
दीपावलीच्या सणाची लगबग, घराघरांत आनंदाचे वातावरण असताना जालना शहरात सोमवारी सकाळी एक हृदयद्रावक आणि मन सुन्न करणारी घटना घडली. यशवंत नगर परिसरात राहणाऱ्या तीन वर्षीय चिमुकली परी दीपक गोस्वामी हिचा भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची माहिती
.
ही घटना घडताच शहरभरात शोककळा पसरली असून, नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. शहरातील मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे पुन्हा एकदा महापालिका प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. घटनेविषयी मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, जालना-अंबड राज्य महामार्गालगत असलेल्या यशवंत नगर परिसरात सकाळी नऊच्या सुमारास स्थानिक नागरिकांना एका लहान मुलीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. नागरिकांनी जवळ जाऊन पाहिले असता, ती मुलगी त्यांच्या परिसरातील परी दीपक गोस्वामी असल्याचे समोर आले. परीच्या शरीरावर सर्वत्र कुत्र्यांच्या चाव्याच्या खुणा होत्या. हे दृश्य पाहून सर्वजण हादरून गेले.
घटनेची माहिती मिळताच परीचे आई-वडील घटनास्थळी पोहोचले. आपल्या लेकीचा निर्जीव देह पाहताच त्यांनी एकच हंबरडा फोडला, आणि परिसरात शोकाकुल वातावरण पसरले. स्थानिकांनी तातडीने तालुका जालना पोलिस ठाण्याला याबाबत कळवले. माहिती मिळताच पोलिस निरीक्षक संतोष साबळे यांच्यासह पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक अजय कुमार बंसल, अपर पोलिस अधीक्षक आयुष नोपानी, तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी स्वतः तपासाची सूत्रे हाती घेतली. त्यांनी फॉरेन्सिक तज्ज्ञांची टीम घटनास्थळी पाठवली असून, सर्व पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. पोलिसांनी सांगितलं की, प्रथमदर्शनी परीवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला करून तिचा मृत्यू झाल्याचे दिसते आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच निश्चित सांगता येईल.
दीपावलीत शहरात शोककळा
दरवर्षीप्रमाणे शहरात दीपावलीच्या तयारीचा उत्साह सुरू होता. मात्र, परीच्या मृत्यूच्या बातमीने सणाचा रंगच फिका पडला आहे. या घटनेबाबत सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. परिसरात नागरिकांनी भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येबाबत महापालिका प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे. परीचे वडील दीपक गोस्वामी हे शहरातील एका कंपनीत इंजिनियर म्हणून कार्यरत आहेत, तर आई गृहिणी आहे. परीला सहा वर्षांची मोठी बहीण असून, दोन्ही मुली घरातील लाडक्या होत्या. या हसऱ्या, आनंदी कुटुंबावर अचानक आलेल्या या दुर्दैवी प्रसंगामुळे संपूर्ण यशवंत नगर परिसरात शोककळा पसरली आहे. हसत्या खेळत्या घरावर काळ आला, अशी भावना सर्वत्र व्यक्त केली जात आहे.
शहरभर चर्चेचा विषय- हल्ला की घातपात?
ही घटना समोर आल्यानंतर शहरभर चर्चा सुरू झाली की परीसोबत नेमके काय घडले? काहींनी कुत्र्यांच्या हल्ल्याची शक्यता मांडली, तर काहींनी दुसऱ्या प्रकारची शंका उपस्थित केली. पोलिसांनी मात्र सांगितलं की, फॉरेन्सिक अहवाल आल्यानंतर सर्व गोष्टी स्पष्ट होतील. सध्या आम्ही सर्व बाजूने तपास सुरू केला आहे. त्याचबरोबर, परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहेत. कोणत्याही संशयास्पद हालचालींचा मागोवा घेतला जात आहे.
महापालिकेच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह
जालना महापालिका हद्दीत गेल्या काही महिन्यांपासून भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढत चालला आहे. नागरिकांकडून वारंवार तक्रारी करण्यात येऊनही कोणतीही ठोस कारवाई होत नाही, अशी नाराजी व्यक्त होत आहे. दोन ते तीन महिन्यांपूर्वी गांधीनगर भागातही एका चिमुरडीवर मोकाट कुत्र्यांनी हल्ला करून जीव घेतला होता. आणखी एका घटनेत एका मुलीला तोंड व नाकाला गंभीर चावे लागले होते. त्या वेळी नागरिकांनी महापालिकेकडे कडक उपाययोजनांची मागणी केली होती. मात्र, प्रशासनाने फक्त कुत्रे पकड मोहीम सुरू केली, असा दावा करून प्रकरण थंड केले. आता पुन्हा अशीच दुर्दैवी घटना घडल्याने नागरिक संतप्त झाले आहेत.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.