
Praniti Shinde On Farmers Loss: राज्यभरात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोलापूरमधील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. मात्र, राज्य सरकारने जाहीर केलेले मदतपॅकेज तुटपुंजे असून त्यात कोणतेही वास्तव नाही अशी तीव्र प्रतिक्रिया प्रणिती शिंदे यांनी दिली आहे. सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजमध्ये मोठ्या मदतीचा गाजावाजा केला असला तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या हाती फारच कमी मदत येते अशी नाराजी प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली आहे.
शेतकऱ्यांच्या मते, ‘पॅकेज जाहीर केलं की आकड्यांनी ते मोठं वाटतं, पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मिळणारी मदत 15 ते 18 हजार रुपयांच्या दरम्यानच असते.’ मात्र, आमची मागणी अशी आहे की प्रत्येक शेतकऱ्याला किमान 50 हजार रुपयांची मदत मिळाली पाहिजे असं प्रणिती शिंदे म्हणाल्या.
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान
अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांची शेती पूर्णपणे वाहून गेली आहे. शेतमाल, फळबागा आणि जमिनी खरडून गेल्या आहेत. या शेतकऱ्यांना पुन्हा उभं राहण्यासाठी किमान दोन ते तीन वर्षे लागणार आहेत, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अशा शेतकऱ्यांसाठी वेगळं विशेष पॅकेज जाहीर करणे गरजेचं आहे, अशी मागणी प्रणिती शिंदे यांनी केली आहे.
कर्जमाफी आणि ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की, राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर केला तर आपोआप पीककर्ज माफीचा मार्ग मोकळा होईल. पण आतापर्यंत सरकारकडून याबाबत कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही. सोलापूर आणि मराठवाडा जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर खरी संकटाची वेळ आली आहे. ही अतिवृष्टी नैसर्गिक नसून शासनाच्या चुकीच्या पाणी नियोजनामुळे झाली आहे. त्यामुळे या परिस्थितीला सरकारच जबाबदार आहे असं देखील प्रणिती शिंदे म्हणाल्या.
केंद्राकडे प्रस्ताव पाठवण्यात दिरंगाई का?
शेतकऱ्यांचा सवाल आहे की, महाराष्ट्र शासनाने ओल्या दुष्काळाचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे का पाठवला नाही? ट्रिपल इंजिन सरकार असूनसुद्धा एवढी दिरंगाई का? बिहारमध्ये निवडणुका असल्यामुळे तिथे सरकारकडून निधी ‘टपाटप’ पाठवला जातो पण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडे मात्र पूर्ण दुर्लक्ष केलं जातं, अशी टीका देखील यावेळी प्रणिती शिंदे यांनी केली.
शेतकऱ्यांच्या भावना व्यक्त करत असताना एका नेत्याने सांगितले, हे मायबाप सरकार असल्याचा दावा केला जातो पण हे सरकार मायबापाची भूमिका निभावू शकत नाही. शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील अश्रू, त्यांच्या शेतातील विनाश याकडे सरकार दुर्लक्ष करत आहे. सध्या शेतकऱ्यांची एकच मागणी स्पष्ट आहे. ओला दुष्काळ जाहीर करा, कर्जमाफी करा आणि प्रत्यक्ष मदत द्या. राज्य सरकारने तत्काळ निर्णय घेऊन शेतकऱ्यांच्या जिवावर आलेल्या या संकटावर दिलासा द्यावा, अशी मागणी सर्वत्र होत आहे.
FAQ
प्रणिती शिंदे यांनी राज्य सरकारच्या मदतपॅकेजवर काय टीका केली?
प्रणिती शिंदे यांनी सांगितले की, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, सरकारचे मदतपॅकेज तुटपुंजे आहे. आकड्यांनी मोठे वाटते, पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांना १५-१८ हजार रुपयांपेक्षा जास्त मिळत नाही.
शेतकऱ्यांची मुख्य मागणी काय?
प्रत्येक शेतकऱ्याला किमान ५० हजार रुपयांची मदत मिळावी, ओला दुष्काळ जाहीर करावा आणि पीककर्ज माफी करावी, अशी मागणी आहे.
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान काय?
शेती, फळबागा आणि जमिनी वाहून गेल्या. पुन्हा उभे राहण्यासाठी २-३ वर्षे लागतील. सोलापूर आणि मराठवाड्यातील शेतकरी संकटात आहेत.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.