
Ajit Pawar Death Sanjay Raut Tribute: “अजित पवार महाराष्ट्राचे सहा वेळा उपमुख्यमंत्री झाले. हा विक्रम आहे. त्यांना मुख्यमंत्री व्हायचे होते, पण ते होऊ शकले नाहीत. अजितदादांनी ज्या मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळात काम केले त्या मुख्यमंत्र्यांपेक्षा दादांचा अनुभव, आवाका, लोकप्रियता जास्त होती, पण नशिबाने त्यांना या बाबतीत साथ दिली नाही,” असं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. “एकनाथ शिंदे 40 आमदारांसह भाजपच्या सोबत गेले व मुख्यमंत्री झाले. यावर दादा गमतीने म्हणाले, “ही ऑफर मला आली असती तर शिंद्यांच्या आधी मी गेलो असतो!” पण भाजपच्या सोबत दादा गेले व उपमुख्यमंत्री पदावरच स्थिरावले. ते भाजपबरोबर गेले, पण विचारांची चौकट मोडली नाही. उदारमतवादी, निधर्मी म्हणूनच ते काम करीत राहिले. एकनाथ शिंदे व त्यांच्या लोकांप्रमाणे ते नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयात हजेरी देण्यासाठी गेले नाहीत. ते लवचिक होते, पण फार झुकले नाहीत,” असं म्हणत राऊतांनी अजित पवारांचं कौतुक केलं आहे.
…तरीही ते राज्यभर पसरलेले नेते
“शरद पवारांनी मनात आणले असते तर अजित पवारही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकले असते. पण त्यांची राजकीय घोडदौड उपमुख्यमंत्री व अर्थमंत्रीपदावरच थांबली. तरीही अजित पवारांची राजकारणावरची पकड सुटली नाही. बुधवारी सकाळी अजित पवारांचा प्रवास कायमचा थांबला. बारामतीतच त्यांचे विमान कोसळले. त्या अपघातात अजित पवारांच्या रुबाबदारपणाचा कोळसा झाला. `घड्याळ’ चिन्ह कोणाचे? यावरून मोठे रणकंदन झाले, पण अजित पवारांच्या मनगटावरील घड्याळावरून त्यांची ओळख पटवण्याची वेळ आली. तिखट जिभेचा नेता म्हणून ते लोकप्रिय होते. त्यांच्या तिखटपणाने अनेक वाद ओढवून घेतले. तरीही अजित पवार जसे होते तसे महाराष्ट्राने स्वीकारले. अजित पवारांचे नेतृत्व वारशाने आणि घराणेशाहीतून उभे राहिले. अजित पवारांनी रस्त्यावरच्या लढाया केल्या नाहीत. त्यांनी आंदोलनात लाठ्याकाठ्या खाल्ल्या नाहीत. राजकीय कारणासाठी तुरुंगवास भोगला नाही. कधी सत्याग्रह आणि लोकांच्या प्रश्नांवर उपोषण केले नाही. तरीही ते राज्यभर पसरलेले नेते होते,” असं राऊत म्हणाले आहेत.
महाराष्ट्रात स्वत:चे जाळे निर्माण केले
“पहाटेच्या शपथविधीनंतर अजितदादांचे आमदार त्यांच्याबरोबर राहिले नाहीत. अजित पवार परत फिरले व शरद पवारांच्या कृपेने उद्धव ठाकरे मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री झाले. त्या सरकारात ते अडीच वर्षे इमानाने राहिले. मुख्यमंत्री ठाकरे यांचे विश्वासू व अनुभवी सहकारी म्हणून वावरले. शिंदे हे आमदार घेऊन सुरतला पळाले तेव्हा अजित पवारांनी टीका केली. तेच अजित पवार पुढे शरद पवारांचा पक्ष फोडून, आमदार घेऊन भाजपच्या सरकारात गेले, पण शिंद्यांप्रमाणे पूर्ण भाजपमय झाले नाहीत. त्यांनी आपले सत्त्व गमावले नाही,” असं राऊतांनी म्हटलं आहे. “बारामती शरद पवारांची बारामती पुढे अजित पवारांची झाली. बारामतीत त्यांचा जनता दरबार भरत असे. जागच्या जागी ते निर्णय घेत. धारदार आवाज, परखड बोलणे, रांगडे व्यक्तिमत्त्व. काम होणार असेल तर होय, नाही तर नाही, असे तोंडावर सांगणारा हा नेता. अजित पवारांनी स्वत:ची प्रतिमा निर्माण केली. पण त्या प्रतिमेवर शरद पवारांची सावली शेवटपर्यंत राहिली. ते चतुर आणि चाणाक्ष होते. शरद पवारांप्रमाणे ते गर्दीतले नेतृत्व होते. अजित पवारांबरोबर होते ते लोक ही शरद पवारांनी घडवलेली पिढी आहे. त्यामुळे अजित पवारांचे नेतृत्व स्वीकारले तरी ते सर्व शरद पवारांचे मोठेपण, उपकार मान्य करीत राहिले. हसन मुश्रीफ, प्रफुल पटेल, तटकरे, मुंडे ही सर्व शरद पवारांचीच माणसे. पवारांनी महाराष्ट्रात स्वत:चे जाळे निर्माण केले. ते जाळे अजित पवारांना सहज मिळाले. सत्ता व पैसा हे महाराष्ट्राचे राजकीय समीकरण अजित पवारांनाही मानावे लागले,” असा उल्लेख राऊतांच्या ‘रोखठोक’ या सदरातील लेखात आहे.
