
Rain Alert Maharashtra: महाराष्ट्रात कमी दाब क्षेत्र सक्रिय झाल्यामुळे पावसाच्या सरींना वेग आला आहे. कोकण, घाटमाथा आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचे जोरदार आगमन झाले असून, आज (७ सप्टेंबर) पालघर आणि नाशिक घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. याशिवाय मुंबई, ठाणे, रायगड, नंदुरबार आणि पुणे घाटमाथ्यावर येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर छत्रपती संभाजीनगर, जालना, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा आहे.
हवामान तज्ज्ञांचे निरीक्षण
दक्षिण राजस्थान परिसरावर कमी दाबाचे केंद्र निर्माण झाले असून, त्याला लागून चक्राकार वारे वाहत आहेत. या प्रणालीची तीव्रता वाढल्याने राज्यात पावसासाठी पोषक परिस्थिती निर्माण झाली आहे. कोकण किनाऱ्यापासून राजस्थानपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. तर बंगालच्या उपसागरालगत ओडिशा-आंध्र प्रदेश किनाऱ्यापर्यंत समुद्रसपाटीपासून वर चक्राकार वारे दिसून येत आहेत.
पावसाची नोंद
शनिवारी (६ सप्टेंबर) सकाळपर्यंतच्या २४ तासांत रायगड जिल्ह्यातील माथेरान येथे तब्बल १२० मिमी पाऊस झाला. ठाण्यातील अंबरनाथ व पालघरमधील वसई येथे प्रत्येकी १०० मिमी पावसाची नोंद झाली.
तापमानाचा आढावा (६ सप्टेंबर सकाळपर्यंतची नोंद)
पुणे : कमाल २७.८° C, किमान २१.४° C
नाशिक : कमाल २४.३° C, किमान २१.६° C
कोल्हापूर : कमाल २७.२° C, किमान २१.५° C
ब्रह्मपुरी : राज्यातील उच्चांकी ३३.३° C
चंद्रपूर : ३२.६° C
नागपूर : २९.४° C
कुठे कोणता अलर्ट?
ऑरेंज अलर्ट : पालघर, नाशिक घाटमाथा
येलो अलर्ट (जोरदार पाऊस) : मुंबई, ठाणे, रायगड, नंदूरबार, पुणे घाटमाथा
येलो अलर्ट (विजांसह पाऊस) : छत्रपती संभाजीनगर, जालना, चंद्रपूर, गडचिरोली
राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ हवामान व पावसाच्या सरी कायम राहणार असून, नागरिकांनी हवामान खात्याच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.