
मराठवाडा मुक्तिसंग्रामासाठी अनेक हुतात्मे आणि स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेल्या लढ्याचे योगदान अमूल्य असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य मंत्री तथा हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी बुधवारी ता. १७ येथे केले.
.
हिंगोलीत स्वातंत्र्यसेनानी अण्णासाहेब टाकळगव्हाणकर बाल उद्यानातील हुतात्मा स्मारक स्मृतिस्तंभ येथे आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ प्रसंगी झिरवाळ बोलत होते. यावेळी स्वातंत्र्य सैनिकांचे कुटुंबीय मालती पैठणकर, आमदार तान्हाजी मुटकुळे, माजी आमदार गजानन घुगे, रामराव वडकुते, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती अंजली रमेश, राज्य राखीव पोलीस दलाच्या महानिदेशक पौर्णिमा गायकवाड उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री झिरवाळ म्हणाले, ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली मुक्तिसंग्रामाचा लढा सुरु झाला होता. मराठवाड्याच्या प्रत्येक गावातून स्वातंत्र्य सैनिकांनी शौर्याने हा लढा लढला. यामध्ये अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी प्राणांची आहुती दिल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत सेवा पंधरवडा राबवण्यात येणार आहे. यामध्ये गावांमधील पाणंद व रस्त्यांचे सर्वेक्षण केले जाईल. सर्वासाठी घरे’ उपक्रमांतर्गत पात्र लाभार्थ्यांना शासकीय जमिनींचे पट्टे वाटप, जनतेच्या तक्रारी सोडवण्यासाठी जनता दरबाराचे आयोजन केले जाईल. गेल्या आठवड्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची कार्यवाही सुरु असून लवकरच त्यांना मदत मिळवून देण्याची कार्यवाही सुरू करणार असल्याचे पालकमंत्री झिरवाळ यांनी सांगितले.
यावेळी जिल्ह्यातील मराठा समाज बांधवांना पालकमंत्री झिरवाळ यांच्या हस्ते कुणबी प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. तसेच वसमत येथे उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार शारदा दळवी यांच्या हस्ते कुणबी प्रमाणपत्र देण्यात आले आहे. सूत्रसंचालन पंडीत अवचार यांनी केले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



