
अहिल्यानगर शहराच्या महापौर व उपमहापौर पदासाठी निवडणूक घेण्याचा प्रस्ताव महापालिकेने नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयाकडे सादर केला आहे. राज्यभरात सर्वत्र 30 किंवा 31 जानेवारीला निवडणूक घ्यावी, अशा सूचना शासनाकडून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे महिना अखेरीस शहराला नवीन महापौर व उपमहापौर मिळण्याची शक्यता आहे. मात्र, विभागीय आयुक्तांकडून अद्याप तारीख जाहीर झालेली नसल्याने निवडणूक कार्यक्रमाची प्रतीक्षा कायम आहे. दरम्यान, महापौर भाजपचा की राष्ट्रवादीचा याचा निर्णय मुंबईतच होणार आहे. महापालिका निवडणुकीत भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसयुतीने 52 जागा मिळवत महापालिकेवर वर्चस्व निर्माण केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वाधिक 27 तर भाजपच्या 25 जागा निवडून आल्या आहेत. दोन्ही पक्षांनी स्वतंत्र गट नोंदणीही केली आहे. भाजपकडून शारदा ढवण व राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रकाश भागानगरे यांची गटनेता म्हणून निवड करण्यात आली आहे. गट नोंदणीनंतर महापालिकेच्या नगरसचिव कार्यालयाने विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव सादर केला आहे. शासनाकडून सर्व विभागीय आयुक्तांना निवडणूक 30 किंवा 31 जानेवारीला घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, विभागीय आयुक्तांनी अद्याप निवडणुकीसाठी तारीख जाहीर केलेली नाही. शनिवारी दिवसभरात निवडणुकीसाठी तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे आमदार संग्राम जगताप यांनी युतीची बैठक होऊन महापौर कुणाचा होईल व कोण होईल, हे निश्चित केले जाईल, असे सांगत सस्पेन्स वाढवला आहे. तर,काल माजी खासदार सुजय विखे यांनीही मुंबईत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व पालकमंत्री यांच्यात बैठक होऊन महापौर पदाबाबत निर्णय होईल, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे महापौर राष्ट्रवादीचा की भाजपचा होणार याकडे लक्ष लागले आहे. महापौरपद केडगाव की सावेडीत? भाजपकडे महापौर पद गेल्यास गटनेत्या शारदा ढवण,पुष्पा बोरुडे, शीतल ढोणे यांना, तर, राष्ट्रवादीकडे महापौर पद गेल्यास केडगावातील किंवा सावेडी उपनगरातील नगरसेविकेला संधी दिली जाईल, अशी चर्चा आहे. महापालिकेत अनेक वेळा निवडून येऊनही कोणतेही मोठे पद न मिळालेल्या नगरसेविकेलाही आमदार जगताप यांच्याकडून अनपेक्षितपणे संधी दिली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महापौर पदाबाबत आमदार संग्राम जगताप यांची भूमिका निर्णायक महापौर पद अडीच अडीच वर्षे भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसला वाटून घेण्याचा निर्णय झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. महापौर पद पहिल्या टप्प्यात भाजप की राष्ट्रवादी काँग्रेसकडे याचा निर्णय मुंबईतच होईल, असे सांगितले जात आहे. मात्र, संपूर्ण महापालिका निवडणुकीच्या रणनितीमध्ये निर्णायक भूमिका घेऊन युतीच्या सर्वाधिक जागा निवडून आणण्यात आमदार संग्राम जगताप यांचा मोठा वाटा आहे. खुद्द पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनीही आमदार जगताप यांच्याच नेतृत्वाखाली निवडणूक लढवल्याचे निकालानंतरही म्हटले आहे. त्यामुळे युतीच्या पदवाटपात विशेषतः महापौर पदाच्या निर्णयातही आमदार जगताप यांचीच भूमिका निर्णय असणार आहे. दरम्यान, राज्यात बहुतांशी महापालिकात भाजपचाच महापौर होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला एकमेव अहिल्यानगर महापालिकेत सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. एकमेव अहिल्यानगर महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसला महापौर पदासाठी संधी मिळाली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस महापौरपदावरील दावा सोडण्याची शक्यता कमी आहे. जिल्हाधिकारी सभेचे पीठासीन अधिकारी महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी तारीख जाहीर झाल्यानंतर निवडणुकीसाठी कार्यक्रम जाहीर होईल. निवडणूक होऊ घातलेल्या तारखेला नगरसेवकांची पहिली विशेष सभा घेण्यात येईल. विभागीय आयुक्तांचे प्रतिनिधी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांची पीठसीन अधिकारी म्हणून नियुक्ती होऊन त्यांच्याच अध्यक्षतेखाली ही सभापार पडेल. सभेत आधी महापौर पदासाठी निवडणूक होईल व त्यानंतर उपमहापौर पदासाठी निवडणूक होईल.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



