
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून देशातील पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. त्याचबरोबर देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस, अग्निशमन, होमगार्ड आणि सुधारात्मक सेवांतील कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले. या घोषणेत महाराष्ट्रासाठी विशेष अभिमानाची बाब म्हणजे नक्षलप्रभावित आणि अतिदुर्गम भागात जीव धोक्यात घालून सेवा बजावणाऱ्या गडचिरोली पोलिस दलाच्या 31 अधिकारी व अंमलदारांना राष्ट्रपतींचे पोलिस शौर्य पदक जाहीर झाले आहे. देशभरात जाहीर झालेल्या एकूण 121 शौर्य पदकांपैकी 31 पदके एकट्या गडचिरोली जिल्ह्यातील जवानांना मिळाल्याने राज्यभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. गडचिरोली जिल्हा हा नक्षलवादाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील मानला जातो. जिल्ह्याच्या सीमावर्ती आणि जंगलांनी वेढलेल्या भागात पोलिस दल सतत नक्षलवाद्यांच्या धोक्याखाली कार्यरत असते. अशा कठीण परिस्थितीत काम करणाऱ्या जवानांचे मनोबल या पुरस्कारामुळे निश्चितच उंचावले आहे. जंगलातील चकमकी, दुर्गम भागातील शोध मोहिमा आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी राबवण्यात येणाऱ्या कारवायांमध्ये गडचिरोली पोलिस दलाने वेळोवेळी धाडस दाखवले आहे. याच शौर्याची आणि समर्पित सेवेची दखल घेत केंद्र सरकारकडून हे सन्मान जाहीर करण्यात आले आहेत. 22 एप्रिल 2018 हा दिवस गडचिरोली पोलिस दलाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवला गेला आहे. भामरागड तालुक्यातील बोरीया–कसनासूर या घनदाट जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये भीषण चकमक झाली होती. या एका मोठ्या नक्षलविरोधी मोहिमेत गडचिरोली पोलिसांनी 40 नक्षलवाद्यांना ठार करत ऐतिहासिक यश मिळवले होते. नक्षलवादाविरोधातील आतापर्यंतच्या कारवायांमधील ही सर्वात मोठी आणि निर्णायक कारवाई मानली जाते. अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने आणि प्रचंड जोखमीच्या परिस्थितीत ही मोहीम यशस्वी करण्यात आली होती. या धाडसी कारवाईत प्रत्यक्ष शौर्य गाजवणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांच्या कामगिरीची आता राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे. या मोहिमेत सहभागी असलेले पोलिस निरीक्षक अमोल फडतरे, पोलिस उपनिरीक्षक मधुकर नैताम, वासुदेव मडावी, विलास पोरतेट, संतोष नैताम यांच्यासह एकूण 31 जवानांना पोलिस शौर्य पदक जाहीर झाले आहे. या सन्मानामुळे नक्षलविरोधी लढ्यात सहभागी असलेल्या प्रत्येक जवानाचा आत्मविश्वास अधिक बळकट झाला असून, त्यांच्या कार्याला देशपातळीवर मान्यता मिळाली आहे. शौर्य पदकांसोबतच पोलिस दलात मोठ्या प्रमाणात पदोन्नती जाहीर करण्यात आल्या आहेत. एकूण 394 पोलिस अंमलदारांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पदोन्नती देण्यात आली आहे. कर्तव्य बजावताना वीरमरण आलेल्या 14 शहीद जवानांचाही मरणोत्तर सन्मान करण्यात आला आहे. यामध्ये 7 हवालदारांना सहायक पोलिस उपनिरीक्षक पदावर, तर 7 पोलिस नाईकांना पोलिस हवालदार पदावर मरणोत्तर पदोन्नती देण्यात आली आहे. याशिवाय विशेष कामगिरी करणाऱ्या 10 जवानांना वेगवर्धित पदोन्नती देण्यात आली असून, त्यात 82 हवालदारांना सहायक पोलिस उपनिरीक्षक म्हणून आणि 303 पोलिस नाईकांना पोलिस हवालदार म्हणून बढती देण्यात आली आहे. दरम्यान, भारताच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरातील पोलिस, अग्निशमन, होमगार्ड आणि सुधारात्मक सेवांमधील एकूण 982 अधिकारी व कर्मचाऱ्यांना शौर्य व सेवा पदक जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील 89 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यांच्या कर्तव्यदक्षतेचा आणि सेवाभावाचा सन्मान म्हणून हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यामुळे राज्यातील पोलिस दलामध्ये समाधान आणि अभिमानाचे वातावरण आहे. पोलिस उपनिरीक्षक गंगाधर घुमरे यांना राष्ट्रपती पदक या यादीत भंडारा जिल्ह्यालाही मानाचा सन्मान मिळाला आहे. भंडाऱ्यातील राज्य गुप्त वार्ता विभागात कार्यरत पोलिस उपनिरीक्षक गंगाधर घुमरे यांना त्यांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल (MSM) राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. घुमरे हे भंडारा जिल्ह्यातील एकमेव राष्ट्रपती पदक विजेते पोलिस उपनिरीक्षक ठरले आहेत. 1991 च्या बॅचचे पोलिस अंमलदार असलेल्या घुमरे यांनी आपल्या प्रदीर्घ सेवाकाळात गुप्त वार्ता विभागात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली असून, त्यांच्या कार्याची दखल आता थेट राष्ट्रपती स्तरावर घेण्यात आली आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



