
IPS Anjali Krishna: आयपीएस अंजली कृष्णा यांना धमकावल्याच्या प्रकरणात कुर्डू गावातील ग्रामस्थांनी पोलिसांवरच आरोप केलेत. अंजली कृष्णा यांनी पिस्तूल काढून गावक-यांना धमकावल्याचा आरोप गावक-यांनी केलाय. कायदेशीर कामावर धाड टाकणा-या अंजली कृष्णांविरोधात आंदोलन करण्याचा इशारा गावक-यांनी दिलाय.
करमाळ्याच्या पोलीस उपअधीक्षक अंजली कृष्णा आणि अजितदादांमध्ये झालेल्या संभाषणावरुन मोठा वाद पेटलाय. त्या वादाचे पडसाद आता कुर्डू गावात उमटू लागलेत.पोलिसांनी कुर्डूतल्या गावक-यांवर गुन्हे दाखल केलेत. सरकारी कामात अडथळा आणणं आणि अजितदादांसोबतची क्लीप व्हायरल केल्याच्या आरोपाखाली राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाबाराजे जगताप यांच्यासह 23 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत. झी 24 तासची टीम कुर्डू गावात गेल्यानंतर गावक-यांचं वेगळंच म्हणणं पडलं. 31 ऑगस्टला गावच्या पाणंद रस्त्याच्या कामासाठी मुरुम उत्खनन सुरु होतं. ते मुरुम उत्खनन बेकायदा असल्याचं सांगत पोलीस उपअधीक्षक अंजली कृष्णा कुर्डू गावात गेल्या होत्या. त्यांनी थेट पिस्तूल काढून धमकावल्याचा आरोप गावक-यांनी केलाय.
कुर्डू गावात ज्या पाणंद रस्त्याचं काम सुरु होतं त्या रस्त्याच्या बांधकामासाठी महसूलची परवानगी घेतल्याचा दावा गावक-यांनी केलाय. शिवाय ग्रामपंचायतीचा ठरावही असल्याचं गावक-यांचं म्हणणं आहे.
अंजली कृष्णा यांची जवळपास तीन तास कारवाई सुरु होती. गावक-यांनी स्थानिक राजकीय नेत्यांना फोन करुन अंजली कृष्णांना फोन देण्याचा प्रयत्न केला पण त्या कुणाचंही ऐकण्याच्या मानसिकतेत नसल्याचा आरोप बाबाराजे जगताप यांनी केलाय.
पोलीस आणि महसूल प्रशासनानं केलेली कारवाई अन्यायकारक असल्याचा आरोप गावक-यांनी केलाय. ही कारवाई थांबवली नाहीतर प्रशासनाविरोधात प्रतिआंदोलनाचा इशारा गावक-यांनी दिलाय.
पोलीस प्रशासनानं या प्रकरणात समांतर पद्धतीनं कारवाईला सुरुवात केलीय. या प्रकरणात गावकरी एक बाजू सांगतात, पोलीस दुसरीच बाजू सांगतात. हा सगळा प्रकार गैरसमजातून झाला की काय अशीही एक शक्यता आहे.पण एका आयपीएस अधिका-याला उपमुख्यमंत्री फोन करुन धमकीच्या भाषेत बोलतो ही बाब महाराष्ट्रासाठी नक्कीच भुषणावह नाही.
FAQ
प्रश्न: कुर्डू गावात अंजली कृष्णा यांच्याविरोधात गावकऱ्यांनी कोणते आरोप केले आहेत?
उत्तर: कुर्डू गावातील गावकऱ्यांनी आयपीएस अधिकारी अंजली कृष्णा यांनी 31 ऑगस्ट रोजी मुरूम उत्खननाच्या कारवाईदरम्यान पिस्तूल काढून त्यांना धमकावल्याचा आरोप केला आहे. गावकऱ्यांचा दावा आहे की, पाणंद रस्त्याच्या कामासाठी मुरूम उत्खननाला महसूल विभागाची परवानगी आणि ग्रामपंचायतीचा ठराव होता, तरीही अंजली यांनी कारवाई केली.
प्रश्न: या प्रकरणात पोलिसांनी कोणती कारवाई केली आहे?
उत्तर: पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबाराजे जगताप यांच्यासह 23 जणांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणणे आणि अजित पवार यांच्यासोबतच्या संभाषणाची क्लिप व्हायरल केल्याच्या आरोपाखाली कुर्डूवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी समांतर तपास सुरू केला आहे.
प्रश्न: गावकऱ्यांनी आणि अंजली कृष्णा यांच्यातील वादाचे कारण काय आहे आणि त्यांनी काय इशारा दिला आहे?
उत्तर: गावकऱ्यांचा आरोप आहे की, अंजली कृष्णा यांनी कायदेशीर मुरूम उत्खननावर अन्यायकारक कारवाई केली आणि गावकऱ्यांना धमकावले. यामुळे संतप्त गावकऱ्यांनी प्रशासनाविरोधात प्रतिआंदोलनाचा इशारा दिला आहे. दुसरीकडे, अंजली कृष्णा यांचा दावा आहे की, उत्खनन बेकायदेशीर होते, आणि त्यांच्या कारवाईदरम्यान अजित पवार यांनी त्यांना फोनवर धमकी दिली.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.