
Devendra Fadnavis On Sunetra Pawar: दिवंगत अजित पवार यांच्या विमान अपघातातातील अकाली निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. लोकभवनात शपथविधी कार्यक्रम पार पडला. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. ‘अजितदादा अमर राहे’ असे घोषवाक्य लावून भावनिक वातावरण निर्माण झाले. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
शपथ घेण्यापूर्वी दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी एकमताने निवड झाली. छगन भुजबळ यांनी प्रस्ताव मांडला आणि इतर नेत्यांनी समर्थन केले. ही निवड मुख्यमंत्री फडणवीस यांना कळवली गेली. सुनेत्रा पवार राज्यसभा खासदार असल्याने त्यांना लवकरच राजीनामा देऊन विधानसभेकडे वळावे लागेल. बारामतीत पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे.
सुनेत्रा पवारांकडे 3 महत्वाची खाती
उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांना तीन महत्त्वाची खाती सोपवण्यात आली आहेत. राज्य उत्पादन शुल्क (एक्साइज), क्रीडा आणि युवक कल्याण, तसेच अल्पसंख्याक विकास आणि औकाफ.
महत्त्वाचे अर्थखाते फडणवीसांकडेच
अजित पवार यांच्याकडे असलेले अर्थ आणि नियोजन हे सर्वात प्रभावी खाते मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच राहिले आहे. याचा अर्थ असा की, राज्याचा अर्थसंकल्प आणि आर्थिक धोरणे यांचे नियंत्रण फडणवीस यांच्याकडे राहील. दरम्यान अर्थसंकल्प सादर होईपर्यंतच हे खाते मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे असेल, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.
काय म्हणाले फडणवीस?
प्रसंग कठीण होता…
पण, ज्या धीरोदात्तपणे श्रीमती सुनेत्रावहिनींनी महाराष्ट्र हिताचा निर्णय घेतला, तो कौतुकास्पद, धाडसी आणि त्यांची प्रतिबद्धता अधोरेखित करणारा आहे.
शुभेच्छा देण्याचा हा प्रसंग नाही…
पण, अजितदादांचा वारसा त्या समर्थपणे चालवतील, हा मला विश्वास आहे. राज्याला… pic.twitter.com/qoE9zKF9nZ— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 31, 2026
प्रसंग कठीण होता पण, ज्या धीरोदात्तपणे श्रीमती सुनेत्रावहिनींनी महाराष्ट्र हिताचा निर्णय घेतला, तो कौतुकास्पद, धाडसी आणि त्यांची प्रतिबद्धता अधोरेखित करणारा आहे.शुभेच्छा देण्याचा हा प्रसंग नाही पण, अजितदादांचा वारसा त्या समर्थपणे चालवतील, हा मला विश्वास आहे. राज्याला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री लाभल्या, त्यांची ही कारकिर्द यशस्वी ठरेल. भाजपा आणि महायुती सरकार म्हणून या कठीण प्रसंगी, आम्ही अजितदादा पवार यांच्या कुटुंबीयांच्या पाठिशी आहोत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



