
Uddhav Thackeray Seat In Last Row BJP Reacts: माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंबरोबरच त्यांचे आमदार पुत्र आदित्य ठाकरे तसेच प्रवक्ते खासदार संजय राऊत हे गुरुवारी दिल्लीमध्ये ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीदरम्यान काँग्रेसचे नेते आणि लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी मतदार याद्यांमधील घोळ आणि निवडणूक आयोगासंदर्भातील प्रेझेंटेशन दिलं. विरोधी पक्षातील वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांनी राहुल गांधींचे हे सारं प्रेझंटेशन समोर बसून ऐकलं. मात्र राहुल गांधींच्या घरी झालेल्या या कार्यक्रामध्ये उद्धव ठाकरे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या व्यक्तींना शेवटच्या रांगेत स्थान देण्यात आल्याचं दिसून आलं. राहुल गांधींनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमध्येही हेच दिसून आलं. यावरुन आता चर्चा सुरु असतानाच भाजपाने या बैठकीतील फोटो शेअर करत ठाकरेंवर खोचक निशाणा साधला आहे.
बैठकीमध्ये नेमकं झालं काय?
उपराष्ट्रपती पदाची निवडणूक, मतदार यादीतील कथित गैरव्यवहारावर यावर या बैठकीत चर्चा करण्यात आली. मात्र या बैठकीतील फोटो समोर आले असून, यामध्ये उद्धव ठाकरेंना शेवटच्या रांगेत बसवण्यात आल्याचं दिसत आहे. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनाही सहाव्या रांगेत स्थान देण्यात आलं होतं.
राहुल गांधी यांनी गुरुवारी दिल्लीत पत्रकार परिषद घेत निवडणुकीत अनेक घोटाळे झाल्याचा आरोप करत निवडणूक आयोगाला लक्ष्य केलं. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतही अनेक बेकायदेशीर गोष्टी झाल्याचा दावा त्यांनी केला. यानंतर रात्री राहुल गांधी यांच्या निवासस्थानी इंडिया आघाडीच्या नेत्यांची एक महत्त्वाची बैठक घेतली, ज्यामध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. दरम्यान राहुल गांधी यांनी मतदार घोटाळ्यावर प्रेजेंटेशन दिलं. त्यावेळी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत शेवटच्या रांगेत बसले होते. उद्धव ठाकरे महाराष्ट्रातील एका पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री असतानाही त्यांना मागे कसं बसवू शकतो असा प्रश्न उपस्थित होत आहे.
भाजपाने काय टोला लगावला?
विशेष म्हणजे, कमल हसन यांना उद्धव ठाकरेंच्या पुढे स्थान देण्यात आलं होतं. कमल हसन यांच्याही मागे उद्धव ठाकरेंना बसवल्याने ते आता जास्त लाडके झाले आहेत का असा प्रश्न विचारला जात आहे. उद्धव ठाकरेंना शेवटच्या रांगेत जागा कशी? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
यावरुनच आता महाराष्ट्र भाजपानेही ठाकरेंना डिवचलं आहे. राहुल गांधींच्या भाषणादरम्यानचा एक स्क्रीनशॉट शेअर करत भाजपाने खोचक प्रतिक्रिया नोंदवली आहे. महाराष्ट्र भाजपाच्या अधिकृत अकाऊंटवरुन राहुल गांधी उपस्थित नेत्यांना संबोधित करत असताना ठाकरे शेवटच्या रांगेत बसल्याचं दिसत आहे. फोटो शेअर करताना भाजपाने, “या फोटोत स्वाभिमान शोधून दाखवा!” असं म्हटलं आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये ‘#शेवटची_रांग’ अशा हॅशटॅगही वापरलाय.
या फोटोत स्वाभिमान शोधून दाखवा!#शेवटची_रांग pic.twitter.com/BuSuqAN6Qv
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) August 7, 2025
मागे बसवण्याचं खरं कारण हे?
उद्धव ठाकरे उशिरा पोहोचल्याने त्यांना मागच्या रांगेत बसवलं असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मात्र असं असलं तरी महाराष्ट्रातील एका महत्त्वाच्या नेत्यासाठी जागा राखीव ठेवली नव्हती का? असा प्रश्न विचारला जात आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.