digital products downloads

संभाजीनगरमध्ये भाजपच ठरला मोठा भाऊ, युती तोडणाऱ्या शिवसेनेला जबर फटका: इम्तियाज जलील यांचा प्रयोग यशस्वी; अंबादास दानवेंना मोठा धक्का – Chhatrapati Sambhajinagar News

संभाजीनगरमध्ये भाजपच ठरला मोठा भाऊ, युती तोडणाऱ्या शिवसेनेला जबर फटका:  इम्तियाज जलील यांचा प्रयोग यशस्वी; अंबादास दानवेंना मोठा धक्का – Chhatrapati Sambhajinagar News



छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागून राहिलं होतं. 60 टक्के मतदान झालेल्या या निवडणुकीत मतदारांनी दिलेला कौल स्पष्टपणे भाजपच्या बाजूने झुकलेला दिसून आला आहे. शिवसेनेसोबत युती न करता स्वबळावर लढण्याचा निर्णय भाजपसाठी फायदेशीर ठरला, तर हाच निर्णय शिंदे गटाच्या शिवसेनेसाठी अंगलट आला आहे. निकालांचे चित्र स्पष्ट होत असताना भाजप सर्वाधिक जागांवर आघाडी घेतली असून महापालिकेत शतप्रतिशत सत्तेपर्यंत मजल मारली आहे. याउलट, ‘आम्हीच मोठा भाऊ’ असा दावा करणाऱ्या शिंदेंच्या शिवसेनेला आता लहान भावाच्या भूमिकेत राहावे लागणार आहे. या निवडणुकीत विशेष बाब म्हणजे भाजप, शिंदे गटाची शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (दोन्ही गट), एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडी-सर्वच पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. कोणतीही औपचारिक युती नसताना देखील भाजपने सर्वाधिक स्ट्राइक रेट राखला. बंडखोरी, अंतर्गत नाराजी आणि तिकीट वाटपावरील असंतोष असूनही भाजपने मतदारांचा विश्वास मिळवला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टॉक शो आणि प्रचारसभांमधून विकासकामांचा लेखाजोखा मांडत ‘भगव्याची शान राखा’ असं थेट आवाहन केलं होतं, त्याला संभाजीनगरच्या मतदारांनी प्रतिसाद दिल्याचं निकालातून दिसून आलं. नेत्यांच्या मुलांना आणि नातेवाईकांना तिकीट दिल्याने पक्षांतर्गत नाराजी याउलट, शिंदे गटाच्या शिवसेनेला स्वबळाचा निर्णय महागात पडला. उमेदवार निवडीत मोठ्या प्रमाणावर नेत्यांच्या मुलांना आणि नातेवाईकांना तिकीट देण्यात आल्याने पक्षांतर्गत नाराजी वाढली. पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आपल्या मुलगा सिद्धांत आणि मुलगी हर्षदा यांना उमेदवारी दिली होती. वर्षानुवर्षे नगरसेवक, माजी महापौर राहिलेल्यांना पुन्हा संधी देताना नव्या आणि इतर पक्षांतून आलेल्या कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला. परिणामी, संजय शिरसाट स्वतः आपल्या मुलगा-मुलीच्या प्रभागांमध्येच अडकून पडले आणि संपूर्ण शहरात पक्षाला अपेक्षित ताकद लावता आली नाही. याचा थेट परिणाम शिवसेनेच्या जागांवर झाला असून भाजपच्या तुलनेत सेनेची पिछेहाट स्पष्ट दिसते. इम्तियाज जलील यांचा प्रयोग यशस्वी दरम्यान, एमआयएमने अंतर्गत वाद, उमेदवारी वाटपातील आरोप आणि इम्तियाज जलील यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरही आपली पारंपरिक वोटबँक मोठ्या प्रमाणात टिकवून ठेवली आहे. बावीस माजी नगरसेवकांची तिकीटं कापण्याचा निर्णय पक्षासाठी काही तोट्याचा ठरला नाही. एमआयएमला केवळ एका जागेचा फटका बसताना दिसतो आहे. मागील महापालिकेत 25 नगरसेवकांसह विरोधी पक्षात बसलेली एमआयएम यावेळीही जवळपास त्याच भूमिकेत राहणार आहे. मोठ्या प्रमाणावर नाराजी असतानाही नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा इम्तियाज जलील यांचा प्रयोग यशस्वी ठरल्याचे राजकीय निरीक्षक मानतात. यात पक्षप्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी गल्लीबोळात फिरून केलेला प्रचारही निर्णायक ठरला. संपूर्ण निवडणूक व्यवस्थापन अंबादास दानवे यांच्याकडे केंद्रित शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी मात्र ही निवडणूक फारशी समाधानकारक ठरलेली नाही. महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच नव्वदहून अधिक जागांवर स्वबळावर उमेदवार उभे करणाऱ्या या पक्षाची ‘मशाल’ अपेक्षेप्रमाणे पेटली नाही. माजी महापौर अब्दुल रशीद खान उर्फ मामू यांना पक्षात घेऊन मुस्लिम मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न फसला. उलट, या निर्णयामुळे चंद्रकांत खैरे नाराज झाले. उमेदवार निवड आणि संपूर्ण निवडणूक व्यवस्थापन अंबादास दानवे यांच्याकडे केंद्रित राहिल्याने खैरे यांनी प्रचारात फारसा रस घेतला नाही. परिणामी, एवढ्या मोठ्या प्रमाणावर जागा लढवूनही केवळ 6 उमेदवारांपुरताच पक्षाचा निकाल मर्यादित राहिला. मतदारांचा कल स्पष्टपणे महायुतीकडे झुकलेला काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी नाराज कार्यकर्त्यांसाठी आपली दारं खुली ठेवली होती, मात्र त्याचा फारसा फायदा झाला नाही. या पक्षांना एक अंकी जागांवरच समाधान मानावं लागलं. आकडेवारी पाहता संभाजीनगरच्या मतदारांचा कल हा स्पष्टपणे राज्यातील सत्ताधारी महायुतीकडे झुकलेला दिसतो. शहराचा विकास साधायचा असेल तर केंद्र आणि राज्यात सत्ता असलेल्या पक्षासोबतच जायला हवं, हा ट्रेंड याआधी नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांत दिसून आला होता आणि तोच ट्रेंड आता महापालिकेतही कायम राहिल्याचं चित्र आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp