
Independent MLA Honey Trap: कोल्हापुरमधील चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांना मोबाइलद्वारे अश्लील मेसेज आणि फोटो पाठवून त्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकविण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. अश्लील मेसेज करुन शिवाजी पाटलांकडे दहा लाख रुपयांची मागणी एका महिलेने केली. पाटील यांनी ठाण्यातील चितळसर पोलिस ठाण्यात बुधवारी तक्रार दाखल केल्यानंतर माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदारालाच हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
चॅटिंगपासून सुरुवात
ही अनोळखी महिला पाटील यांना गेल्या वर्षभरापासून वेगवेगळ्या मोबाइल क्रमांकावरून फोन करत होती. तिने सुरुवातीला त्यांच्याशी चॅटिंग केल्यानंतर त्यांना फोन करून मैत्रीची इच्छा व्यक्त केली. संवाद वाढल्यावर काही तरुणींचे अश्लील फोटो पाठविले. पुढे त्यांच्याकडे तिने कधी एक लाख, कधी दोन लाख तर कधी पाच लाख रुपये अशी एकूण दहा लाखांची मागणी केली.
अश्लील फोटो पाठवले अन्…
काही दिवसांनंतर आमदारांनी त्या महिलेचा त्रास वाढल्याने तिला ब्लॉक केले. परंतु, विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान तिने दुसऱ्या क्रमांकावरून पुन्हा संपर्क साधत अश्लील छायाचित्रे आणि संदेश पाठवण्यास सुरुवात केली. पैसे न दिल्यास पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करीन आणि राजकीय प्रतिमा मलिन करीन, अशी धमकीही तिने दिली.
सायबर हनी ट्रॅपचा प्रकार
पैशांची मागणी वाढल्यानंतर पाटील यांनी 8 ऑक्टोबर रोजी ठाण्यातील चितळसर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. प्राथमिक तपासात सायबर हनी ट्रॅपचा हा प्रकार असून, आरोपी महिलेचा शोध घेण्यासाठी तांत्रिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
हनी ट्रॅप म्हणजे काय?
हनी ट्रॅप म्हणजे एखाद्याला महिलांच्या मदतीने जाळ्यात ओढण्याचा प्रकार असतो. महिलांचे आकर्षण, प्रेम किंवा लैंगिक संबंधांच्या बहाण्याने व्यक्तींना टार्गेट केलं जातं. सामान्यपणे उच्चपदस्थ अधिकारी, राजकारणी किंवा सामान्यांनाही हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचे प्रकार यापूर्वी घडलेले आहेत. ही पद्धत मुख्यपणे हेरगिरी, राजकीय किंवा आर्थिक उद्देशांसाठी वापरली जाते. दुश्मन देशाच्या व्यक्तीशी प्रेमसंबंध जोडून माहिती काढली जाते आणि नंतर ती वापरून टार्गेट केलेल्या व्यक्तीला ब्लॅकमेल केले जाते. गोपनीय माहिती, पैसे किंवा इतर फायदा मिळवण्याच्या हेतूने हनी ट्रॅपिंग केलं जातं. असाच काहीसा प्रकार कोल्हापुरमधील चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांच्यासोबत घडला असता. मात्र त्यांनी वेळीच पोलिसांकडे तक्रार दाखल केल्याने हा प्रकार समोर आला असून पोलीस पुढील चौकशी करत आहे.
अपक्ष लढूनही आमदार
2024 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत पाटील यांनी चंदगड विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून विजय मिळवला. त्यांना 84,254 मते मिळाली आणि त्यांनी त्यांचे जवळचे प्रतिस्पर्धी आणि विद्यमान आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजेश नरसिंगराव पाटील यांचा 24,134 मतांनी पराभव केला. विजयी झाल्यानंतर पाटील यांनी भाजपाला समर्थन दिलं आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.