
Maratha Reservation : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं संजय राऊतांनी कौतुक केलंय. फडणवीस यांनी जरांगेंचं आंदोलन संयमी पद्धतीने हाताळलं अशी स्तुतीसुमनं राऊतांनी उधळलीत. फडणवीसांच्या कौतुकानं शिवसेनेच्या पोटात गोळा आलाय. तर राऊतांच्या या दाव्यावर जरांगेंनी आक्षेप घेतलाय.. मराठ्यांचं आंदोलन दुसरं कोणीच हाताळलं नसून केवळ मराठ्यांनीच हाताळल्याचं जरांगे म्हणालेत. तर गणपतीनं राऊतांना सुबुद्धी दिली असावी असा टोला भाजपनं लगावलाय.
देवेंद्र फडणवीसांवर गेल्या काही वर्षांत सामना या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मुखपत्रातून सातत्यानं टीका होते. फडणवीसांच्या प्रत्येक निर्णयावर सामनातून टीका झाली नाही असं होत नाही. याला अपवाद ठरलाय मराठा आरक्षणाचा हैदराबाद गॅझेटियरचा जीआर. सामनातून देवेंद्र फडणवीसांची तोंडभरुन कौतुक करण्यात आलंय.
फडणवीसांचं सामनातून कौतुक
आरक्षणाच्या मुद्द्यावर जरांगे-पाटलांनी मुंबईत येऊन उपोषण, आंदोलन केले. ते यशस्वी झाले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मराठ्यांचे आंदोलन संयमी पद्धतीने हाताळले. त्यांच्यावर चौफेर शिव्यांचा वर्षाव होत असतानाही मुख्यमंत्री फडणवीस विचलित झाले नाहीत हे मान्य करावे लागेल शेवटी ज्या गोष्टी मान्य करता येणे शक्य होते त्या सर्व मागण्या मान्य करून पाटील व त्यांच्या हजारो समर्थकांना गावाकडे परतण्याची वाट निर्माण करून दिली. जरांगे-पाटील यांचे या लढ्यातील श्रेय मोलाचे आहे, पण हे श्रेय जितके जरांगेंचे आहे, तितकेच राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे आहे. मुख्यमंत्र्यांनी तोडगा काढला व आंदोलनाचा शेवट गोड झाला.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी धावाधाव करून आंदोलकांच्या बहुतेक मागण्या मान्य केल्या. मुख्यमंत्री म्हणजे शेवटी सरकारच असतात. मंत्री वगैरे कितीही पॉवरफुल असले तरी सरकार हे मुख्यमंत्र्यांच्याच हुकुमाने चालते. याचा अर्थ शिंदे, अजितदादा पवार वगैरे लोकांना कमी लेखावे असे नाही, पण शिंदे हे भले आहेत हे सांगताना मनोज जरांगे-पाटलांनी देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी अतिजहाल भाषेचा वापर केला. या सर्व प्रकरणात टीकेचे धनी मुख्यमंत्री झाले व भलतेच लोक ‘भले’ ठरले. हे अनाकलनीय आहे.
शिवसेनेचा फडणवीसांना टोला
सामनातून फडणवीसांचं कौतुक झालं म्हटल्यावर भाजपलाही आकाश ठेंगणं झालंय. गणेशोत्सवात फडणवीसांचं कौतुक केल्यानं गणपती बाप्पानं संजय राऊतांना सुबुद्धी दिल्याचा साक्षात्कार झालाय. सामनातून फडणवीसांच्या झालेल्या कौतुकामुळं शिवसेनेच्या पोटात गोळा आलाय. सरकार म्हणून फडणवीसांसोबत एकनाथ शिंदेंही होते. त्यामुळं सामनातून शिंदेंचंही कौतुक अपेक्षित होतं असं परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलंय. संजय राऊतांची एखादी फाईल, एखादं काम फडणवीसांकडं असावं म्हणून कौतुकाचे दोहे गायले जात असल्याचा टोलाही शिवसेनेनं लगावलाय.
मनोज जरांगे पाटलांना फडणवीसांचं सामनातून झालेलं कौतुक मान्य नाही. मराठा तरुणांनी मुंबईत कुणालाही त्रास न देता आंदोलन केलं त्यामुळं हे श्रेय मराठ्यांचं असल्याचं जरांगे म्हणालेत. या शिवाय त्यांनी संजय राऊत आजकाल खूप बोलायला लागले असा टोलाही लगावलाय.
उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांमधील संबंध गेल्या काही दिवसांपासून खूपच मधूर झालेत. अधिवेशन काळात दोन्ही नेत्यांच्या गाठीभेटी होतायेत. साहजिकच हा गोडवा आता ठाकरेचं मुखपत्र असलेल्या सामनातही उतरु लागल्याची चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरु झालीये.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.