
Ajit Pawar Death Sanjay Raut On Oath With Devendra Fadnavis In 2019: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनानंतर त्यांच्या आठवणींना खासदार संजय राऊतांनी उजाळा दिला आहे. ‘सामना’मधील ‘रोखठोक’च्या लेखातून राऊतांनी पहाटेच्या शपथविधीच्या आधीच्या दिवशी नेमकं काय झालं होतं याबद्दलची एक रंजक आठवण शेअर केली आहे. तसेच एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर अजित पवारांनी घेतलेल्या भूमिकेचाही उल्लेख राऊतांनी केला आहे. तसेच शिंदेप्रमाणे अजित पवारांनी बंडखोरी केली तेव्हा शिंदेंच्या वेळी झालेला तितका संताप का झाला नाही? याबद्दलही राऊतांनी भाष्य केलं आहे.
शिंदे आमदार घेऊन सुरतला पळाले तेव्हा अजित पवारांनी…
“पहाटेच्या शपथविधीनंतर अजितदादांचे आमदार त्यांच्याबरोबर राहिले नाहीत. अजित पवार परत फिरले व शरद पवारांच्या कृपेने उद्धव ठाकरे मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री झाले. त्या सरकारात ते अडीच वर्षे इमानाने राहिले. मुख्यमंत्री ठाकरे यांचे विश्वासू व अनुभवी सहकारी म्हणून वावरले. शिंदे हे आमदार घेऊन सुरतला पळाले तेव्हा अजित पवारांनी टीका केली. तेच अजित पवार पुढे शरद पवारांचा पक्ष फोडून, आमदार घेऊन भाजपच्या सरकारात गेले, पण शिंद्यांप्रमाणे पूर्ण भाजपमय झाले नाहीत. त्यांनी आपले सत्त्व गमावले नाही.
संपूर्ण राष्ट्रवादी घेऊन भाजपच्या तंबूत गेले
“सत्तेच्या बाबतीत ते ‘सोन्या’चा चमचा घेऊन जन्माला आले. पवार कुटुंबाचा वारसा व शरद पवारांचे भक्कम पाठबळ त्यांना मिळाले, पण अजित पवारांनी स्वत:तला नेता विकसित केला. ते सतत लोकांत गेले. कार्यकर्त्यांशी संवाद केला. पक्ष संघटनेत लक्ष घातले. पुढे ते स्वयंभू बनले व शरद पवारांच्या हयातीत राष्ट्रवादी काँग्रेसवर वर्चस्व निर्माण केले आणि पुढे तीच संपूर्ण राष्ट्रवादी घेऊन भाजपच्या तंबूत गेले. पण महाराष्ट्राने जेवढा संताप एकनाथ शिंदेंच्या बाबतीत व्यक्त केला, तेवढा संताप अजित पवारांच्या बाबतीत दिसला नाही. याचे कारण पवारांचे लोभस व्यक्तिमत्त्व!” असं राऊतांनी म्हटलं आहे.
नक्की वाचा >> ‘मोदी-फडणवीस पुढच्या प्रजासत्ताक दिनी दादांना एखादा मरणोत्तर पद्मभूषण देऊन…’; राऊतांचा टोला
पहाटेच्या शपथविधीच्या आदल्या दिवशी काय घडलेलं?
“भाजप वगळून सर्व विरोधकांनी एकत्र येऊन महाविकास आघाडी स्थापन केली. त्या प्रत्येक चर्चेत अजित पवार सहभागी होते. मला आठवते, 2019 साली सत्तास्थापनेबाबत अखेरच्या टप्प्यातील बैठक नेहरू सेंटर येथे सुरू होती. शरद पवार, उद्धव ठाकरे, अहमद पटेल, खरगे हे काँग्रेसचे नेते दिल्लीहून बैठकीसाठी आले. पण काँग्रेस नेत्यांनी सुरू ठेवलेली चर्चा, वाटाघाटीचा घोळ थांबत नव्हता. याची चीड अजित पवारांच्या चेहऱ्यावर दिसत होती. शेवटी त्यांनी चर्चेत भाग घ्यायचे थांबवले. ते व मी शेजारीच बसलो होतो. त्यानंतर पुढचा बराच काळ ते खाली मान घालून थंड डोक्याने व्हाटस्अपवर चॅटिंग करत होते. अचानक ते उठले, ‘संजयजी, मी निघतो. हे काही खरं नाही!’ असे बोलून ते निघाले. ते थेट दुसऱ्या दिवशी राजभवनावर शपथ घेताना दिसले! तो सगळ्यांसाठीच धक्का होता, पण सकाळचा शपथविधी यशस्वी झाला नाही,” अशी आठवण राऊतांनी सांगितली.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



