
आधुनिक तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे डिजिटल संस्कृतीचा उदय झाला असून, यामुळे वाचन संस्कृती लोप पावत आहे. लेखन आणि वाचनाची परंपरा खंडित होत आहे. अशा स्थितीत सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळीला बळ देण्यासाठी वाचन संस्कृतीचा विस्तार आवश्यक आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध लेखिका डॉ. सविता कांबळे यांनी केले. डॉ. कांबळे अमरावती येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, भीमटेकडी येथे आयोजित त्रैमासिक मुक्तमंथन वाचक-लेखक मेळाव्याच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. याप्रसंगी विचारमंचावर उद्घाटक डॉ. नितीन कोळी, प्रमुख अतिथी गौतम ताराराम, प्रशांत वंजारे आणि स्वागताध्यक्ष विलास साखरे उपस्थित होते. उद्घाटक डॉ. नितीन कोळी यांनी यावेळी सांगितले की, आरक्षण सर्वार्थाने संकटात असण्याचा हा काळ आहे. आरक्षणाचा पूर्वीपासून विरोध करणारा वर्ग आज यशस्वी होताना दिसत आहे. क्रिमीलेअर आणि उपवर्गीकरणासंदर्भात न्यायालयाच्या भूमिका आश्चर्यकारक आहेत. साहित्य संमेलनाचे स्वरूप असलेल्या या दिवसभर चाललेल्या मेळाव्यात गझलकार प्रमोद वाळके ‘युगंधर’ यांना महाकवी वामनदादा कर्डक जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच, चित्रकार बळी खैरे यांना प्रा. सतेश्वर मोरे जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. दुसऱ्या सत्रात डॉ. अशोक इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद घेण्यात आला, ज्यात प्रा. प्रदीप लोहकरे आणि गजानन लोहवे यांनी सहभाग घेतला. त्यानंतर नारायण जाधव येळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन पार पडले. समारोपीय सत्रात डॉ. सीमा मेश्राम, डॉ. वामन गवई, कुंदाताई सोनुले आदी मान्यवर सहभागी झाले होते. कार्यक्रमाची भूमिका डॉ. चंद्रकांत सरदार यांनी मांडली. सूत्रसंचालन डॉ. जलदा ढोके यांनी केले, तर सुनंदा बोदीले यांनी आभार मानले. मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी विद्या पाटील, वंदना धवणे, खुशाल ढवळे, अतुल कुमार गवई, हेमंत सावळे आदींनी परिश्रम घेतले. यावेळी संयोजक प्रशांत वंजारे यांनी सांगितले की, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) काळात ज्ञानाच्या विस्ताराऐवजी केवळ माहितीच्या आदानप्रदानाला महत्त्व प्राप्त झाले आहे. ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्यासाठी ज्ञानार्जनाची नितांत गरज आहे. हे ज्ञानार्जन घडून येण्यासाठी मुद्रित माध्यमांची भूमिका महत्त्वाची असून, त्यामुळे या माध्यमाचे महत्त्वही अधिक वाढले आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



