
Woman Dies In Ambulance Due To Traffic Jam: ट्रॅफिक जॅममध्ये अडकल्याने एका महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना पालघरमध्ये घडली आहे. येथील राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या मोठ्या वाहतूक कोंडीमध्ये 49 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. गंभीर दुखापत झाल्याने या महिलेला मुंबईतील रुग्णालयात नेण्यात येत होते. मात्र वाहतूक कोंडीत अडकल्याने रुग्णालयाच्या वाटेवर असतानाच या महिलेचा मृत्यू झाला. या महिलेचं नाव छाया पुरव असं आहे. छाया यांच्या मृत्यूने पालघरमधील अपुऱ्या आरोग्य पायाभूत सुविधा आणि राष्ट्रीय महामार्ग-48 वरील वाहतूक कोंडीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
कोण आहे ही महिला?
मिळालेल्या माहितीनुसार, 31 जुलै रोजी, पालघरच्या मधुकर नगर येथे छाया वास्तव्यास होत्या. छाया यांच्या घराजवळच्या झाडाची फांदी त्यांच्या डोक्यात पडल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांच्या बरगड्या, खांदे आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली. पालघरमध्ये ट्रॉमा सेंटर नाही, म्हणून स्थानिक रुग्णालयाने त्यांना मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले.
भूल देण्यात आली
पालघरमधून मुंबईला येण्यासाठी 100 किमीचा प्रवास करावा लागतो. या प्रवासासाठी साधारणपणे अडीच तास लागतो. त्यानुसार, त्यांना मुंबईतील रुग्णालयात हलवण्यासाठी छाया पुरव यांना भूल देण्यात आली. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास प्रवास सुरू झाला. छाया यांचे पती रुग्णवाहिकेत त्यांच्या शेजारीच बसवले होते. त्यानंतर रुग्णवाहिका राष्ट्रीय महामार्ग-48 वर मोठ्या वाहतूक कोंडीत अडकली.
ठरलेल्या वेळात अर्ध अंतर कापलं
सायंकाळी सुमारे 6 वाजण्याच्या सुमारास म्हणजे प्रवास सुरु केल्यानंतर तीन तासांहून अधिक वेळाने रुग्णवाहिका केवळ अर्धे अंतर कापू शकली. छाया यांना दिलेल्या भुलीच्या औषधाचा प्रभाव कमी होऊ लागला. भूल उतरल्याने छाया यांना असह्य वेदना होत होत्या. त्यांची प्रकृती बिघडत असताना, त्यांना तातडीने मदत मिळावी म्हणून रुग्णवाहिका संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास मीरा रोडवरील ऑर्बिट हॉस्पिटलमध्ये नेण्यात आली.
अर्धा तास आधी आला असता तर…
हिंदुजा हॉस्पिटलपासून ऑर्बिट हॉस्पिटल सुमारे 30 किमी अंतरावर आहे. पण छाया यांना ऑर्बिट हॉस्पिटलमध्ये दाखल करेपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी छाया यांची तपासणी केली आणि त्यांना मृत घोषित केले. तुम्ही फक्त 30 मिनिटे आधी रुग्णालयात पोहोचला असता तर त्यांना वाचवता आले असते असं डॉक्टरांनी छाया यांचे पती कौशिक यांना सांगण्यात आले. “तिला चार तास असह्य वेदना सहन करताना मी पाहिले,” असं छाया यांचे पती कौशिक यांनी सांगितलं.
ती ओरडत होती, किंकाळत होती
आम्ही छायाला वाचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. मात्र वाहतूक कोंडीमुळे आमचे प्रयत्न निष्फळ ठरले, असं कौशिक म्हणाले. “रस्ता खड्ड्यांनी भरलेला होता. छायाला खूप वेदना होत होत्या. ती वेदनेने ओरडत होती आणि रडत होती. विव्हळत होती. ती सतत लवकरात लवकर मला रुग्णालयात घेऊन चला अशी विनंती करत होती. पण आम्ही अडकलो होतो, चुकीच्या दिशेने वाहनं येत होती. त्यामुळे वाहतूक कोंडी आणखी वाढली,” असं कौशिक म्हणाले.
FAQ
1. राष्ट्रीय महामार्गावर नेमकं घडलं काय?
पालघर जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग-48 (NH-48) वर प्रचंड वाहतूक कोंडीमुळे 49 वर्षीय छाया पुरव या महिलेचा रुग्णवाहिकेत मृत्यू झाला. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात नेण्यात येत होते, परंतु वाहतूक कोंडीमुळे वेळेत रुग्णालयात पोहोचता न आल्याने त्यांचा मृत्यू झाला.
2. मयत माहिला कोण?
31 जुलै 2025 रोजी पालघरच्या मधुकर नगर येथे छाया पुरव यांच्या डोक्यावर झाडाची फांदी पडली. त्यामुळे त्यांना तातडीने उपचारांची गरज होती, परंतु पालघरमध्ये ट्रॉमा सेंटर नसल्याने त्यांना मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात रेफर करण्यात आले.
3. रुग्णवाहिका वाहतूक कोंडीत का अडकली?
छाया पुरव यांना दुपारी 3 वाजता रुग्णवाहिकेतून मुंबईला हिंदुजा रुग्णालयात नेण्यासाठी निघाले होते. परंतु, NH-48 वर प्रचंड वाहतूक कोंडी, खड्डे आणि चुकीच्या दिशेने येणाऱ्या वाहनांमुळे रुग्णवाहिका अडकली. तीन तासांहून अधिक वेळात केवळ अर्धे अंतर (70 किमी) पार करू शकली.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.