
नागपूर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांनी आज (गुरुवारी) आपले अर्ज दाखल केले. महापौरपदासाठी भाजपने नगरसेविका नीता ठाकरे यांना, तर काँग्रेसने नगरसेविका स्नेहल ठाकरे यांना उमेदवारी दिली आहे. उपमहापौरपदासाठी भाजपच्या लीला हाथीबेड आणि काँग्रेसचे विवेक निकोसे यांनी अर्ज भरले आहेत. या पदांसाठीची निवडणूक ६ फेब्रुवारी रोजी कविवर्य सुरेश भट सभागृहात सकाळी ११ वाजता होणार असून, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर पीठासीन अधिकारी असतील. दोन्ही पक्षांच्या उमेदवारांनी डॉ. पंजाबराव देशमुख स्थायी समितीच्या सभागृहात नागपूर महानगरपालिकेच्या सचिव डॉ. रंजना लाडे यांच्याकडे आपले उमेदवारी अर्ज सादर केले. भाजपच्या महापौरपदाच्या उमेदवार नीता ठाकरे (प्रभाग क्र. २८ क) यांनी दोन प्रतींमध्ये अर्ज दाखल केले. त्यांचे सूचक म्हणून नरेंद्र (बाल्या) बोरकर आणि माया इवनाते होते, तर अनुमोदक म्हणून अश्विनी जिचकार आणि निरंजना पाटील यांनी स्वाक्षरी केली. उपमहापौरपदाच्या भाजप उमेदवार लीला हाथीबेड (प्रभाग क्र. २९ क) यांनीही दोन उमेदवारी अर्ज भरले. मंगला खेकरे आणि विनोद कन्हेरे हे त्यांचे सूचक होते, तर कल्पक भनारकर आणि मनीषा अतकरे यांनी अनुमोदक म्हणून स्वाक्षरी केली. यावेळी भाजपचे शहर अध्यक्ष आणि माजी महापौर दयाशंकर तिवारी, आमदार कृष्णा खोपडे, आमदार मोहन मते, माजी आमदार अनिल सोले, माजी आमदार गिरीश व्यास, भाजपचे गटनेते नरेंद्र (बाल्या) बोरकर यांच्यासह अनेक नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते. काँग्रेसकडून महापौरपदासाठी नगरसेविका स्नेहल ठाकरे (प्रभाग क्र. ११ ब) यांनी अर्ज दाखल केला. सरस्वती सलामे सूचक होत्या, तर मंजु चाचेरकर यांनी अनुमोदक म्हणून स्वाक्षरी केली. उपमहापौरपदासाठी काँग्रेसचे उमेदवार विवेक निकोसे (प्रभाग क्र. ९ अ) यांनी अर्ज भरला. प्रमोद जोगिंदर सिंग ठाकूर हे त्यांचे सूचक होते, तर प्रगती यादव यांनी अनुमोदक म्हणून स्वाक्षरी केली. यावेळी काँग्रेसचे गटनेते संजय महाकाळकर, नगरसेविका सरस्वती सलामे, नगरसेविका मंजु चाचेरकर आणि नगरसेवक प्रमोद जोगिंदर सिंग ठाकूर उपस्थित होते.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



