
Earth Gravitational Force: 12 ऑगस्ट 2026 रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजून 3 मिनिटांनी पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती 7 सेकंदांसाठी पूर्णपणे नाहीशी होईल, अशा पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होतायत. हा बदल काळ्या छिद्रांच्या टक्करांमुळे निर्माण होणाऱ्या गुरुत्वाकर्षण लहरींमुळे घडेल. यामुळे लाखो लोक उडून जातील किंवा पडून मरतील, असा दावा आहे. तसेच या घटनेमुळे पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान होईल आणि अर्थव्यवस्था दहा वर्षांपेक्षा जास्त काळासाठी खराब होईल, असंही यात म्हटलंय. इंस्टाग्रामवर एका युजरने ही पोस्ट लिहिली असून ती खूपच व्हायरल झालीय.
अफवेचे परिणाम
‘या 7 सेकंदांमध्ये पृथ्वीवर कमीतकमी 4 कोटी लोकांचा मृत्यू होईल. लोक उडून जाऊन खाली पडतील, इमारती कोलमडतील आणि मोठी हानी होईल’, असा दावा पोस्टमध्ये करण्यात आलाय. हा दावे नासाच्या एका गुप्त दस्तऐवजावर आधारित असून त्याला ‘प्रोजेक्ट अँकर’ म्हणतात. हा दस्तऐवज नोव्हेंबर 2024 मध्ये लीक झाल्याचे सांगितले जाते. तसेच या दिवशी सूर्यग्रहण होणार असल्याने लोकांची उत्सुकता वाढलीय. मात्र, हे सर्व दावे निराधार आहेत आणि विज्ञानाशी जुळत नाहीत.
अफवेचा उगम कुठून झाला?
ही अफवा इंस्टाग्रामवर ‘@mr_danya_of ‘ नावाच्या युजरने सुरू केली. नासाला याची माहिती आहे, पण ते लोकांना सांगत नाहीत, असे त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटले. डेली मेल नावाच्या वृत्तपत्राने याची माहिती दिली. सोशल मीडियावर ही बातमी वेगाने पसरली आणि लोकांमध्ये भीती निर्माण झाली. मात्र हे सर्व चुकीचे आहे कारण गुरुत्वाकर्षण लहरी इतक्या कमकुवत असतात की त्यांचा पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणावर परिणाम होऊ शकत नाही.
वैज्ञानिक स्पष्टीकरण
गुरुत्वाकर्षण ही पृथ्वीच्या वस्तुमानावर अवलंबून असते. काळ्या छिद्रांच्या टक्करांमुळे निर्माण होणाऱ्या लहरी खूप कमकुवत असतात आणि त्यांचा शोध घेण्यासाठी अतिसंवेदनशील यंत्रे लागतात. या लहरींचा पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणावर काहीही परिणाम होत नाही. गुरुत्वाकर्षण संपण्यासाठी पृथ्वीचे संपूर्ण वस्तुमान कमी होणे आवश्यक आहे, जे अशक्य आहे. सूर्यग्रहणाचा याच्याशी काही संबंध नाही, असे हर्टफोर्डशायर विद्यापीठातील ब्लॅक होल तज्ज्ञ डॉ. विलियम एलस्टन यांनी सांगितले.
नासाने काय म्हटले?
नासाने या अफवेचे स्पष्टपणे खंडन केले आहे. 12 ऑगस्ट 2026 रोजी पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती संपणार नाही, असे त्यांच्या प्रवक्ताने सांगितले. फॅक्ट-चेकिंग वेबसाइट स्नोप्सनेही याला दुजोरा दिलाय. अशा अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन नासाने केलंय. ही अफवा केवळ भीती पसरवण्यासाठी आहे असून विज्ञानावर आधारित नाही. लोकांनी विश्वसनीय स्रोतांवरून माहिती घ्यावी, असे आवाहनही करण्यात आलंय.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



