
Mumbai Pune Air Ticket: इंडिगोची सेवा विस्कळीत झाली असल्याने, अनेक विमानांचं उड्डाण रद्द झालं असून, काहींना विलंब झाला आहे. देशभरातील अनके विमानतळांवर प्रवासी अडकून पडले असल्याने, गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आहे. नवीन फ्लाइट ड्युटी टाइम लिमिटेशन (FDTL) या गोंधळाचं मुख्य कारण ठरलं आहे. या नियमामुळे इंडिगोमध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता निर्माण झाली आहे. विमानतळावंर प्रवासी इंडिगोच्या कर्मचाऱ्यांशी वाद घालतानाचे, जाब विचारतानाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. काही ठिकाणी तर माणुसकीचा अभावही दिसत आहे.
इंडिगो एरलाईन्स कंपनीच्या ऑपरेशन समस्यांमुळे प्रवासी ताटकळलेले असताना, दुसरीकडे इतर विमान सेवा कंपन्यांनी दर वाढवले आहेत. पुणे ते मुंबई विमानाचे तिकीट तब्बल 61 हजारांवर गेलं आहे. पुणे ते दिल्ली विमानाचे तिकीट 27 हजार तर पुण्याहून बंगलोरसाठी 49 हजार मोजावे लागत आहेत.
दुसरीकडे मुंबई- नागपूर एअर इंडियाचे तिकीट 63 हजारावर पोहोचले आहे. हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर मुंबई -नागपूर विमान प्रवास प्रचंड महाग झाला आहे.

सलग चौथ्या दिवशी इंडिगो कंपनी गंभीर ऑपरेशनल समस्यांचा सामना करत असल्याने प्रवाशांना फटका बसला आहे. विमान उड्डाणाची संख्या कमी झाल्यामुळे इतर विमान कंपन्यांची तिकिटं मात्र चौपटीने वाढली आहेत. देशभरातून इंडिगो ची तब्बल 600 हून अधिक विमाने आज रद्द झाली आहेत. रद्द होणाऱ्या विमानांची ही संख्या मागील दिवसांपेक्षाही जास्त असल्याने, प्रवाशांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.

इंडिगोचं निवेदन
विमान उड्डाणं रद्द आणि विलंबत होत असल्याच्या पार्श्वभूमीवर IndiGo ने एक निवेदन जारी केलं आहे. “आम्ही पुष्टी करतो की 5 डिसेंबर 2025 रोजी दिल्ली विमानतळावरून (DEL) निघणाऱ्या सर्व इंडिगो देशांतर्गत उड्डाणे रात्री 11.59 पर्यंत रद्द करण्यात आली आहेत. या अनपेक्षित घटनांमुळे गंभीरपणे प्रभावित झालेल्या आमच्या सर्व मौल्यवान ग्राहकांची आणि भागधारकांची आम्ही मनापासून माफी मागतो. आमच्या प्रभावित ग्राहकांना पाठिंबा देण्यासाठी, आम्ही त्यांना अल्पोपहार, त्यांच्या पसंतीनुसार पुढील उपलब्ध उड्डाण पर्याय, हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था, त्यांचे सामान परत मिळविण्यात मदत आणि लागू असल्यास पूर्ण परतफेड देत आहोत”, असं निवेदनात सांगण्यात आलं आहे.
इंडिगोने पुण्याऐवजी हैदराबादला सोडलं
नागपूरातील प्रवाशांना इंडिगोच्या विमानाने पुण्याला जायचे होते. मात्र इंडिगोने प्रवाशांना मध्यरात्री पुण्याऐवजी हैदराबादला सोडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गुरुवारी रात्री 11 वाजून 40 मिनिटांना नागपूर – पुणे अशी इंडिगोचं विमान नियोजित होतं. मात्र त्या विमानाने 1 वाजेपर्यंत उड्डाण केलंच नाही. मात्र अर्ध्या तासाच्या उड्डाणानंतर आपल्या विमानाला पुण्यात लँड होण्याची परवानगी मिळत नाही, त्या ठिकाणी लँड होण्यासाठी जागा नाही, असं कारण सांगून इंडिगो क्रू आणि व्यवस्थापनाने पुण्या ऐवजी हैदराबादला लँड केलं.
हैदराबादला लँड झाल्यानंतरही प्रवाशांना सुमारे एक तास विमानाच्या बाहेर येऊ दिलं नाही. अखेरीस काही प्रवाशांनी विमानात गोंधळ घातला.त्यानंतर त्यांना हैदराबाद टर्मिनल बाहेर निघू दिलं. अजूनही नागपूरचे बरेचशे प्रवासी पुण्याला जाण्यासाठी हैदराबादला अडकून आहेत.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



