
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकीत बोटावरील शाई पुसण्याच्या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. व्होट चोरी एक देशविरोधी कृत्य आहे. विशेषतः निवडणूक आयोगाकडून जनतेची होणारी दिशाभूल हेच लोकशाहीवरील विश्वास संपण्याचे प्रमुख कारण आहे, असे त्यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रातील मुंबईसह 29 महापालिकांसाठी गुरुवारी मतदान झाले. त्यात निवडणूक प्रक्रियेत बोटावर लावण्यात येणाऱ्या शाईवरून मोठा गदारोळ माजला. मतदानानंतर काही वेळातच बोटावरील शाई पुसली जात असल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी तर चक्क स्वतःचा फॅक्ट चेक व्हिडिओ पोस्ट केला. त्यानंतर काही वेळातच काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व मनसेने या मुद्यावरून रान पेटवले. राज ठाकरे यांनी या प्रकरणी निवडणूक आयोगावर टीकेची झोड उठवत बोटावरील शाई सॅनिटायझरने निघत असल्याचा आरोप केला. त्यानंतर ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही या प्रकरणी निवडणूक आयोगाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. निवडणुकीत बोटावरील शाई पुसली जात नाही, तर लोकशाही पुसली जात असल्याचे ते म्हणाले. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही आज निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये एका वृत्तपत्राचे वृत्त पोस्ट करत त्यात बोटावरील शाई कशा प्रकारे पुसली जात आहे हे दिसून येत आहे. व्होट चोरी हे देशविरोधी कृत्य -राहुल गांधी राहुल गांधी आपल्या पोस्टमध्ये म्हणाले, निवडणूक आयोगाकडून जनतेची होणारी दिशाभूल हेच लोकशाहीवरील विश्वास संपुष्टात येण्याचे प्रमुख कारण आहे. व्होट चोरी हे राष्ट्रविरोधी कृत्य आहे. राहुल गांधींच्या या पोस्टवर अनेकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी राहुल गांधी यांच्या विधानाचे समर्थन केले आहे. तर काहींनी त्यावर विरोध प्रकट केला आहे. विशेषतः अनेकांनी निवडणुकीत बोटाला लावली जाणारी शाई पुसली जाणे लोकशाहीच्या दृष्टिकोनातून चिंताजनक असल्याचे मत व्यक्त केले आहे. आत्ता पाहू काय म्हणाले होते राज ठाकरे? राज ठाकरे गुरुवारी मतदानानंतर बोलताना म्हणाले होते, आतापर्यंत मतदानावेळी शाई वापरली जात होती. आज एक नवे पेन (मार्कर) आणले आहे. त्याविरोधात सर्वच बाजूंनी तक्रारी येत आहेत. तुम्ही मतदान करून सॅनेटायझरने शाई पुसली तर ती सहजपणे पुसली जात आहे. सुरुवातीला निवडणूक आयोगाने उमेदवारांना प्रचारासाठी एक दिवस वाढवून दिला. असा कोणताही नियम नाही. पण त्यांनी तो या निवडणुकीत आणला. पैसे वाटण्यासाठी हा नियम आणला. संपूर्ण प्रशासन हे सत्तेसाठी काम करत आहे. आम्ही आमच्या परीने जे काही करायचे आहे ते करतोय. पण हे काही चांगल्या लोकशाहीची लक्षणे नाहीत. निवडणूक आयोगाने फेटाळले होते आरोप राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी मनसे व ठाकरे गटाचे आरोप फेटाळून लावले होते. ते म्हणाले होते, राज्य निवडणूक आयोग मार्कर पेन 2011 पासून वापरत आहे. ही शाई बोटावर लावल्यानंतर त्याला सुकण्यासाठी 10 ते 12 सेकंद लागतात. मतदार एवढा वेळ संबंधित मतदान केंद्रावरच असतो. एकदा ही शाई वाळल्यानंतर ती कोणत्याही प्रकारे काढता येत नाही. ही शाई वेगळी नाही. भारतीय निवडणूक आयोग जी शाई वापरतो, तीच ही शाई आहे. एखादा मतदार मतदान केल्यानंतर पुन्हा मतदान केंद्रावर आला, तर तेथील निवडणूक अधिकारी निश्चितच त्याच्यावर कारवाई करतात. शाई पुसली जात असल्याविषयी केवळ संभ्रम निर्माण केला जात आहे. ही शाई 2011 पासून वापरली जात असल्यामुळे याच निवडणुकीत अशा प्रकारचा संभ्रम पसरवणे चुकीचे आहे. याशिवाय लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीतही अशा प्रकारच्या तक्रारी आल्या होत्या. पण शाई वाळल्यानंतर ती पुसली जात नाही, असे ते म्हणाले होते.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



