
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून देशातील कला, क्रीडा, साहित्य, समाजसेवा, आरोग्य आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांना या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे. उद्या नवी दिल्ली येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा सोहळा पार पडणार आहे. यंदाच्या यादीत पाच राजकीय नेत्यांचा समावेश असून महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मात्र, या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात मोठा वाद निर्माण झाला असून शिवसेना ठाकरे गटाने या पुरस्काराला तीव्र विरोध दर्शवला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी सोशल मीडियावरून आपली प्रतिक्रिया व्यक्त करत भाजपवर थेट आरोप केले. ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा फुले दाम्पत्याचा अपमान केला, अशा व्यक्तीला पद्मभूषण देऊन सन्मानित केलं जात आहे. महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांचा भाजप सन्मान करते, छान! अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला. राऊत यांच्या या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून भाजप आणि ठाकरे गटामध्ये नव्या वादाची ठिणगी पडली आहे. संजय राऊत यांनी आपल्या टीकेमध्ये केंद्र सरकारवर आणि भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. महाराष्ट्रात लोकशाही आणि भारतीय संविधानाची हत्या करून शिंदे-भाजपचे सरकार सत्तेत बसवण्यात आलं. या प्रक्रियेत ज्यांची भूमिका होती, त्यांनाच मोदी सरकारने पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं, असे राऊत म्हणाले. तसेच, अशा व्यक्तीला राष्ट्रीय पुरस्कार देणे म्हणजे महाराष्ट्राच्या भावना दुखावण्यासारखे असल्याचेही त्यांनी स्पष्टपणे नमूद केले. त्यांच्या मते, हा पुरस्कार केवळ सन्मान नसून तो एका विशिष्ट राजकीय भूमिकेचा पुरस्कार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. भगतसिंह कोश्यारी हे भाजपचे ज्येष्ठ नेते असून त्यांनी 2019 ते 2023 या कालावधीत महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची जबाबदारी सांभाळली आहे. त्यांच्या कार्यकाळात राज्यातील राजकारणात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यपाल म्हणून घेतलेल्या भूमिकेमुळे ते सातत्याने चर्चेत होते. तसेच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीच्या वेळी त्यांनी राज्यपाल म्हणून शपथ दिली होती. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले, तेव्हाही भगतसिंह कोश्यारी हेच महाराष्ट्राचे राज्यपाल होते. राज्यपालपदाच्या काळात भगतसिंह कोश्यारी यांनी केवळ महाराष्ट्रच नव्हे तर गोव्याच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभारही सांभाळला होता. यापूर्वी ते उत्तराखंडचे पहिले मुख्यमंत्री राहिले असून केंद्रीय मंत्री म्हणूनही त्यांनी काम केले आहे. दीर्घ राजकीय कारकिर्दीमुळे ते राष्ट्रीय राजकारणात ओळखले जाणारे व्यक्तिमत्त्व आहेत. मात्र, त्यांच्या काही वक्तव्यांमुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करण्यात आली होती. वादग्रस्त विधानांमुळे राज्यभर संतापाची लाट विशेषतः छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा फुले यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे राज्यभर संतापाची लाट उसळली होती. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या बालविवाहासंदर्भातील अवमानकारक टिप्पणीमुळे विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष आणि नागरिकांनी तीव्र निषेध व्यक्त केला होता. त्या काळात त्यांच्या राजीनाम्याचीही जोरदार मागणी करण्यात आली होती. या वक्तव्यांमुळे महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का बसल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली होती. राजकीय आरोप-प्रत्यारोप वाढण्याची शक्यता अशा पार्श्वभूमीवर भगतसिंह कोश्यारी यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्याने पुन्हा एकदा तोच वाद नव्याने उफाळून आला आहे. संजय राऊत यांच्या आक्रमक प्रतिक्रियेमुळे हा विषय अधिक तापला असून आगामी काळात या मुद्द्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप वाढण्याची शक्यता आहे. पद्म पुरस्कारासारख्या सन्मानावरून निर्माण झालेला हा वाद केवळ एका व्यक्तीपुरता मर्यादित न राहता, महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक संवेदनांशी जोडला गेल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



