
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनानंतर आता त्यांच्या जागी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार त्यांचा पदभार स्वीकारणार असल्याचे समोर आले आहे. सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदासाठी होकार दिला असल्याची माहिती समोर आली असून त्यांचा निरोप नरेश आरोरा हे मुंबईकडे घेऊन जाण्यास निघाले आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीची उद्या महत्त्वाची बैठक होणार असून, या बैठकीत सुनेत्रा पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊन सायंकाळी 5 वाजता शपथविधी देखील पार पडण्याची शक्यता आहे. या संपूर्ण पार्श्वभूमीवर आपण सुनेत्रा पवार यांच्याविषयी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करुयात.. सुनेत्रा पवारच का? सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्यामागे अनेक कारणे आहेत. परंतु, सुनेत्रा पवारच का? जेव्हा पक्षात इतरही अनेक ज्येष्ठ व अनुभवी नेते आहेत, जसे की छगन भुजबळ असतील, प्रफुल्ल पटेल असतील किंवा सुनील तटकरे देखील आहेत. मात्र, अजित पवार यांच्या पत्नी म्हणून सुनेत्रा पवार यांच्या नावाला पहिली पसंती ही कार्यकर्ते व समर्थकांकडून होतीच शिवाय सुनेत्रा पवार यांना असलेला दांडगा राजकीय वारसा. तसेच त्यांच्याजागी इतर कुठल्या नेत्यांना संधी दिली असती तर राष्ट्रवादीमधील कारभार डळमळीत होण्याची शक्यता होती. प्रफुल्ल पटेल यांच्याकडे जबाबदारी दिली असती तर सुनील तटकरे किंवा छगन भुजबळ सारखे ज्येष्ठ व अनुभवी नेते नाराज झाले असते. त्यामुळे अशा महत्त्वाच्या पदावर आणि पक्षावर नियंत्रण ठेवण्यासाठी तिथे ‘पवार’च पाहिजे होता. त्यानुसारच सुनेत्रा पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता जास्त आहे. दांडगा राजकीय वारसा सुनेत्रा पवार या धाराशिवचे नेते स्व. पद्मसिंह पाटील यांच्या भगिनी आहेत, तर राणाजगजितसिंह पाटील यांच्या त्या आत्या लागतात. धाराशिवच्या राजकारणात पद्मसिंह पाटलांचा चांगलाच दबदबा होता. त्यांचा वारसा राणाजगजितसिंह पाटील पुढे नेत आहेत. सुनेत्रा पवार या नेहमी सांगतात की, राजकारण आणि सामाजिक कार्याबद्दलची त्यांची आवड त्यांच्या वडिलांकडून आली आहे. ते स्वातंत्र्यसैनिक होते आणि गावातील प्रभावशाली व्यक्तींपैकी एक होते. त्यांनी हेही सांगितले की, त्यांचे बालपण घराघरात जाऊन लोकांना भेटत, त्यांच्याशी संवाद साधत गेले आहे. त्यानंतर सुनेत्रा पवार या पवार घरण्याशी जोडल्यानंतर पुन्हा राजकारण अगदी जवळून त्यांना अनुभवता आले आहे. महिलांच्या रोजगारासाठी टेक्सटाइल पार्क सुनेत्रा पवार यांना पर्यावरणाची तसेच स्वच्छतेची आवड आहे. ही आवड जोपासण्यासाठी त्यांनी बारामती येथे एन्व्हायरनमेंटल फोरम ऑफ इंडिया ही सामाजिक संस्था स्थापन केली. या संस्थेच्या माध्यमातून त्या पर्यावरणाशी निगडीत काम करत आल्या आहेत. महिलांना रोजगार मिळावा यासाठी सुनेत्रा पवारांनी टेक्सटाइल पार्कची सुरुवात केली. या पार्कमध्ये हजारो महिलंनया रोजगार उपलब्ध झाला आहे. 2006 पासून या पार्कचे अध्यक्षपद हे सुनेत्रा पवार यांच्याकडे आहे. याचसोबत विद्या प्रतिष्ठान या संस्थेवरही त्या विश्वस्त म्हणून काम करत आहेत. लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात 2023 साली अजित पवारांनी वेगळे होत राष्ट्रवादी पक्ष फोडत महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर 2024 साली झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत अजित पवारांनी सुनेत्रा पवारांना निवडणुकीत उतरवले. सुनेत्रा पवारांचा तेव्हा सामना झाला होता शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी. हा काळ अजित पवारांसाठी कठीण काळ होता, पण अशा परिस्थितीत देखील सुनेत्रा पवारांनी अजितदादांना खंबीर साथ दिली आणि जोरदार प्रचार केला. मात्र, या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. लोकसभेत जरी पराभव झाला असला तरी सुनेत्रा पवारांची वर्णी राज्यसभेवर लावण्यात आली. पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या रिक्त झालेल्या जागेसाठी राज्यसभेची निवडणूक झाली. या जागेसाठी सुनेत्रा पवारांनी 13 जून 2024 रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर त्यांची राज्यसभेच्या सदस्यपदावर निवड झाली. पार्थ पवार आणि जय पवारांकडे राजकारणाच्या अनुभवाचा अभाव तर दुसरीकडे अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार आणि जय पवार यांच्याकडे अद्याप राजकारणाचा तेवढा अनुभव नाही. पार्थ पवारांचा मागच्या निवडणुकीत पराभव झाला होता. यावरून अजित पवारांवर जोरदार टीका देखील झाली होती. स्वतःच्या मुलाला निवडून आणता आले नाही, म्हणत विरोधकांनी टीका केली होती. तर जय पवार राजकारणापासून अंतर ठेऊनच असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे पार्थ पवार आणि जय पवार यांच्याकडे कुठली मोठी जबाबदारी देणे जवळपास अशक्यच आहे. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ ग्रहण केली तर त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरणार आहेत. त्यामुळे महिला वर्गाचा देखील येत्या काळात चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री पदावर महिला चेहरा असणे एवढे देखील महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारांना पाठबळ देते. त्यामुळे ही बाजू देखील मजबूत ठरत आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



