
अजित पवारांच्या आकस्मिक निधनाचे वृत्त समजताच सामान्य कार्यकर्त्यांपासून ते मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांपर्यंत सर्वांनाच मोठा धक्का बसला असून, संपूर्ण राजकीय वर्तुळातून तीव्र शोक व्यक्त केला जात आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक दिग्गज नेते आणि नागरिकांनी आपल्या लाडक्या दादांच्या आठवणींना उजाळा दिला आहे, तर अनेकांनी त्यांच्याशी झालेल्या शेवटच्या संवादाचे हृदयद्रावक अनुभव कथन केले. विशेषतः बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांच्याशी केवळ 10 दिवसांपूर्वी संवाद साधताना, निवडणुकांच्या व्यस्ततेमुळे सध्या व्यायाम बंद असल्याचे सांगून तो लवकरच पुन्हा सुरू करण्याचा मानस अजितदादांनी बोलून दाखवला होता. मात्र हा संकल्प पूर्ण होण्याआधीच नियतीने त्यांच्यावर काळाचा घाला घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. बार्शीचे आमदार दिलीप सोपल आणि अजित पवारांसोबतचा एक किस्सा येथील नगरसेवक नागेश अक्कलकोट यांनी सांगितला. अजित पवार निवडून आलेल्या पुण्यातील एका नगरसेवकाचा सत्कार स्वीकारत असताना अजितदादांना उद्देशून दिलीप सोपल म्हणाले, दादा ढेरी दिसायलीय. यावर अजित पवार म्हणाले, होय ओ दिलीपराव. या निवडणुकांमुळे व्यायाम बंद झालाय. आता झेडपी झाल्या की परत चालू करतो म्हणाले होते. त्यानंतर गप्पा संपताच, निघू का दादा? असे सोपल यांनी विचारले असता अजित पवार म्हणाले, बसा ओ दिलीपराव बरं वाटतं जरा, असे म्हणाले आणि बसण्याचा आग्रह केल्याची आठवण नागेश अक्कलकोट यांनी सांगितली. दिलीप सोपल यांच्याशी अजित पवारांचे असलेले 1985 पासूनचे घट्ट मैत्रीचे नाते पुन्हा एकदा चर्चेत आले असून, अवघ्या दहा दिवसांपूर्वी 18 जानेवारी रोजी पुण्यातील बारामती हॉस्टेलमध्ये झालेली त्यांची भेट ही आता शेवटची ठरली आहे. या भेटीत रोहित पवारांच्या पुढाकाराने सोपल यांच्यासह विश्वास बारबोले आणि नागेश अक्कलकोटे यांनी अजितदादांची भेट घेतली होती, जिथे दिलीप वळसे पाटील आणि शिवाजीराव आढळराव यांच्या उपस्थितीत दादांनी नेहमीच्या शैलीत मिश्किल टोलेबाजी करत निवडणुकीच्या व्यापातून पुन्हा व्यायाम सुरू करण्याचा आपला मानस बोलून दाखवला होता. मात्र काळाच्या घालामुळे या मनमोकळ्या गप्पा आणि तो ऊर्जावान लोकनेता आता केवळ आठवणींच्या स्वरूपात जनमानसात उरला आहे. एवेळचा एक किस्सा सांगताना नागेश अक्कलकोट यांनी सांगितले की, आम्ही जेव्हा आत गेलो तेव्हा दिलीप वळसे पाटील आणि शिवाजीराव आढळराव बसले होते. सर्वाना नमस्कार करीत आम्ही स्थानपन्न होताच, काय विश्वास, थोडक्यात गेले ना? म्हणत आम्हालाही बसण्याचा इशारा दादांनी केला. माझ्याकडे कटाक्ष टाकत काय अक्कलकोटे महाराज कितव्यांदा नगरसेवक झालास म्हणताच मी चौथ्यांदा, हे सांगत नमस्कार करुन बसलो, अशा आठवणी सोपल यांचे समर्थक व नगरसेवक नागेश अक्कलकोट यांनी सांगितल्या आहेत.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



