
Elphinstone Bridge closure: प्रभादेवी आणि परळला जोडणारा मध्य मुंबईतील महत्त्वाचा एल्फिन्स्टन रेल्वे पूल शुक्रवार 12 सप्टेंबर 2025 पासून बंद झाला आहे. अटल सेतूला वरळी सी लिंकशी जोडण्यासाठी उन्नत मार्ग बांधण्याकरिता हा पूल तोडला जाणार आहे. यामुळे वाहनचालकांना करी रोड, चिंचपोकळी आणि दादर येथील टिळक पूल यांसारख्या पर्यायी मार्गांचा अवलंब करावा लागत आहे, ज्यामुळे प्रवासाचा वेळ अर्ध्या ते पाऊण तासाने वाढलाय. इंधनाचा अपव्यय वाढल्याने आणि वाहतूक कोंडीत भर पडल्याने स्थानिक नागरिक त्रस्त आहेत. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
वाहतूक कोंडीत वाढ
पूल बंद झाल्याने वाहतूक टिळक पूल, करी रोड आणि चिंचपोकळी पुलांकडे वळवली गेली आहे, ज्यामुळे दादर, लालबाग, परळ आणि प्रभादेवी परिसरात वाहनांची गर्दी वाढली आहे. शुक्रवार-शनिवारपासूनच कोंडीला सुरुवात झाली असून, सोमवारपासून दक्षिण मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना अधिक त्रास सहन करावा लागण्याची शक्यता आहे. विशेषतः सागरी किनारा मार्ग आणि अटल सेतू वापरणाऱ्या वाहनचालकांनाही याचा फटका बसत आहे.
रुग्णसेवेवर होतोय परिणाम
परळ, लोअर परळ आणि प्रभादेवी परिसरात टाटा, केईएम, वाडिया आणि ग्लोबलसारखी मोठी रुग्णालये आहेत. पूल बंदमुळे रुग्णवाहिका आणि रुग्णांच्या नातेवाइकांना दादर किंवा करी रोडमार्गे वळसा घ्यावा लागत आहे, ज्यामुळे आपत्कालीन वैद्यकीय सेवांवर परिणाम होत आहे. दुपारी 3 ते रात्री 11 या वेळेत करी रोड पुलाचा वापर करावा लागत असल्याने रुग्णांचे हाल वाढले आहेत.
स्थानिकांच्या मागण्या काय?
पूल पाडण्यामुळे प्रभावित इमारतींच्या रहिवाशांमध्ये असंतोष आहे. स्थानिकांनी वाहतूक नियोजनासाठी अतिरिक्त पोलिस तैनात करणे, रुग्णवाहिकांसाठी प्राधान्य मार्गिका आणि स्थानिक पातळीवर आयसीयू सुविधा उभारण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून नीट वाहतूक व्यवस्थापनाचे आदेश देण्याची विनंती केली आहे.
प्रवास वेळ आणि इंधन खर्चात वाढ
पूर्वी परळ-प्रभादेवी प्रवासाला 5 ते 7 मिनिटे लागत होती. तिथे आता वळसा मार्गामुळे 2 ते 3 किमी अंतर वाढलंय. त्यामुळे वाहनचालकांचा 30 मिनिटे ते पाऊण तास इतका अधिक वेळ जातोय. यामुळे इंधन खर्च तर वाढलायच त्यासोबत टॅक्सीचालक आणि प्रवाशांमध्ये भाड्यावरून वाद होण्याचे प्रकारही वाढलेयत. पोलिसांनी तोडकामादरम्यान बंदोबस्त ठेवला असून, कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी दक्षता घेतली जात आहे.
FAQ
प्रश्न: एल्फिन्स्टन पूल का बंद करण्यात आला आहे?
उत्तर: प्रभादेवी आणि परळला जोडणारा एल्फिन्स्टन रेल्वे पूल अटल सेतूला वरळी सी लिंकशी उन्नत मार्गाद्वारे जोडण्यासाठी तोडला जाणार आहे. यासाठी १२ सप्टेंबर २०२५ पासून पूल बंद करण्यात आला आहे, ज्यामुळे वाहतूक करी रोड, चिंचपोकळी आणि टिळक पूल या पर्यायी मार्गांवर वळवण्यात आली आहे.
प्रश्न: पूल बंद झाल्याने कोणत्या भागांवर परिणाम झाला आहे?
उत्तर: दादर पूर्व-पश्चिम, परळ, प्रभादेवी, लोअर परळ, भायखळा, वरळी आणि सागरी किनारा मार्ग वापरणाऱ्या वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. विशेषतः टाटा, केईएम आणि ग्लोबल रुग्णालयांत जाणाऱ्या रुग्णवाहिका आणि रुग्णांच्या नातेवाइकांना मोठा त्रास होत आहे, कारण प्रवासाचा वेळ ३० मिनिटांहून अधिक वाढला आहे.
प्रश्न: स्थानिकांनी कोणत्या मागण्या केल्या आहेत?
उत्तर: स्थानिकांनी वाहतूक नियोजनासाठी अतिरिक्त पोलिस तैनात करणे, रुग्णवाहिकांसाठी प्राधान्य मार्गिका आणि स्थानिक पातळीवर आयसीयू सुविधा उभारण्याची मागणी केली आहे. तसेच, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून नीट वाहतूक व्यवस्थापनाचे आदेश देण्याची विनंती केली आहे, जेणेकरून रुग्णसेवा आणि प्रवासावरील ताण कमी होईल.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.