
Ajit Pawar Death Devendra Fadnavis Emotional Article: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत सुंदर शब्दांमध्ये दिवगंत उपमुख्यमंत्री अजित पवारांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. राजकारणाबद्दल न बोलता अजित पवारांसोबतच्या मैत्रीसंदर्भात फडणवीसांनी मन मोकळं करणारा लेख लिहिला आहे. फडणवीसांनी लेखात काय म्हटलं आहे ते पाहूयात…
या वेळी मात्र तुम्ही वेळ चुकवली
आम्ही दोघे मंगळवारी (दि. 27) मंत्रिमंडळ बैठकीत एकत्र होतो. पाठोपाठ मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीची बैठक माझ्या कक्षात झाली, तेथेही दादा माझ्याबरोबर होते. सदोदित तिजोरीची काळजी करणारा अर्थमंत्री असल्याने मी निश्चिंत असायचो. महाराष्ट्रात पायाभूत सुविधांवर अन्य राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक खर्च होतो, दादांनी प्रश्न उपस्थित केला. प्रकल्प लांबू नयेत, यासाठी आम्ही दोघांनीही आसूड उठविले. सार्वजनिक बांधकाम खात्याने सरकारचे 764 कोटी कसे वाचविले, याची माहितीही देण्यात आली. दादांना आनंद झाला. ‘अशाच गोड बातम्या प्रत्येक बैठकीत देत जा’, अशी कोपरखळीही त्यांनी मारली. पण, अशा बातम्या ऐकण्यासाठी पुढच्याच दिवशीपासून आपण नसू, हे मात्र त्यांनी सांगितले नाही. ही बैठक झाल्यानंतर पुन्हा पाऊण तास आम्ही माझ्या दालनात गप्पा मारत बसलो होतो. नियती निष्ठुर असते, आपले काही चालत नाही. कधीही वेळ न चुकवणारे दादा, या वेळी मात्र तुम्ही वेळ चुकवली. दादा ही खंत कायम राहील, तुम्ही अकाली ‘एक्झिट’ घेतली. बारामतीजवळ बुधवारी सकाळी विमान अपघात झाल्याची बातमी कानावर आली, तेव्हाही इतके काही विपरीत घडेल, असे वाटले नव्हते. डॉक्टर जोवर काही सांगत नाहीत, तोवर कोणत्याही बातमीवर विश्वास ठेवायला मन धजावत नव्हते. सुप्रियाताईंशी बोलणे होत होते. पण अखेर ती वाईट बातमी आलीच. माझा जवळचा, दमदार आणि दिलदार मित्र मी गमावला. ही पोकळी कधीही भरून न निघणारी आहे. कधीच विस्मरणात जाणार नाही, असा धक्का देणारा हा प्रसंग आहे.
मित्र कसा असतो, हे मी अत्यंत जवळून दादांच्या बाबतीत अनुभवले
मित्र कसा असतो, हे मी अत्यंत जवळून दादांच्या बाबतीत अनुभवले आहे. दादा हे कायम माझे मित्र होते. तसे खूप जवळून काम आम्ही 2019 पासून केले असले तरी त्याही पूर्वी विकासाच्या किंवा राज्यहिताच्या विषयांवर आम्ही एकमेकांबरोबर होतो. दूरगामी व्हिजन असलेले नेते फार कमी असतात. दादा हे त्यापैकी एक. शब्दाला जागणारा नेता, कितीही संकट आले तरी शब्दाला किंमत असते आणि प्रसंगी ती किंमत मोजायचीही असते, हे दादांकडून शिकण्यासारखे आहे. काही इनिंग आम्ही नव्याने सुरू केल्या होत्या, ही इनिंग प्रदीर्घ चालेल, असे वाटत असतानाच दादांनी अकाली एक्झिट घेतली.
भावनाप्रधान दादा फार कमी लोकांनी पाहिला, पण…
फार कमी लोक असतात, ज्यांच्याशी आपण मनातले बोलू शकतो. काही संबंध राजकारणापलीकडचे असतात. आमची मैत्री राजकारणापलीकडची होती. अवांतर विषयांवर बोलण्याची मैफील दादा सोबत असले की घडायची. आम्ही कितीदा रात्री उशिरापर्यंत गप्पा करीत बसायचो. पण, त्यातही कामाच्या विषयांची यादी त्यांची तयार असायची. कोणत्या विषयांवर बोलायचे आहे, याचा कागद हाती असायचा. धीरगंभीर विषयांवर बोलून झाले की दादांचे व्यक्तिमत्त्व खुलायचे. मग त्यांच्यातील ‘दादा’ व्यक्त व्हायचा. कुणाची आणि कशाचीच पर्वा करायची नाही, असे उत्तुंग आणि दिलखुलास दादा व्यक्त व्हायचे. त्यांच्यातील भावनाप्रधान दादा फार कमी लोकांनी पाहिला. पण, मला तेही दादा अनुभवता आले. कारण, आम्ही फार छोट्या कालखंडात पराक्रमच तेवढे केले.
‘पाहतो-करतो’ ही शैली दादांना मान्यच नव्हती
राजकारणात अनेकदा वरकरणी माणसं पाहिली जातात, त्याचे व्यक्तिमत्त्व पाहिले जात नाही. पण, कामाचा प्रचंड आवाका आणि त्यांच्याठायी असलेला अनुभव या अर्थाने दादा एक अतिशय मोठे नेतृत्व. सकाळी 7 वाजता दिवस सुरू करणारे दादा थांबत नसत. सरकारमध्ये असताना अनेकदा कठोर निर्णय घ्यावे लागत असतात. क्षणिक ते अप्रिय वाटत असले तरी दीर्घकालीन जनहिताचे असतात. अशा वेळी राजकीय कौशल्य पणाला लागत असते, व्यवस्थापन कौशल्यात जोखीम आणि हिंमत दोन्ही ठेवावी लागते. असे निर्णय घेण्यात पण दादा अग्रेसर असत. त्यामुळे त्यांच्यापुढे एखादी फाइल गेली किंवा विषय गेला तर दोनच उत्तरं ऐकू यायची. एकतर होकार किंवा नकार. ‘पाहतो-करतो’ ही शैली दादांना मान्यच नव्हती.
प्रत्येक प्रस्तावाचा अभ्यास करून ते…
या शैलीने क्षणिक लोक दुखावतातही. पण, ती दीर्घकाळासाठी जोडलीही जातात. सभागृहात उत्तरे देतानासुद्धा गुळगुळीत नाहीत, तर ठामपणे उत्तरे देताना ते दिसायचे. सर्वांत महत्त्वाचे सभागृह सुरू होण्यापूर्वी दादा सभागृहात यायचे. मग ते मुंबई असो की नागपूर. सभागृहातील नवीन सदस्यांना शिस्त आणि नियम शिकवण्यातही त्यांचा पुढाकार नेहमी असायचा. मंत्रिमंडळ बैठकीत येण्यापूर्वी प्रत्येक प्रस्तावाचा अभ्यास करून ते आलेले असत. 18-20 विषय असले तरी नेमक्या कोणत्या विषयात कोणता मुद्दा उपस्थित करायचा, हे त्यांना ठावूक असे.
या नावाने मारायचे हाक
2014 नंतर त्यांच्या तोंडी कायम माझे नाव ‘सीएम साहेब’ असे असायचे. 2019 ला ते उपमुख्यमंत्री झाले आणि मी विरोधी पक्षनेता. पण, सभागृहात बोलताना ते हमखास मला ‘सीएम साहेब’ म्हणायचे. मग हळूच जीभ चावून ‘देवेंद्रजी’ म्हणायचे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