…तरीही अजित पवारांचा तोरा आणि रुबाब कायम राहिला
विद्या प्रतिष्ठान, रयत शिक्षण संस्था, वसंतदादा शुगर इन्स्टिटय़ूट अशा संस्था शरद पवारांच्या नेतृत्वाखाली बहरल्या. अजित पवारांच्या ताब्यात त्या आयत्याच आल्या. अजित पवारांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना, आमदारांना, सहकाऱ्यांना आर्थिकदृष्ट्या समृद्ध केले. त्याच समृद्धीतून राजकारण चालवले. पुणे, बारामती, पिंपरी-चिंचवड ही त्यांची प्रभावक्षेत्रे. या क्षेत्रांत पालकमंत्री म्हणून अजित पवार सतत सक्रिय राहिले. या काळात शहरात गुन्हेगारी वाढली, गुन्हेगार राजकारणात आले, त्यांना राजकीय पक्षाने उमेदवाऱ्या दिल्या. त्यावर अजित पवारांवर टीका झाली. या क्षेत्रात बिल्डर व उपऱ्यांचे राज्य आले. पुण्याची संस्कृती त्यामुळे बिघडून गेली. तरीही अजित पवारांचा तोरा आणि रुबाब कायम राहिला. एकेकाळी पुण्याची जहागिरी शरद पवारकृपेने सुरेश कलमाडींकडे होती. कलमाडी यांनी अजित पवारांमुळे शरद पवारांना सोडले. त्यानंतर अजित पवार हे पुण्याचे `पालनहार’ बनले. पंधरा दिवसांपूर्वी कलमाडी गेले व आता अजितदादा गेले,” असं राऊत म्हणाले.
दादांना एखादा मरणोत्तर पद्मभूषण देऊन…
“अजित पवारांचा मृत्यू अकल्पित आहे. पवारांनंतर महाराष्ट्राच्या राजकारणाचे वळण बदलेल. राज्याला उपमुख्यमंत्री पन्नास मिळतील, पण अजित पवारांसारखा अनुभवी अर्थमंत्री मिळणार नाही. अलीकडे बहुसंख्य मंत्री मंत्रालयात जात नाहीत. अजित पवार त्यास अपवाद होते. अजित पवार फटकळ होते, पण राजकारणातून अस्तंगत होत चाललेली `दुसऱ्यांचे ऐकून घेण्याची कला’ अजितदादांकडे होती. ते निर्णय घ्यायला मागेपुढे पाहत नसत. राज्यकर्त्याने `राज्य’ करावे या भूमिकेशी ते प्रामाणिक होते. लाल महालातील दादोजी कोंडदेवांचा पुतळा काढण्याचा निर्णय अजितदादांचा होता. त्याबद्दल ते टीकेचे धनी झाले, पण त्यांनी माघार घेतली नाही. दादांवर भ्रष्टाचाराचे सर्वात जास्त आरोप भाजपने केले, पण सत्तर हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचे आरोप करूनही मी त्यांच्याच सरकारमध्ये बसलोय ना? असा शालजोडीतला मारायला ते मागेपुढे पाहत नसत. दादा आता नाहीत. त्यांना पंतप्रधानांपासून राष्ट्रपतींनी श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या गुणांची तारीफ केली. दादांना खरी श्रद्धांजली कोणती? त्यांच्यावर केलेले सत्तर हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचे आरोप मागे घेणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली! मोदी-फडणवीस ते करतील काय? की पुढच्या प्रजासत्ताक दिनी दादांना एखादा मरणोत्तर पद्मभूषण देऊन आपल्या दातृत्वाचे ढोल वाजवतील?” असा टोला राऊतांनी लगावला आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



