
प्रफुल्ल पवार, झी मीडिया, अलिबाग : (Raigad News) सारं जग सध्या एकविसाव्या शतकात वावरत असलं तरीही देवदेवस्की आणि अंधश्रद्धेच्या चक्रव्युहातून मात्र अद्याप आपली सुटका झाली नसल्याचा प्रत्यय (Alibag News) अलिबाग तालुक्यात आला आहे. मांत्रिकांच्या बतावणीवर विश्वास ठेवत मुलाच्या मुत्यूस कारणीभूत असल्याच्या संशयावरून गावकी भरवून एका कुटुंबास वाळीत टाकण्यात आल्याची धक्कादायक घटना इथं घडली आहे. जो रायगड जिल्हा स्वराज्याची राजधानी म्हणून ओळखला जातो त्याच रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात घडलेल्या या प्रकरणानं सध्या अनेकांना विचलित केलं आहे.
सदर प्रकरणी तक्रारीनुसार रेवदंडा पोलिसांनी रामराज-खैरवाडी येथील 33 जणांवर गुन्हा दाखल केला. ज्यानंतर मागील चार वर्षे हे कुटुंब सामाजिक बहिष्कार सहन करत असल्याची खेदजनक बाब समोर आली.
घटना यंत्रणेलाही खडबडून जाग आणणारी…
खैरवाडी येथील धर्मा दामू गडखळ यांचा 15 वर्षीय मुलगा कुणाल अचानक आजारी पडला. या आजारपणातच त्याचा 2019 मध्ये मृत्यू झाला. या घटनेनंतर पाटवाडी गावातील मांत्रिक लहू गडखळ आणि मधू गडखळ यांच्याकडे ते गेले. खैरवाडी गावातील तुकाराम दरोडा यांनी तुमच्या मुलावर देवदेवस्की केली त्यामुळेच त्याचा मृत्यू झाला असं सांगत या मांत्रिकांनी त्यांचे कान भरले.
मानगुटीवर संशयाचे भूत बसले…
गडखळ कुटुंबाच्या मानगुटीवर संशयाचे भूत बसले. त्यांनी तातडीने गावकीची बैठक बोलावली. 16 सप्टेंबर 2021 रोजी गावातील समाज मंदिरामध्ये झालेल्या बैठकीत तुकाराम दरोडा यांच्यावर देवदेवस्कीसह करणीचा ठपका ठेवण्यात आला. त्याचा दंड म्हणून तुकाराम दरोडा यांच्याकडे गावकीने 60 हजार रूपये दंडाची मागणी केली. दरोडा यांनी दंड भरण्यास नकार दिल्याने गावकीतील पंच आणि ग्रामस्थ अशा 33 जणांनी दरोडा कुटुंबाला वाळीत टाकण्याचा निर्णय घेतला. तसा ठराव मंजूर करून दरोडा कुटुंबाशी संबध ठेवणाऱ्यांस प्रत्येकी रूपये 5 हजार रूपये दंड ठेवण्यात येईल, शिवाय संबंध उघडकीस आणून देणाऱ्यास 1 हजार बक्षीस देण्यात येईल, असं घोषित करण्यात आलं.
कुटुंबाला तांदळातील खड्याप्रमाणं वेगळं पाडलं…
दरोडा कुटुंबावर सामाजीक बहिष्कार टाकल्याने गावातील सामाजीक धार्मिक रूढीरिवाज, विधी परंपरेचे पालन करण्यास तसेच सामाजिक, धार्मिक, सामुहिक कार्यक्रमात प्रार्थना, सभा, मेळावा, मिरवणूका, यात सहभाग घेण्यास प्रतिबंध करण्यात आला. तसेच त्यांना गावातील सुखदुःखाच्या कार्यात सहभाग घेण्यापासून, गावातील मंदिरात ,समाज मंदिरात प्रवेश करण्यापासून वंचीत ठेवण्यात आलं. गेली चार वर्षे दरोडा कुटुंब हा सामाजिक बहिष्कार सहन करत होतं. मात्र आता हा अन्याय असह्य झाल्याने अखेर तुकाराम दरोडा यांनी रेवदंडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या प्रकरणी रेवदंडा पोलिसांनी सामाजिक बहिष्कार प्रतिबंध अधिनियम 2016 कलम 3(1), (2), (3), (4), (6), (8), (9), (10), (13), अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
FAQ
ही घटना कुठे आणि कशाबाबत आहे?
रायगड जिल्ह्याच्या अलिबाग तालुक्यातील खैरवाडी गावात (रेवदंडा) ही घटना घडली. एका कुटुंबावर अंधश्रद्धा आणि देवदेवसीच्या संशयावरून सामाजिक बहिष्कार टाकण्यात आला.
घटनेची पार्श्वभूमी काय आहे?
2019 मध्ये खैरवाडी गावातील धर्मा दामू गडखळ यांचा 15 वर्षीय मुलगा कुणाल अचानक आजारी पडून मृत्यू पावला. या घटनेनंतर गडखळ कुटुंबाने पाटवाडी गावातील मांत्रिक लहू गडखळ आणि मधू गडखळ यांच्याकडे मदत मागितली.
गावकीची बैठक कधी आणि काय ठरले?
16 सप्टेंबर 2021 रोजी गावातील समाज मंदिरात गावकीची बैठक झाली. तुकाराम दरोडा यांच्यावर देवदेवसी आणि करणीचा ठपका ठेवण्यात आला. दंड म्हणून 60 हजार रुपये मागितले गेले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.