
माजी खासदार इम्तियाज जलील यांनी छत्रपती संभाजीनगर येथील रामनवमीपूर्वीची दंगल राज्य पुरस्कृत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. निवडणूक जिंकण्यासाठी हिंदू आणि मुस्लिम दंगली घडवून भीतीचे वातावरण निर्माण केले जात असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
.
पुण्यातील कोथरूड येथील गांधी भवन येथे महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दल यांच्या वतीने आयोजित राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताहात ‘महात्मा गांधी आणि राष्ट्रीय एकात्मता’ या विषयावर ते बोलत होते. यावेळी त्यांनी विविध सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर आपले विचार मांडले.
जलील म्हणाले की, रामनवमी दंगलीत पोलिसांना घटनास्थळी उपस्थित न राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे पोलीस तिथे नव्हते. धर्म हा सध्या एक मोठा धंदा बनला असून, सुशिक्षित लोकही सोशल मीडियावरच्या पोस्टमुळे कसे बळी पडतात, हे पाहणे दुःखदायक आहे. त्यांनी धर्म आणि जातीमधील वाद मिटवण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
राजकारणाचा स्तर ज्या प्रकारे घसरत आहे, त्यामुळे देशातील परिस्थिती चिंताजनक बनली आहे. सत्ताधारी पक्ष आपली खुर्ची टिकवण्यासाठी जाती-धर्मात भांडणे लावत आहे. देशात काही चांगले लोक असल्यामुळेच देश अजूनही व्यवस्थित सुरू आहे, असेही ते म्हणाले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी छत्रपती संभाजीनगर ते पुणे हा प्रवास एकदा करून दाखवावा,मी त्यांना २० हजार रुपये बक्षीस देतो असे आव्हान जलील यांनी दिले. या प्रवासाला त्यांना आठ तास लागल्याचे सांगत, विकासाच्या नावावर गप्पा मारणारे साधा रस्ताही विकसित करू शकत नाहीत, अशी टीका त्यांनी केली.
आपल्यावर अनेक केसेस दाखल करण्यात आल्या असून, हर्सूल कारागृहात पाठवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही त्यांनी सांगितले. २४ वर्षांच्या पत्रकारितेचा अनुभव असलेल्या जलील यांनी महात्मा गांधींच्या शिकवणीनुसार आपण वाटचाल करत आहोत का, हे तपासण्याची गरज व्यक्त केली. चांगल्या लोकांनी आता गप्प न बसता आवाज उठवण्याची वेळ आली आहे, असे आवाहनही त्यांनी केले.
हाताला काम मागितले तर दगड मिळतो, एकता मागितली तर जाती धर्मात तेढ निर्माण केला जातो आणि शांतता हवी तर दंगल दिली जाते, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. शहरातील जातीचे विष आता ग्रामीण भागातही पोहोचले असून, एकत्र राहणारे लोक विभक्त झाले आहेत. देशात आणि राज्यात जातीय तेढ नेमके कोण निर्माण करते, याचा तपास व्हायला हवा, असेही ते म्हणाले.
यावेळी महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी, डॉ. शिवाजी कदम, सचिव अन्वर राजन, डॉ. एम.एस. जाधव आणि स्वप्नील तोंडे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.