच्या निर्णय झाला आहे. दरवर्षी दहा वाजता मानाचे गणपतीची मिरवणूक निघते त्यानंतर इतर गणपती सहभागी होतात. वाद टाळण्यासाठी मानाचे मंडळाने सर्व गणेश मंडळे समान आहेत. चर्चेतून प्रश्न सोडवण्याची भूमिकेत सर्वच मंडळं असल्याने पुढील काही दिवसांमध्ये यासंदर्भात काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
कोणत्या दोन मंडळांना प्राधान्य?
मानाच्या पाच गणपतींनंतर अखिल मंडई मंडळ आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ लगेचच विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. या निर्णयामुळे इतर मंडळांमध्ये नाराजी असून त्यांनी सकाळीच मिरवणुकीमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. यावर्षी खग्रास चंद्रग्रहणामुळे विसर्जनाची वेळ बदलली आहे आणि त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
हा प्रश्न सुटणार कसा?
दुसऱ्याच दिवशी ग्रहण असल्याने, यावर्षी गणेश विसर्जन मिरवणूक लवकर सुरू होईल आणि लवकरच संपेल, अशी शक्यता आहे. गणेशोत्सव धार्मिक आणि श्रद्धेचा उत्सव आहे, त्यामुळे सर्वानी मिळून हा उत्सव साजरा करावा, असे आवाहन केले जात असून चर्चेतून या विषयावर तोडगा काढण्यासाठी सर्वच मंडळं उत्सुक असल्याने हा वाद चर्चेनं सोडवणार आहे.
दोन मंडळांची नेमकी भूमिका काय?
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे विश्वस्त पुनीत बालन आणि अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांनी पत्रकार परिषद घेऊन काही दिवसांपूर्वी याच निर्णयाची माहिती दिली. सायंकाळनंतर विसर्जन मिरवणुकीत सहभागी न होता, या वर्षीपासून मानाचे पाच गणपती टिळक पुतळ्यापासून मार्गस्थ झाल्यानंतर त्या पाठोपाठ मिरवणुकीत सहभागी होण्याचा निर्णय श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट आणि अखिल मंडई मंडळ या मंडळांनी घेतला आहे. ग्रहणाचा काळ सुरु होण्याआधी गणेशोत्सव मंडळाच्या मूर्ती मंदिरात नेणे आवश्यक आहे. याकरिता मिरवणूक लवकर संपविणे आवश्यक असून, मानाचे पाच गणपती टिळक पुतळा चौकातून मार्गस्थ झाल्यानंतर त्या पाठोपाठ मिरवणुकीत सहभागी होण्याचा निर्णय अखिल मंडई मंडळ आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टने घेतला आहे. याच प्रकारे सर्व गणेशमंडळांनी सहकार्य केल्यास पोलीस आणि प्रशासन यंत्रणेवरील ताण कमी होण्यास मदत होईल, असं या दोन्ही मंडळांनी म्हटलं आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.