
Ajit Pawar Cremation Funeral Mukhangni To Mortal at Katewadi Baramati: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि बारातमीचे आमदार अजित पवार अनंतात विलीन झाले आहेत. बुधवारी सकाळी पावणे नऊ वाजता अजित पवार हे विमानाने बारामतीमधील जाहीर प्रचार सभांसाठी पोहचत असताना त्यांच्या विमानाला भीषण अपघातात त्यांचा मृत्यू झाल्यानंतर आज बारामतीमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अजित पवारांचे पुत्र जय पवार आणि पार्थ पवार या दोघांनीही वडिलांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. यावेळी अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार, काका आणि राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, पुतण्या रोहित पवारांसोबतच संपूर्ण पवार कुटुंब उपस्थित होतं. अजित पवारांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष नितिन नबीन यांच्यासहीत राज्यातील अनेक नेते उपस्थित होते. ‘अमर रहे अमर रहे अजित पवार अमर रहे’, ‘अजित पवार जिंदाबाद’, ‘एकच वादा, अजितदादा’ अशा घोषणांमध्येच अजित पवारांच्या समर्थकांनी साश्रू नयनांनी त्यांना अखेरचा निरोप दिला. ‘कामाचा माणूस’ अशी जनमाणसामध्ये प्रतिमा असलेला, प्रशासनावर जबरदस्त पकड असलेला नेता महाराष्ट्राने गमावल्याची भावना व्यक्त करत प्रत्येकजण पाणावलेल्या डोळ्यांनी अजित पवारांना शेवटचं डोळे भरुन पाहत होता.
आधी निवासस्थानी नेलं पार्थिव…
1 लाखांची क्षमता असलेलं बारामतीमधील विद्या प्रतिष्ठानचं मैदान समर्थकांनी खचखाच भरलं होतं. काल रात्रीपासूनच अजित पवारांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. सकाळी अजित पवारांचं पार्थिव त्यांचं मूळ गाव असलेल्या काटेवाडीमधील ‘पवार फार्म’ या निवासस्थानी नेण्यात आलं होतं. तिथे पवार कुटुंबातील सदस्यांनी अजित पवारांच्या पार्थिवाचं अत्यंदर्शन घेतल्यानंतर काटेवाडीमधून अजित पवारांचं पार्थिव विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर नेण्यात आलं. इथे अंत्यंविधीसाठी विशेष चौथरा बांधण्यात आला होता. याच ठिकाणी अजित पवारांना मुखाग्नी देण्यात आला. विमानतळापासून दोन किलोमीटर अंतरावर 500 मीटरवरुन विमान कोसळून विमानाला भीषण आग लागली. या अपघातामध्ये अजित पवारांसहीत विमानातील क्रू मेंबर आणि अजित पवारांचे सहकारी अशा एकूण सहा जणांचा मृत्यू झाला. अजित पवारांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण महाराष्ट्राला मोठा धक्का बसला असून देशभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
गर्दीच गर्दी
अजित पवारांना पोलीस दलाने काटेवाडीतील घरासमोरच अखेरची सलामी दिली. अजित पवारांना अखेरचं पाहण्यासाठी रस्त्यांच्या दुतर्फा नागरिकांनी गर्दी केली होती. अनेक ठिकाणी अजित पवारांचं पार्थिव घेऊन जाणाऱ्या रुग्णावाहिकेवर स्थानिकांनी फुलांचा वर्षाव केला. अनेक महिलांना अश्रू अनावर झाले होते. बारामतीने आपला सर्वात लाडका लेक गमावल्याची भावना स्थानिकांनी व्यक्त केली.
अनेक नेत्यांची हजेरी
अनेक आजी-माजी मंत्री अजित पवारांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी बारामतीत हजर होते. सुशील कुमार शिंदे, प्रणिती शिंदे, खासदार शाहू महाराज, विश्वजीत कदम, अशोक चव्हाण, शशिकांत शिंदे, मंत्री शिवेंद्रसिंहराजे, जयंत पाटील, हर्षवर्धन पाटीलही अजित पवारांच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित होते. मंगलप्रभात लोढा, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे, मंत्री चंद्रकांत पाटील, छगन भुजबळ अजित पवारांच्या अंत्यसंस्कारासाठी हजर होते. राज ठाकरे, शर्मिला ठाकरे, अमित ठाकरे देखील अंत्यसंस्कारासाठी उपस्थित होते. याचबरोबर विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर अजित पवारांच्या अंत्यसंस्कारासाठी पोहोचलेले नवाब मलिक, अमोल मिटकरी, रुपाली चाकणकर ढसाढसा रडले. अनेक नेत्यांनी अश्रू अनावर झाल्याचं दिसून आलं.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



