
Sterilization of Leopard: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्रमधील एका महत्त्वाच्या जिल्ह्यात बिबट्या आणि मानवामधील संघर्षाच्या घटना वाढल्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी महत्त्वाची घोषणा केली. पुण्यामध्ये प्रसारमाध्यमांशी चर्चा करताना अजित पवारांनी बिबट्यांची नसबंदी केली जाणार असल्याचं म्हटलं आहे. एवढ्यावरच न थांबता अजित पवारांनी गुजरातमधील ‘वनतारा’ येथेही बिबटे पाठवले जाणार असल्याचं नमूद केलं आहे.
बिबट्यांची नसबंदी
पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना, “बिबट्यांची संख्या कमी जास्त असल्याचे सांगितले जात आहे. बिबट्यांची नसबंदी करायची आहे. सव्वाशे बिबटे एके ठिकाणी बंदिस्त करायचे असून वनाताराकडे काही द्यायचे चालले आहे. हजार बिबट्यांसंदर्भात कारवाई केली जाणार आहे,” असं अजित पवारांनी स्पष्ट केलं.
40 कोटी रुपये लागतील
बिबट्यासंदर्भातील समस्या आपण केंद्र सरकारकडेही मांडल्याचं अजित पवारांनी नमूद केलं. “ही अडचण ताबडतोड सोडवू असे दिल्लीतून सांगितले आहे. त्यासंदर्भातील बैठकीसाठी लोकप्रतिनिधी उपस्थित राहतील. या कामासाठी अजून 40 कोटी रुपये लागतील,” असंही अजित पवारांनी सांगितलं.
कृषी केंद्रांची पहाणी
पुण्यात अजित पवारांनी कृषी केंद्रांची पहाणी केली. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवारांनी, “कृषी विभागाला किती निधी लागेल? अजून कसला समावेश करावा लागेल? बारामती आणि जुन्नर तालुक्यातील कृषी केंद्रात काय काम चालू आहे याची माहिती घेतली. या केंद्रासंदर्भात काही अडचणी येणार नाही, शेतकऱ्यांना अडचणी जाणवल्या तर त्याला मदत केली जाईल,” असं सांगितलं. कृषी केंद्रांसंदर्भात 36 जिल्ह्यासाठी काम चालले आहे. निधी देण्याचे ठरवले आहे, असंही अजित पवार म्हणाले.
पुणे जिल्ह्यात कुठे कुठे आढळतात बिबटे?
पुणे जिल्हा हा बिबट्यांच्या घनदाट वस्तव्यामुळे मानव-वन्यप्राणी संघर्षाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील भाग आहे. जिल्ह्यातील जुन्नर, शिरूर, अंबेगाव आणि खेड या तालुक्यांमध्ये बिबट्यांची मोठी संख्या असल्यामुळे शेती, ग्रामीण भाग आणि शहरी हद्दीपर्यंत बिबट्यांचा मुक्त संचार होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या समस्येचे मुख्य कारण म्हणजे वनक्षेत्रातील अतिक्रमण, शेतीची वाढ आणि बिबट्यांच्या नैसर्गिक निवासस्थानांचे विनाश. परिणामी, हल्ले, मृत्यू आणि जखमी होण्याच्या घटना वाढत आहेत.
अलीकडील घटना
13 ऑक्टोबर 2025: शिरूर तालुक्यातील पिंपरखेड गावात पाच वर्षांच्या शिवान्य बोंबे या चिमुकलीवर बिबट्याने दिवसाढवळ्या हल्ला केला. या हल्ल्यात तिचा मृत्यू झाला.
सप्टेंबर 2025: जुन्नर तालुक्यातील कुमशेत येथे सहा वर्षांच्या मुलाची बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. ही जिल्ह्यातील एप्रिलनंतरची दुसरी घटना ठरली.
सप्टेंबर 2025: जुन्नरमध्येच सात वर्षांच्या मुलाची बिबट्याने हत्या केली.
इतर घटना: पुणे विमानतळावर बिबट्याचे दर्शन (एप्रिल 2025), मुळशी तालुक्यातील भूगाव येथे शेळीवर हल्ला (जून 2025), आणि नागरगाव येथे सीसीटीव्हीमध्ये बिबट्याचा मुक्त संचार दिसून आला. या घटनांमुळे गावकऱ्यांमध्ये भीती पसरली असून, रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणे धोकादायक झाले आहे.
उपाययोजना
वन विभागाचे प्रयत्न: जुन्नर वन विभागात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) वापरून बिबट्यांचे निरीक्षण, कॅमेरा ट्रॅपिंग आणि जागृती मोहिमा. माणिकडोह बिबट्या निवास केंद्रात जखमी बिबट्यांचे उपचार सुरु आहेत.
राजकीय पाठबळ: अजित पवारांसारख्या नेत्यांनी विशेष बैठक घेऊन उपाय सुचवले. जिल्ह्याला ‘बिबट्या आपत्तीग्रस्त’ जाहीर करण्याची मागणी केली आहे.
सल्ला: स्थानिकांनी रात्रीच्या वेळी घराबाहेर न पडणे, कुत्रे-मुले लक्षात ठेवणे आणि वन विभागाशी संपर्क साधावा.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.