
रूबी हॉल क्लिनिकने कर्करोग उपचार क्षेत्रात एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. भारतीय उपखंडातील पहिली फोकल वन रोबोटिक हाय-इंटेन्सिटी फोकस्ड अल्ट्रासाऊंड (एचआयएफयू) थेरपी प्रोस्टेट कॅन्सरसाठी येथे सुरू करण्यात आली आहे. ही अत्याधुनिक, नॉन-इनवेसिव्ह उपचार पद्धत रूबी हॉल क्लिनिकमधील नव्याने उद्घाटन करण्यात आलेल्या कल्याणी इन्स्टिट्यूट ऑफ रोबोटिक एचआयएफयू थेरपी येथे उपलब्ध होणार आहे. या केंद्राचे उद्घाटन रूबी हॉल क्लिनिकचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. पी. के. ग्रँट, डॉ. सायमन ग्रँट आणि डॉ. हिमेश गांधी यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी कल्याणी कुटुंबाचे प्रतिनिधी डॉ. बाबा कल्याणी, सौ. सुनीता कल्याणी आणि भारत फोर्जचे अमित कल्याणी हे देखील उपस्थित होते. फोकल वन संस्थेचे आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ प्रो. पास्कल (युनिव्हर्सिटी ऑफ टुलूज), डॉ. डॅमियन तसेच संस्थेचे उपाध्यक्ष व सीईओ रायन यांनीही या प्रसंगी हजेरी लावली. भारतात दरवर्षी सुमारे ४० हजारांहून अधिक प्रोस्टेट कॅन्सरची नवीन प्रकरणे निदानास येतात. मात्र, शस्त्रक्रिया किंवा किरणोपचारांमुळे होणाऱ्या दुष्परिणामांची भीती, दीर्घ पुनर्प्राप्ती कालावधी आणि जीवनमानावर होणाऱ्या परिणामांमुळे अनेक रुग्ण उपचार पुढे ढकलतात. रोबोटिक एचआयएफयू थेरपी या रुग्णांसाठी एक प्रभावी आणि सुरक्षित पर्याय ठरते. ही उपचारपद्धत आजारी ऊतींवर अचूक लक्ष्य साधून उपचार करते, ज्यामुळे आजूबाजूच्या निरोगी ऊती सुरक्षित राहतात. कोणतीही चिरफाड किंवा किरणोत्सर्ग नसल्याने रुग्णांना जलद पुनर्प्राप्ती होते आणि बहुतांश वेळा डे-केअर पद्धतीने उपचार शक्य होतात. पारंपरिक उपचारांच्या तुलनेत या थेरपीमुळे मूत्र व लैंगिक कार्यावर होणारे दुष्परिणाम लक्षणीयरीत्या कमी होतात. यामुळे रुग्णांचे जीवनमान सुधारण्यास मदत होते. यावेळी बोलताना डॉ. पी. के. ग्रँट म्हणाले, “रुग्णांपर्यंत प्रगत वैद्यकीय तंत्रज्ञान वेळेत पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे. ही थेरपी रुग्णांचे जीवनमान जपणारा महत्त्वाचा पर्याय ठरेल.” डॉ. हिमेश गांधी यांनीही रोबोटिक एचआयएफयू थेरपीमुळे रुग्णांना सुरक्षित, प्रभावी आणि आत्मनिर्भर उपचार मिळतील, असा विश्वास व्यक्त केला.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



