
Weather News Winter in india : उत्तर भारतातील (Himachal Pradeh, Uttarakhand, Jammu Kashmir) हिमाचल, उत्तराखंड आणि जम्मू काश्मीरमध्ये थंडीचा कडाका वाढत असतानाच महाराष्ट्रावरही या शीतलहरीचा परिणाम पाहायला मिळत आहे. प्रामुख्यानं उत्तर महाराष्ट्रात तापमानानं नीचांकी आकडा गाठलेला असतानाच विदर्भ आणि कोकणही आता या हिवाळ्याच्या लाटेत अपवाद ठरत नाहीयेत. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात आता थंडीचा कडाका वाढत असून, पारा दर दिवसागणिक घटताना दिसत आहे. मुंबई शहर आणि उपनगरही इथं अपवाद ठरत नसून, शहरात पहाटेच्या वेळी तापमानात घट होत असून, दुपारच्या वेळी मात्र प्रचंड उष्मा जाणवत आहे.
जळगाव जिल्ह्यात तिसऱ्या दिवशीही थंडीचा कडाका कायम असल्याचं पाहायला मिळत असून, हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार उत्तरेकडील थंड वारे सक्रिय झाल्याने जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला आहे. जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी तापमान 9° खाली आलं होतं मात्र दोन दिवसापासून जिल्ह्याचं तापमान 11° वर पोहोचल्याची माहिती आहे.
नागरिकांनी घेतला शेकोटीचा आधार…
जळगाव जिल्ह्यात तिसऱ्या दिवशी थंडीचा कडाका कायम असून काही प्रमाणात तापमानात वाढ झाली असली तरी हुडहुडी भरवणारी थंडी कायम असल्याने ठिकठिकाणी नागरिक शेकोटीचा आधार घेत आहेत. फक्त उत्तर महाराष्ट्रच नव्हे तर थंडीचा कडाका पहाटेच्या आणि रात्रीच्या वेळी अधिक जाणवत असल्यानं ठिकठिकाणी नागरिकही शेकोटीचा आधार घेताना दिसत आहेत.
धुळे शहरासह जिल्ह्याचा तापमानाचा पाराही दिवसागणिक कमी होत आहे. जिल्ह्यात राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद होत असून, विशेष म्हणजे आता तापमानाचा पारा हा आठ अंश सेल्सिअस कडून पाच अंश सेल्सिअस कडे वाटचाल करत आहे, ज्यामुळं आता महाराष्ट्रात थंडीची लाट जवळपास पोहोचली आहे असं म्हणणं अपवाद ठरणार नाही. वाढत्या थंडीचा कडाका हा शाळकरी विद्यार्थ्यांसाठी मात्र त्रासदायक ठरत आहे. एकिकडे शाळांचे वेळ बदलावी अशी मागणी पालकांनी केलेली आहे. मात्र शिक्षण विभागाने अद्याप त्यासंदर्भात निर्णय घेतल्याचं पाहायला मिळालं नाहीय.
कडाक्याच्या थंडीचा जनजीवनावर प्रचंड परिणाम दिसून येत आहेत. सकाळच्या वेळी धुक्याची चादर असल्यानं दृश्यमानतेवर याचा होणारा परिणाम पाहता वाहतुकीवर याचा परिणाम होत आहे. तर, थंडीमुळं रस्ते निर्मनुष्य होत आहेत. अनावश्यक घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांची संख्या देखील कमी झालेली आहे. शाळकरी विद्यार्थी आणि व्यायाम करणारी मंडळी आणि बाजार समितीमध्ये येणारे शेतकरीच सध्या रस्त्यांवर दिसून येत आहे.
दक्षिण भारतात पाऊस, उत्तर भारतात हिमवर्षाव…
केंद्रीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार पुढील 48 तासांमध्ये दक्षिण भारतात पावसाची हजेरी असू शकते. केरळ, तामिळनाडू, अंदमान निकोबार बेट समूह आणि लक्षद्वीपच्या बहुतांश भागांमध्ये पावसाची हजेरी लागू शकेल असा प्राथमिक अंदाज आहे. तर, पूर्वोत्तर भारतातील अरुणाचल प्रदेश आणि नजीकच्या भागातही पावसाची हजेरी असेल असा प्राथमिक अंदाज आहे. मेघालयातील काही भागांमध्ये पाऊस तर, डोंगळार भागांमध्ये मात्र थंडीचा कडाका वाढण्याचा अंदाज आहे.
काश्मीरचं खोरं, गुलमर्ग, पहलगाम, श्रीनगर इथं होणाऱ्या बर्फवृष्टीमुळं तापमान शून्याच्याही खाली आलं आहे. हवामान विभागानं या भागासाठी 16 नोव्हेंबरनंतर नव्यानं पश्चिमी झंझावात सक्रिय होणार असल्याचा इशारा जारी केला आहे. तर, तिथं हिमाचल प्रदेशाकही थंडीचा कडाका वाढल्यानं दुर्गम भागांमध्ये राहणाऱ्यांच्या दैनंदिन जीवनावर याचा परिणाम झाला आहे. मात्र पर्यटकांसाठी कडाक्याच्या थंडीचा हा अनुभव आनंददायी ठरत असल्याचं पाहायला मिळत आहे.
FAQ
उत्तर भारतातील हिवाळी स्थिती कशी आहे?
उत्तर भारतातील हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू काश्मीरमध्ये थंडीचा कडाका वाढत आहे. काश्मीर खोऱ्यात, गुलमर्ग, पहलगाम आणि श्रीनगरमध्ये बर्फवृष्टीमुळे तापमान शून्याच्या खाली गेले आहे. हवामान विभागाने 16 नोव्हेंबरनंतर पश्चिमी झंझावात सक्रिय होण्याचा इशारा दिला
महाराष्ट्रात हिवाळ्याचा परिणाम कसा दिसत आहे?
महाराष्ट्रावर उत्तर भारतातील शीतलहरीचा प्रभाव पडत आहे. उत्तर महाराष्ट्र (जळगाव, धुळे), विदर्भ आणि कोकणात तापमान कमी होत आहे. जळगावात तापमान 9° पर्यंत खाली आले होते, आता 11° वर आहे.
थंडीमुळे दैनंदिन जीवनावर कसा परिणाम होत आहे?
थंडीमुळे सकाळी धुक्याची चादर पसरते, ज्यामुळे दृश्यमानता कमी होऊन वाहतुकीवर परिणाम होतो. रस्ते निर्मनुष्य होत आहेत, आणि नागरिक अनावश्यक घराबाहेर पडत नाहीत. शाळकरी विद्यार्थ्यांसाठी थंडी त्रासदायक ठरत आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



