
Bharat gas Lite: भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) या मोठ्या कंपनीने घरगुती वापरासाठी एक नवीन प्रकारचे एलपीजी सिलिंडर सुरू केले आहे. या सिलिंडरला ‘भारतगॅस लाइट – नव्या भारताचा नवा सिलिंडर’ असे नाव देण्यात आले आहे. हे सिलिंडर विशेष प्रकारच्या संमिश्र सामग्रीपासून तयार करण्यात आले असून, ते पारंपरिक लोखंडी सिलिंडरपेक्षा खूप वेगळे आणि सुधारित आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, हे सिलिंडर किचनमध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी विशेषतः डिझाइन करण्यात आलंय. ज्यामुळे दैनंदिन कामे सोपी होऊन गॅस वापरात सुरक्षितता वाढणार आहे. ग्राहकांच्या सोयी आणि नवकल्पनेवर आधारित हा सिलेंडर बनवण्यात आलाय. हे सिलिंडर गोवा राज्यात सुरुवातीला उपलब्ध करण्यात येतय. यामुळे घरगुती गॅस वापरात एक मोठा बदल येणार असून शहर आणि ग्रामीण भागातील लोकांना फायदा होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येतोय. हे सिलिंडर आधुनिक भारताच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तयार करण्यात आले असून, ते हलके आणि वापरण्यास सोपे असल्याची माहिती कंपनीने दिली.
सिलिंडरचे मुख्य वैशिष्ट्य काय?
हे नवे सिलिंडर पारंपरिक सिलिंडरपेक्षा 50 टक्क्यांपेक्षा जास्त हलके आहे, ज्यामुळे ते उचलणे, वाहून नेणे आणि बसवणे खूप सोपे होते. त्याची बॉडी पारदर्शी असल्यामुळे आतली गॅसची पातळी लगेच दिसते, ज्यामुळे गॅस संपण्याची चिंता कमी होते आणि रिफिलची योजना आगाऊ करता येते. संमिश्र सामग्रीमुळे हे सिलिंडर गंजत नाही. ज्यामुळे किचन नेहमी स्वच्छ आणि नीटनेटकी राहते. पारंपरिक स्टील सिलिंडरमध्ये गंज येण्याची समस्या असते, पण या डिझाइनमुळे ती समस्या येणार नाही. याशिवाय हे सिलिंडर विस्फोटरोधक आहे. म्हणजे कठीण परिस्थितीतही धोका कमी होतो आणि अतिरिक्त सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत. ग्राहकांच्या सुरक्षितता आणि सोयीला प्राधान्य देण्याच्यादृष्टीने हे सिलिंडर बनवण्यात आलंय.
तुमचा फायदा काय?
या सिलिंडरमुळे किचनमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना मोठी मदत मिळेल. कारण ते हलके असल्यामुळे महिलांना किंवा वृद्धांना ते हाताळणे सोपे पडेल. गॅसची पातळी दिसल्यामुळे अचानक गॅस संपण्याची भीती नसते. ज्यामुळे दैनंदिन जीवन सुसह्य होते. गंज न येण्यामुळे किचन स्वच्छ राहते आणि सिलिंडरचे आयुष्य वाढते. सुरक्षित डिझाइनमुळे अपघातांचा धोका कमी होतो. ज्यामुळे कुटुंबाची चिंता कमी होते. हे सिलिंडर शहरातील छोट्या घरांपासून ग्रामीण भागातील घरांपर्यंत सर्वत्र उपयुक्त आहे.
भविष्यातील योजना काय?
बीपीसीएल ही फॉर्च्यून ग्लोबल 500 कंपनी असून ती महारत्न दर्जाची सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आहे. ग्राहकांच्या सुरक्षितता आणि सोय याला कंपनीकडून प्राधान्य देण्यात आले आहे. हे सिलिंडर देशभरात हळूहळू उपलब्ध करण्याची योजना आहे. हे उत्पादन रोजच्या ऊर्जा गरजांना नव्या दृष्टिकोनातून पूर्ण करेल, असा विश्वास कंपनीला आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



