
Vishwas Nangre Patil On Ajit Pawar Death in Plane Crash: महाराष्ट्र राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात (Anti-Corruption Bureau – ACB) अतिरिक्त पोलीस महासंचालक (ADG) म्हणून कार्यरत असलेल्या विश्वास नांगरे पाटील यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांना एका अनोख्या पोस्टमधून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. “दादा, ताकदीचा नेता नियतीने हिराहून घेतला,” या मथळ्या खाली लिहिलेल्या पोस्टमध्ये अजित पवारांसंदर्भातील अनेक आठवणींना विश्वासन नांगरे पाटलांनी उजाळा दिला आहे.
दादांनी आवर्जून फोन करून…
“अहिल्यानगरला एसपी असताना माझे राजकीय गणित जमत नव्हते. दादा पुण्याचे पालकमंत्री होते. अचानक दादांचा फोन आला. तुमची ‘पुणे ग्रामीण’ला एस पी म्हणून शासन नेमणूक करीत आहे. जिल्ह्यातील गुंडांना सुतासारखे सरळ करावं लागेल. माझा आणि दादांचा पूर्वीचा परिचय नव्हता. पोस्टिंग झाली. अधिकाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्या आणि पोस्टिंग केल्या. दादांचा कोणासाठीही फोन नाही. आयजी म्हणून नेमणुकीस असताना चाकण, तळेगाव, मुळशी भागातील 25 गँग ला मोका लावला, 150 च्या वर गुन्हेगारांना तडीपार केले, दादांनी आवर्जून फोन करून अभिनंदन केले,” अशी आठवण विश्वास नांगरे पाटलांनी पोस्टमधून सांगितली आहे.
उदघाटनावेळी चकाचक लॉक अप आणि त्यासमोरचे लश ग्रीन लॉन पाहून…
“एसपी म्हणून अडीच वर्षे आणि पश्चिम महाराष्ट्राचा आयजी म्हणून 3 वर्षे काम करताना कोणत्या चुकीच्या बाबीसाठी त्यांनी दबाव टाकल्याचा माझा अनुभव नाही. दादा नेहमी अदबीने बोलायचे. अहो नांगरे पाटील आणि नंतर आपुलकी वाढल्यावर अहो विश्वासराव आणि फोनवर ‘ ऐका ना ‘ असे आर्जव आणि प्रेमाने साद घालायचे. दादांच्या कामाची पद्धत पद्धतशीर आणि शिस्तबद्द! मी एकदा पोलीस क्रीडास्पर्धांसाठी त्यांना निमंत्रित केले होते. खेळ संपल्यानंतर त्यांनी पंचाला तू ‘जीन्स पॅन्ट’ला उभी इस्त्री का केलीस म्हणून झाप झाप झापले. परिसराची स्वच्छता आणि टापटीपीवर त्यांची बारीक नजर असायची. बारामती पोलीस स्टेशनची इमारत बांधायची चालू असताना ते किमान डझन वेळी साईटवर आले असतील. पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांना बांधकामाचा दर्जा अत्युत्तम राहील याच्या सक्त सूचना होत्या. कंत्राटदारानेही थोडीसुद्धा रिस्क न घेता फाईव्ह स्टार ठाणे बनवले. उदघाटनावेळी चकाचक लॉक अप आणि त्यासमोरचे लश ग्रीन लॉन पाहून दादा मिश्किलीने म्हणाले , ‘ आयला गडबड झाली. आता चोरांना या अशा पॉश लॉक अपमध्ये ठेवले तर ते बेल मागणारच नाहीत. आपल्याला त्यांना फुकट पोसावं लागेल.’ दादा दिसायला बोलायला कडक पण अत्यंत संवेदनशील होते,” असं विश्वास नांगरे पाटलांनी म्हटलं आहे.
एकदा मला रागाने फोन केला आणि…
“भोर जवळच्या धरणात गावकऱ्यांची बोट उलटून 27 जण मृत्युमुखी पडले होते. दादा भेट द्यायला आले तेव्हा त्यांनी शासकीय निधीची वाट न पाहता त्या 27 कुटुंबियांना जागेवरच प्रत्येकी 2 लाख मदत केली. कार्यकर्त्यांच्या मोहोळात ते राणी माशीसारखे शिस्तीने काम करायचे. त्यांचा मी जिममध्ये किंवा रनिंग करीत असताना भेटायला यायला निरोप यायचा. मी अनेकदा जिमच्या पेहरावात गेस्ट हाऊस ला सकाळी 6/7 वाजता पोहोचायचो. एकदा मला रागाने फोन केला, “अहो तुम्ही हे हायवेवरचे डिव्हायडर सगळे जोडून घेतले. गावातल्या लोकांचे धाबे आहेत, छोटे मोठे धंदे आहेत. सगळे बंद पडताहेत,” असं म्हणाले. मी दादांना डिव्हायडर बेकायदेशीर तोडल्याने किती आणि कसे अपघात झाले आणि ते जोडल्यावर फेटल अपघात किती कसे कमी झाले, याचे प्रेझेन्टेशन दिले. त्यांनी जाहीर सभेत माझे कौतुक केले आणि मुख्य सचिवांना फोन करून असा ड्राईव्ह पूर्ण राज्यात घ्यायच्या सूचना दिल्या,” अशी आठवणही नांगरे पाटलांनी सांगितली आहे.
रेव्ह पार्टीवर कारवाई
“पुण्याला एसपी असताना सिंहगडाच्या पायथ्याशी रंगात आलेल्या रेव्ह पार्टीवर कारवाई केल्याबद्दल त्यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात जाहीर सन्मान केला आणि ड्रग्जची पुण्यातील कीड मुळापासून उखडून टाकण्याचे आदेश दिले. मनाचा हळवा, शिस्तीचा कडवा, स्वभावाने मावळा असणाऱ्या या लोकनेत्याला सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण होती, दीनदलितांविषयी लळा होता, विकासाची दूरदृष्टी होती. खूप तपे लागतात असे प्रगल्भ नेतृत्व तयार व्हायला आणि नियती क्रूर झाली की क्षणात होत्याचे नव्हते होते,” असं म्हणत विश्वास नांगरे पाटलांनी अजित पवारांच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त केली आहे.
बुधवारी केलेल्या पोस्टच्या शेवटी विश्वास नांगरे पाटलांनी, “आजची सकाळ अशा महाराष्ट्राला चटका लावणाऱ्या दादांच्या एक्सिटने झाली. दादांच्या आत्म्यास चिरशांती लाभो! आदरांजली,” असं म्हटलं आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



